सावत्याच्या संगतीत राहून एका गुंडाची गरीब बायको टोळीतली शक्तिशाली राणी झाली

एखादा पुरुष एखाद्या बाइकडं आकर्षून इतिहास बदलल्याचं आपण पाहिलंय. यात मेनका उर्वशी रंभा या अप्सरांपासून ट्रॉयच्या हेलेनपर्यंत सगळ्याच स्त्रियांनी त्यांच्या मादक सौंदर्याने पुरुषांना आपल्या नादाला लावलंय. यातूनच कुठलंच क्षेत्र सुटलं नाही. अगदी गुन्हेगारी विश्वात सुद्धा पुरुषांच्या काम मागील प्रेरणा बायकाच होत्या. मुंबई अंडरवर्ल्डचं सुद्धा तसंच होत.

अरुण गवळीने झुबेदा मुजावरशी लग्न केले. तिने नंतर हिंदू धर्म स्वीकारला आणि ती आशा गवळी झाली. तिन गवळीला दिलेल्या नैतिक पाठिंब्यामुळं गवळीला मुंबई पोलीसांशी, शिवसेनेशी आणि दाऊदशी सामना करण्याचं बळ मिळालं होत. अश्विनने नाईकने त्याच्या भावाच्या टोळीत सामील होण्याला अमर आणि अश्विन या दोघांचा अनेक वर्षे विरोध होता. पण नीताने अश्विनचे मन वळवले.

असंच उनिताच्या संगतीत आल्यानंतर सावत्याच्या क्रूरतेत कैकपटींनी वाढ झाली होती.

मुंबई अंडरवर्ल्डमुळे आर्थिक उलाढाली, टोळीयुद्धे यांना ऊत आला होता. मुंबईत वाढीस लागणारा अवैध व्यवसाय आता बाबरी मस्जिद प्रकरणामुळे दुबईत वळला होता. या काळात अनेक छोटे गुन्हेगार आता मोठे भाई झाले होते. यात मोठा झालेला सुनील सावंत उर्फ सावत्या.

गिरणगावात चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये राहणारा हा सावत्या सुरवातीला एक साधा भुरटा गुंड आणि नंतर दाऊदच्या टोळीत त्याचा प्रवेश झाला. तिथे छोट्या शकीलच्या बरोबरीने त्याला वागणूक मिळू लागली. जेजे हॉस्पिटलमधल्या गोळीबारात सावत्या आघाडीवर होता. अनेक भानगडी करत तो इथवर पोहचला होता. दाऊदच्या इशाऱ्यावर सावत्या सगळी कामं करू लागला होता. दाऊदच्या टोळीतून खून पाडण्याचं यंत्र म्हणजे सावत्या अशी ओळख त्याची झाली होती.

सुनील सावंत उर्फ सावत्या हा एक कुख्यात नेमबाज होताच, पण तो बायकांच्या नादी लागल्यापासून त्याच्या क्रौर्याने नवी परिसीमा गाठली. बायकांबद्दलची त्याची लालसा आणि रक्ताची तहान यावर तो कधीच नियंत्रण ठेवू शकत नसे. यातूनच सावत्याने उनिता प्रजापतीला पटवलं होत.

सावत्याचा खास दोस्त पप्पी शिर्सेकर याला खुनाच्या प्रकरणात अटक झाली होती आणि तो तुरुंगात होता. त्याची बायको उनीता हिने नवऱ्यासाठी वकील वगैरे देण्याच्या संदर्भात सावत्याशी संपर्क साधला. सावत्या त्यापूर्वी तिला कधीच भेटला नव्हता. पण तिला भेटताच तो तिच्याकडे आकर्षित झाला.

टोळीतला सुभाषसिंग ठाकूरचा मात्र याला विरोध होता. ठाकूर असेपर्यंत उनिताबरोबर अनैतिक संबंध चालू ठेवता येणार नाहीत, नाहीतर त्याच्या टोळीत बंडाळी होईल हे सावत्याच्या लक्षात आलं. त्यावर त्याने काढलेला उपाय फक्त एखाद्या निर्ढावलेल्या निर्दय गुन्हेगाराच्याच डोक्यातून निघू शकतो.

आधी सावत्याने उनीताचा नवरा शिर्सेकर तुरुंगातून कसा सुटेल ते पाहिले. त्याने पट्टीचे वकील नेमले, काही साक्षीदारांना विकत घेतले. त्याच्या सुटकेसाठी लागेल ते सर्व सावत्याने केले. शिर्सेकरविरुद्धच्या आरोपात तथ्य नाही असे दिसू लागल्यावर न्यायालयाने त्याला जामीन दिला. तो आणि उनिता यांना सावत्याविषयी खूप कृतज्ञता वाटायली लागली. ते त्याचे गुणगान करू लागले.

सावत्याच्या डोक्यात मात्र वेगळेच काही चालू होते.

त्याच्या अगदी खास दोस्तांनादेखील त्याने त्याचा सुगावा लागू दिला नाही. एकदिवस सावत्याने त्याच्या विश्वासू साथीदारांना शिर्सेकरला दारू प्यायला घेऊन जायला सांगितले. ते दारू पिऊन परत येत असताना सावत्याच्या एका साथीदाराने अंधाराचा फायदा घेत शिर्सेकरवर गोळ्या झाडल्या आणि तो लगेच तिथून पळून गेला. शिर्सेकरबरोबर असलेल्या सावत्याच्या साथीदारांनादेखील गोळ्या झाडणारा कोण होता ते कळले नाही. या खुनाबाबत गवळी आणि इतर टोळ्यांवर संशय घेण्यात आला.

पुन्हा एकदा सावत्या उनिताच्या मदतीला धावून आला. शिर्सेकरच्या अत्यसंस्कारांची व्यवस्था त्याने केली. या काळात स्वतःला सावरायला त्याने उनिताला मदत केली. त्यानंतर ज्या दोन गोष्टी घडल्या त्यामुळे उनिताचे व्यक्तिमत्व पूर्णतः बदलून गेले. शिर्सेकरला जाऊन काहीच दिवस होत आहेत तोवर ती सावत्याच्या प्रेमात पडली आणि तिनं त्याच्याशी लग्न करायला होकार दिला. शिर्सेकरच्या खुनात सावत्याचाच हात होता असं कुणीतरी तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.

उनिता प्रजापती ही काही चारचौघींसारखी बाई नव्हती. एका गुंडाची गरीब बिचारी बायको एका टोळीतील शक्तिशाली राणी झाली होती.

सावत्याप्रमाणे तिलाही रक्ताची चटक लागली, सावत्याने केलेल्या काही खुनांच्या ठिकाणी उनिताही उपस्थित होती असे सांगणारे अनेक साक्षीदारही गुन्हेशाखेच्या पोलीसांना भेटले.

उनिता दिल्ली-काठमांडू या प्रवासात पण सावत्याबरोबर असायची. सावत्या आणि उनिताचे नेमके संबंध काय होते हे सावत्याने कधी कुणाला सांगितले नाही. पण सुभाषसिंग ठाकूरने पुढे पोलीसांना असे सांगितले की तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहे असं सावत्याला वाटायच. जेव्हा जेव्हा सावत्या, प्रसाद खाडे आणि ठाकूर गाडीतून गोंदा, दिल्ली अशा लांबलांबच्या ठिकाणी जायचे तेव्हा उनिताला बरोबर घेण्याचा सावत्याचा हट्ट असायचा. एका वकीलाने, सांगितलं होत की उनिताला रक्ताची इतकी चटक लागली होती की गुन्हा केल्यानंतर त्या ठिकाणी अजिबात रेंगाळू नये हा गुन्हेगारीतील मूलभूत नियम ती स्वतःतर मोडायचीच, पण सावत्यालाही तिथे थांबायला लावायची.

नेमबाजाने त्याच्या सावजावर गोळ्या झाडल्या की क्षणाचाही विलंब न लावता तिथून पळ काढायचा असतो. पण उनिताला तिथे थांबून सावजाचा प्राण हळूहळू कसा जातो ते पाहायला आवडायचे. ते दोघे अशा ठिकाणी थांबू लागले. जर लगेच पकडले जाण्याचा धोका नसेल तर अगदी उघड्यावरही थांबून ते सावजाची तडफड पाहात असत. एरवी ते गाडीच्या काळ्या काचांच्या आडून बघत बसत. त्यांच्या आधी कुणीही तसे करत नसे.

ऑलिव्हर स्टोनच्या काल्पनिक कथानकावर आधारित ‘नॅचरल बॉर्न किलर्स’ या पिक्चर मधल्या मिका आणि मॉलीप्रमाणे सावत्या आणि उनिता होते. या पिक्चरमधल्या मिकी आणि मॉलीचा लहानपणी छळ झालेला असतो. पुढे ते प्रेमिक बनतात आणि अनेक खून करतात, अगदी तसंच उनिता आणि सावत्या करायला लागले.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.