ब्रिटीशांनी नाही तर या एकट्या माणसाने मुंबईची सात बेटं एकत्र करुन “मुंबई” जन्माला घातली.

साल होतं १६७१-७२ इस्ट इंडिया कंपनीने जेराल्ड ऑन्जियर याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं होतं.

आधुनिक मुंबईचा पाया घालण्याच श्रेय अनेकजण याच गव्हर्नरला देत असतात. मुंबईच्या टेकड्या फोडून मुंबई एकत्र जोडायला पाहीजे अस समजलेला हा पहिला माणूस.

त्याने ब्रिटनला तसा प्रस्ताव पाठवलेला होता. पण टेकड्या फोडून कशाला पैसा गुंतवायचा म्हणून इस्ट इंडिया कंपनीकडून त्या फाईलला कचऱ्याची पेटी दाखवण्यात आली होती. 

त्यानंतर ठिक शंभर वर्षांनी मुंबईचा गव्हर्नर म्हणून विलियम हॉर्नबी याची नियुक्ती झाली.

या माणसाने मुंबईच्या सात टेकड्या फोडून एकसंध मुंबई जोडण्याची योजना आखली, ती अंमलात देखील आणली. 

सध्या मुंबईतला पाऊस पाहून मुंबईची नेहमी तुंबई का होते हे सांगणारा भौगोलिक इतिहास मांडण्यात येत आहे. म्हणूनच मुंबई तयार करण्याचा हा भल्लामोठ्ठा इतिहास खास तुमच्यासाठी मांडत आहोत. 

सुरवात होते ती १७७१ सालापासून… 

विलियम हॉर्नबी हा मुंबईचा गव्हर्नर होता. त्या काळात मुंबई नेमकी कशी होती तर मुंबईत सात बेट होते. कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, वरळी, माहिम, परळ आणि माझगाव. 

Screenshot 2019 07 02 at 4.53.09 PM

वरचा जो भाग लाल दिसतोय तो भाग दलदलीचा. भरतीच्या काळात तिथ पाणी असायचं आणि ओहोटीच्या काळात तिथं चिखल आणि दलदल होती. सात टेकड्या सोडल्या तर लाल दिसणारा संपुर्ण भाग जास्तकरून पाण्याखालीच होता. परिणामी या बेटावरुन त्या बेटावर संपर्क साधण्यासाठी बोटींचा वापर केला जायचा.

पैकी लोकवस्तीत सर्वात प्रमुख बेट होते ते मुंबईच. त्या खालोखाल क्रम लागत होता तो माझगाव बेटाचा. त्यानंतरच्या बेटावर तुलनेत खूपच कमी लोकवस्ती होती. मुंबई बेटावर इंग्रज आणि व्यापारी असत. मुंबईला लागून असणाऱ्या वरच्या अर्थात वरळी बेटावर समुद्राच सर्वात जास्त पाणी शिरत असे.

वरळी आणि मुंबई बेटाच्या मधला भाग म्हणजे आत्ता लाला लजपतराय मार्ग आहे तो भाग, हाजी हलीच्या तिथल्या चिंचोळ्या भागातून आतमध्ये पाणी शिरायचं ते थेट माझगाव बेटापर्यन्त जायचं. या दरम्यानच भेंडीबाजार, भायखळा, पायधुनी भाग येतो. हा भाग कायम भरतीचं पाणी ओसरल्यानंतर पाठीमागे राहणाऱ्या चिखलासारखा असायचा.

भरतीच पाणी ज्या चिंचोळ्या भागातून आत यायचं तो सध्याचा महालक्ष्मी ते अत्रिया मॉल दरम्यानच्या प्रदेशात भराव टाकला तर आतपर्यन्त येणारे पाणी रोखता येवू शकणार होते.

असा भराव टाकण्याचा विचार तत्कालीन गव्हर्नर विलियम हार्नबी याच्या मनात आला. त्याने तात्काळ एक प्रस्ताव तयार केला आणि ब्रिटनला पाठवला. मधल्या भागात तयार होणाऱ्या दलदलीमुळे अनेक ब्रिटीशांचा आजारपणामुळे मृत्यू होत असे. साहजिक कंपनी या प्रस्तावावर लगेच सहमत होईल असा ओव्हर कॉन्फीडन्स या पठ्याच्या मनात होता. त्या काळात पत्र बोटीने जात असायची. साहजिक उत्तर यायला सहा महिने ते वर्षाचा काळावधी लागायचा.

कंपनीकडून होय येईल या अपेक्षेने महालक्ष्मी ते अत्रिया मॉल या मुंबई आणि वरळी बेटाला जोडणाऱ्या भागात भराव टाकण्याच काम विलियम हार्नबी याने सुरू केले. पैशाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा माझगाव मधल्या एका श्रीमंत बाईकडून विलियम हार्नबी याने पैशाची जुळवाजुळव केली.

इकडे कंपनीने प्रस्ताव नाकारला. तरिदेखील विलियम हार्नबी याने हा भराव टाकण्याच काम सुरूच ठेवलं. गव्हर्नर म्हणून त्याच्याकडे दोन ते तीन वर्षाचा कालावधी होताच. मात्र कंपनीला हार्नबी याने आपल्या परवानगीशिवाय असा भराव टाकण्यास सुरवात केली असल्याची माहिती समजली आणि कंपनीने त्याला सस्पेंन्ड केल्याची आर्डर पाठवली.

या काळात ब्रिटनहून विलियम हार्नबीला सस्पेंन्ड केल्याची आर्डर आली.

नंतर येणाऱ्या गव्हर्नरला चार्ज घेण्यासाठी वर्षाचा कालावधी लागणार होता. अशा वेळी सस्पेंन्ड केल्याची आर्डर हार्नबीने दाबून ठेवली आणि भराव टाकण्याचं काम तसच चालू ठेवलं. कंपनीच्या विरोधात जावून आपलं पद पणाला लावून मुंबई एकत्र जोडण्याच काम या गव्हर्नरने केलं होतं. आत्ताच्या हिरा पन्ना शॉपिंग ते वरळीच्या लव्ह ग्रोव्ह पर्यन्तचा रस्ता आहे तोच हा रस्ता.

हा रस्ता अर्थांत बांध पुर्ण झाला आणि माझगाव बेटापर्यन्त शिरणारं भरतीच पाणी बंद झालं. हा पहिला बंधारा होता, तसच ते पहिलं अनधिकृत बांधकाम देखील असावं. या बांधाच नाव ठेवण्यात आलं हार्नवी वेलार्ड. या बांधामुळे मुंबई एकसंध होण्यास सुरवात झाली. पुढे या रस्त्याच नाव लाला लजपतराय मार्ग करण्यात आलं.

या रस्त्यामुळे काय झालं तर मुंबईची ४००० एकर जमिनी मोकळी झाली. ठिकठिकाणी असणाऱ्या टेकड्या फोडून मुंबई एकसंध करण्याच काम सुरू झालं. पुढे अशाच प्रकारे मुंबई आणि माझगाव बेट जोडण्यात आलं.

पायधुनी भागात हे काम हाती घेण्यात आलं. नंतरच्या काळात वेगवेगळ्या गव्हर्नरनी हे काम पुर्णत्वाला नेलं.

स्वत:च पद पणाला लावून या माणसाने मुंबई एकसंध करुन दाखवली. थोडक्यात काय तर आपली नोकरी पणाला लावून त्याने मुंबई एकत्र जोडण्यासाठी काम केलं. त्यामुळेच म्हणू वाटतं की ब्रिटीशांमुळे नाही तर एकट्या ब्रिटीश माणसांमुळे मुंबई एकत्र बांधली गेली. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Ganesh says

    हार्नबी च्या नावाने असलेल्या रस्त्याचे नाव बदलायला नको होते…

Leave A Reply

Your email address will not be published.