मुंबई विद्यापीठाने जागतिक किर्तीचे विद्वान रामकृष्ण भांडारकर यांना नापास केलं होतं.

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार आजचा नाही. पुर्वीही विद्यापीठ आपले गुण ऊधळत होतं. फक्त आजच्याएवढं सातत्य त्याकाळी नव्हतं. अशाच एका भोंगळ कारभाराचा हा किस्सा. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्यापाचच वर्षांत मुंबई विद्यापीठाने चक्क जागतिक किर्तीचे विद्वान रामकृष्ण गोपाळ भांडारकरांना नापास केलं आहे.

हा किस्सा आहे १८६२ सालचा.

मुंबई विद्यापीठाकडून कला शाखेची पदवीधर परीक्षा घेण्यात आली होती. ६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मुंबई विद्यापीठाने जेव्हा या परीक्षेचा निकाल जाहीर केला त्यात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत महादेव गोविंद रानडे, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक यांचा समावेश होता. पण सगळ्यात आश्चर्यकारक नांव जे होतं रामकृष्ण गोपाल भांडरकरांचं. कारण या निकालात विद्यापीठाने भांडारकरांना नापास केलं होतं.

या परीक्षेचे परीक्षक होते सर अलेक्झांडर ग्रांट. हा निकाल बघून भांडारकरांना जेवढा धक्का बसला होता, त्याहून मोठा धक्का सर अलेक्झांडर ग्रांट यांना बसला. कदाचित ६ उत्तरपत्रिका असल्याने असेल पण ग्रांट यांना भांडारकरांची उत्तरपत्रिका व्यवस्थित आठवत होती. (त्यावेळी उत्तरपत्रिकेवरील परीक्षार्थीचे नांव झाकण्याची आतासारखी ‘मास्किंग’ची पद्धत नव्हती.) त्यामुळे प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी सर अलेक्झांडर ग्रांट स्वतः विद्यापीठात गेले. एका भारतीय विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एका ब्रिटीश प्राध्यापक त्याच्या मदतीला जाण्याचे हे दुर्मिळ दृश्य होते.

ग्रांट ज्यावेळी विद्यापीठात पोहोचले त्यावेळी त्यांना अजून एक धक्का बसला. भांडारकर यांची सर्व विषयांच्या परीक्षेला उपस्थिती असल्याची  ग्रांट यांना कल्पना होतीच पण निकालामध्ये त्यांच्या नावासमोर फक्त एकाच विषयाच्या गुणांची नोंद होती. हे तर अतिशय गंभीर होतं. त्यामुळे या प्रकरणात अधिक सखोल चौकशी होण्याची गरज आहे हे ग्रांट यांच्या चटकन लक्षात आलं. त्यानंतर अतिशय वेगाने सूत्र हलली आणि प्रकरणाची चौकशी होऊन जे समोर आलं त्यामुळे भांडारकरांचा जीव भांड्यात पडला. चौकशीअंती समोर आलं की याच परीक्षेला बसलेले अजून एक विद्यार्थी कृष्णाजी बापुजी बाळ आणि भांडारकर यांच्या गुणांची आदलाबदल झाली होती आणि त्यातूनच हा घोटाळा झाला होता.

त्यानंतर निकाल बदलण्यात आला आणि पुढे भांडारकर संस्कृतचे असिस्टंट प्रोफेसर झाले. नंतर ओरिएन्टल भाषांचे प्रोफेसर झाले. व्हाईस चॅन्सलर, व्हॉइसरॉयच्या कायदेमंडळातील सदस्य झाले. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. एवढंच काय तर ज्या विद्यापीठाने भांडारकरांना नापास घोषित केलं होतं, त्याच मुंबई विद्यापीठाचे  १८९३ ते १८९५ सालादरम्यान त्यांनी कुलगुरूपद भूषवलं.

भारतीय इतिहासाने आपल्याला एक वारसा दिलाय तो चुका करण्याचा आणि दुसरा वारसा दिलाय चुका सुधारण्याचा.

आपण नक्की कुठला वारसा स्वीकारणार आहोत…?

प्रा. गणेश राउत.

संदर्भ- मराठी विश्वकोश, ऐसा ज्ञानसागरू- डॉ. अरुण टिकेकर

हे ही वाच भिडू.