हुंड्यात दिलेल्या मुंबईमुळं राडा झालेला, प्रकरण पेटलं असतं तर ब्रिटीशांची सून नांदली नसती.

साधारण १५०८ साली पोर्तुगिजांचा भारतातला पहिला गव्हर्नर फ्रान्सिस्को अल्मेडा याने भारतात त्यांना स्पर्धक बनलेल्या  अरब इजिप्शियन व्यापाऱ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेतली. यासाठी तो आपल्या आरमारासह कालिकतहून दिवला निघाला होता. या प्रवासात त्याला काही बेट दिसले. त्याच्या अनुभवी नजरेने हे नैसर्गिक बंदर आपल्यासाठी खूप महत्वाच असल्याची खुणगाठ बांधली.

हेच ते बेट जे पुढे जाऊन भारताची आर्थिक राजधानी मुंबई म्हणून ओळखली गेली.

२१ जानेवारी १५०९ रोजी पहिल्यांदा माहीम येथे जहाजातून पोर्तुगीज उतरले. या भागावर गुजरातच्या सुलतानांच राज्य होत. कधी परवानगी घेऊन कधी लढाई करून त्यांनी या बेटांवर वर्चस्व मिळवलं. माहीम मध्ये किल्ला उभा केला. सोळाव्या शतकात मुंबई, माहीम, बांद्रा इथे पोर्तुगीजांच निर्विवाद मालकी निर्माण झाली.

मुंबईमध्ये या काळात छोट्या छोट्या वस्ती करून कोळी राहायचे. पोर्तुगीजांनी या भागाचा विकास सुरु केला. इथले लोक या परकीय सत्तेला सरावू लागले होते. साधारण याच काळात भारतात डच आणि इंग्रजांचाही शिरकाव झाला. इंग्रजांनी कलकत्ता, मद्रास, गुजरात मधल्या सुरत इथे आपल्या वखारी उभ्या केल्या.

सोने की चिडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातल्या व्यापारामध्ये आपलीच मक्तेदारी राहावी यासाठी या तिन्ही युरोपियन सत्ता आपापसात भांडू लागल्या. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीला आपल्या सुरत वखारीच्या जवळ असणारं एखाद बंदर ताब्यात असण आवश्यक वाटत होत. म्हणून त्यांची नजर बऱ्याच वर्षापासून मुंबईवर होती. त्यांनी पोर्तुगीजांकडे हे बंदर विकत देण्याची मागणी केली. पण ते मुंबई कोणालाही देण्यास तयार नव्हते.

याच दरम्यान पूर्ण भारताचा इतिहास बदलणारी एक घटना दूर युरोपात घडली. ते म्हणजे लग्न.

साधसुध नाही तर इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ब्रिगांझा यांचं लग्न.

या लग्नाला खूप मोठी पार्श्वभूमी होती. खरंतर इंग्रज आणि पोर्तुगीज एकमेकांचे मोठे शत्रू होते. पोर्तुगालच्या राजाला आपल्या पोरीच लग्न स्पेनच्या राजपुत्राशी करून द्यायचं होत. पण ऐनवेळी पक्ष बदल केल्याप्रमाणे पोर्तुगीज बादशाह जॉन(चौथा) याने कॅथरीनच्या अक्षता इंग्लंडच्या राजासोबत पाडल्या. सगळीच गणित बदलली गेली. जे मुंबईचे बंदर साम दाम दंड भेद याचा वापर करून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न इंग्रज करत होते ते त्यांना लग्नात हुंडा म्हणून मिळाले.

११ मे १६६१ साली याद्या निघाल्या. लिखापढी झाली. मॅरेज ट्रिटी म्हणून हा करार फेमस झाला.

अख्खीच्या अख्खी मुंबई, ब्राझील, वेस्ट इंडीज बेटांचा काही भाग, वरून काही पैसे एवढ सगळं रुखवत घेऊन पोर्तुगालची राजकुमारी इंग्लंडच्या राजाची राणी झाली. राजाने जराही वेळ न घालवता मुंबईची सात बेट ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला विकली.

अहो पण हे सगळ झालं वरच्या पातळीवर. मुंबईच्या सत्तेला चटावलेले पोर्तुगीज अधिकारी मुंबई सोडायला तयार नव्हते. काही ना काही कारण दाखवून टाळाटाळ  चालू होती.

मुंबईच्या बंदरावर इंग्रज जहाजे येऊन उभी राहिली. मुंबईचा सातबारा आता आपल्याकडे आहे हे सांगण्याचा प्रयत्न चालवला होता. पण पोर्तुगीज व्हाईसरॉय त्यांना दाद लागू देत नव्हता. हा करार कशावरून? याच्यावर अमुक तमुक शिक्का नाही असे प्रश्न सांगून पोर्तुगीज वेड पांघरून पेडगाव ला जात होते. खूप वाद झाले.

टिपिकल सरकारी अधिकाऱ्याप्रमाणे पोर्तुगीज म्हणाले,

 “आम्हाला वरून आदेश आल्याशिवाय आम्ही मुंबई तुमच्या ताब्यात देणारं नाही.”

इंग्रज अधिकाऱ्यांना टेन्शन आल होत. परत पोर्तुगालला जाऊन तो शिक्का घेऊन परत यायचं म्हणजे सहा महिने गेले. तिकडन पोर्तुगीज राजा आपल्या अधिकाऱ्यांना बेट देऊन टाका म्हणून लागला होता. ब्रिटनचा राजा पोर्तुगालच्या नावाने ठ्णाठणा करत होता. 

जवळजवळ दीड वर्ष ही बोंबाबोंब सुरु राहिली. अखेर इंग्रजानी लढाई करूनच आपला हक्काचा हुंडा ताब्यात घ्यायचं ठरवलं. मुंबईच्या किनाऱ्यावर इंग्लिश जहाजातून तोफगोळे पडू लागले. तेव्हा मात्र पोर्तुगीजांनी मुंबई इस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली.

मुंबई मिळवायची तर संघर्ष करावाच लागणार हा पहिला धडा १६६२ साली गिरवला गेला तो कायमचाच.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.