डबलडेकर सारखं मुंबईचं ‘के. रुस्तम’ आईसक्रीमही आता नॉस्टॅल्जियात जमा होणार?

मुंबईच्या चर्चगेट स्टेशनला उतरलं की मरीन ड्राईव्हकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचं. वाटेत आइसक्रीमचं एक खूप वर्ष जूनं दुकान लागतं. तिथून आईसक्रीम विकत घ्यायचं आणि मरीन ड्राइववर, समुद्रासमोर बसून ते खायचं. जरा इकडे तिकडे फिरून पुन्हा चर्चगेट स्टेशनवर जाऊन, लोकल पकडून घरी परतण्यासाठी पुन्हा तोच रस्ता पकडायचा. जाता जाता पुन्हा त्याच आइसक्रीमच्या दुकानापाशी थांबून दूसरा एखादा फ्लेवर घ्यायचा आणि घरी जायचं.

मरीन ड्राईव्हवर जाताना घेतलेलं आईसक्रीम तुमचं पोट भरण्याचं काम करतं आणि चर्चगेट स्टेशनला परत येताना घेतलेलं आईसक्रीम तुमचं मन भरण्यासाठी असतं. ही प्रथा अख्खी मुंबई, आणि मुंबईत राहणारे मुंबईकर गेली वर्षानूवर्ष पाळतायत.

दरम्यान, ना मुंबईकरांचा कधी मरीनड्राईव्हला जाऊन बसण्याचा उत्साह कमी झाला, आणि ना कधी आईसक्रीम खाण्याची हौस फिटली. पण एक गोष्ट मात्र आता बदलणारे. स्टेशनवरून मरीन ड्राईव्हकडे जाताना कदाचित हे ऐतिहासिक आईसक्रीम आता मुंबईकरांना खाता येणार नाहीये.

के. रुस्तम आणि कं. असं ह्या आइस क्रीमच्या दुकानाचं नाव. हो दुकांनच. कारण आइसक्रीमच्या दुकानाला पार्लर म्हणतात हे ज्या काळात लोकांना माहितही नव्हतं त्या काळापासून के. रुस्तम लोकांना आइस क्रीम खाऊ घालतंय. पण ह्या दुकानाची जागा आता बदलणार असल्याच्या चर्चा आहेत.

के रुस्तमला येत्या २९ जूनपर्यंत जागा खाली करण्यासाठी सांगितलंय आणि ह्या विषयी त्यांची CCI म्हणजेच द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया सोबत कोर्टात केसही चालू आहे. आता CCI चा ह्या आईसक्रीमच्या दुकानाशी काय संबंध तर, के. रुस्तम आत्ता जिथे आहे ती जागा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीची आहे. आणि के. रुस्तमचं दुकान १९३८ सालापासून तिथे भाडेकरू म्हणून आहे.

रुस्तमकडून त्यांच्या जागेचा पूर्ण वापर केला जात नाही आणि CCI ला आपला क्लब अजून जास्त एक्सपांड करायचा असल्याचा दावा CCI ने केलाय तर, “आम्ही दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून इथे भाडेकरू आहोत आणि आता आम्हाला कुठेही परवडणाऱ्या किमतीत जागा मिळणार नाही त्यामुळे आम्हाला त्यासाठी वेगळे कष्ट सोसावे लागतील” असा दावा के रुस्तमने केलाय.

शिवाय मुंबईकरांना तर आता आमचं आइसक्रीम खाण्याची इतकी सवय झालीये की लोकं स्वत:च या बाबतीत आवाज उठवतील असंही दुकानाच्या मालकाचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर म्हणे ही केस गेली २२ वर्ष कोर्टात सुरू असल्याचंही ते सांगतायत.

पण म्हणजे खरंच का हे आईसक्रीमचं दुकान मुंबईकरांच्यात एवढं फेमस आहे? तर ह्याचं उत्तर आहे हो.

के. रुस्तम हे आधी एक डिपार्टमेंटल स्टोअर होतं. औषधं, कापूस, लोकर अशा साध्या साध्या गोष्टी इथे मिळत असत. ह्या दुकानाची स्थापना एका इराणी माणसाने केली होती. खोदाबक्स रुस्तम इराणी, असं त्यांचं नाव आणि त्यांच्या नावावरूनच पुढे ह्या दुकानाला के. रुस्तम अँड कंपनी असं नाव पडलं.

सुरवातीला असलेलं डिपार्टमेंटल स्टोअर नंतर १९५३ साली आईसक्रीम पार्लर बनलं. जवळच समुद्र असल्यामुळे लोकं इथे मजा करायला येतात, आणि पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची मजेची वाख्या आजही आईसक्रीमच असते त्यामुळे तिथलं मार्केट पाहून त्यांनी त्याजागी आईसक्रीम विकायला सुरवात केली. 

सुरवातीला त्यांनी चार ते पाच फ्लेवर्सपासून सुरवात केली होती आणि आजच्या घडीला त्यांच्या या दुकानात जवळ जवळ सत्तरच्या घरात नवीन नवीन फ्लेवर्स मिळतात.

आता आईसक्रीम म्हटल्यावर आपल्याला कोनमधलं नाहीतर कपमधलं आईसक्रीम असे दोनच प्रकार माहीत असतात, नाही म्हणायला हल्ली कुठे कुठे तवा आईसक्रीमचं पण फॅड आलंय. आणि चुकून तुम्ही कधीतरी आईसक्रीम सँडविच पण ऐकलं असणारे पण हा ‘आईसक्रीम सँडविच’वाला फंडा के. रुस्तमने पहिल्यांदा मार्केट मध्ये आणलेला.

त्याचं झालं असं होतं की सुरवातीला जेव्हा त्यांनी आईसक्रीम विकायला सुरवात केली तेव्हा ते छोट्या छोट्या प्लेट्समध्ये आईसक्रीम सर्व्ह करत असत. त्या कचाकडयाच्या बश्या इतक्या भारी असायच्या की लोकं त्या सुमडीत घेऊन जात असत. आता एकदा दोनदा असं झालं तर गोष्ट वेगळी असती, चालून गेलं असतं पण नंतर रोजच असं व्हायला लागलं.

मग यावर काहीतरी पर्याय शोधणं आवश्यक होतं. बरं कागदी प्लेटमध्ये आईसक्रीम देणं तर शक्य नव्हतं आणि तेव्हा मग त्यांनी एक शक्कल लढवली. छोटा आयताकृती आइसक्रीमचा क्यूब पाडून त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी कडक वेफर बिस्किट लाऊन ते लोकांना द्यायला सुरवात केली.

ह्या बिस्किटामुळे काय झालं तर लोकांना ते आइसक्रीम हातात पकडता यायला लागलं. आणि शिवाय वेफर बिस्किटासोबत त्याच्या आतल्या आईसक्रीमची एकत्र चव पण लोकांना भारी आवडायला लागली. आणि मग बेंच मार्कच सेट झाला. के. रुस्तमच्या आईसक्रीमची वेगळी स्टाईल लोकांच्यात लय फेमस झाली. आणि ह्या प्रकाराला लोकं ‘आईसक्रीम सँडविच’ म्हणायला लागले.

पार.. व्हॅनिला, चॉकलेट, वॉलनट क्रंच पासून रासबेरी, पपइ, टॉफी क्रंच, पायनॅपल, नेस्कॅफे, कोको मिंट क्रंच, रम असल्या कसल्या कसल्या फ्लेवर्सचे ऑप्शन इथे आईसक्रीममध्ये मिळतात. तेही अवघ्या ३० ते ७० रुपयांत.

के. रुस्तम म्हणजे मुंबईकरांचं आईसक्रीम खाण्याचं आता सवयीचं ठिकाण बनलंय. अशावेळी डबलडेकर सारखं मुंबईचं फेमस ‘के. रुस्तम’ आईसक्रीमही आता नॉस्टॅल्जियात जमा होणार असल्याच्या वार्ता ऐकल्यावर त्या खोट्या निघाव्यात असंच मनोमन वाटून जातं, खरं.

बाकी.. त्यांचं आईसक्रीम कधी चाखून बघितलं नसेल तर लगेच जाऊन खाऊन या हे काय तुम्हाला आता वेगळं सांगायला नकोच.

हे ही वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.