मुंबईच्या मैदानात पाणी मारणाऱ्याचा मुलगा ते जगातला सर्वोत्कृष्ट फिल्डर.

आज भारतीय क्रिकेट टीम ओळखली जाते ती त्यांच्या आत्मविश्वासामुळे. त्यांच्याकडे कोणीही डोळे वटारून बघू शकत नाही. कधी कधी उद्धटपणा वाटावा असा आत्मविश्वास आपल्या टीमचा आहे.

पण हा आत्मविश्वास सहजासहजी आला नाही. त्यामागे अनेक वर्षाची मेहनत आहे. याच मेहनतीने प्रत्येक डिपार्टमेन्टमध्ये जबरदस्त परफॉरमन्स करून आपल्या टीमने हा कॉन्फिडंस कमावला  आहे. सगळ्यात जास्त इम्प्रूव्हमेंट झाली आहे ती फिल्डिंग मध्ये.

एक काळ होता भारतीय टीम फक्त आपल्या स्पिन बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावर मॅच खेळायची. फिल्डिंग आणि फास्ट बॉलिंग हा ऑप्शनला ठेवलेला विषय असायचा. वेस्ट इंडीज इंग्लंड ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या टीमच्या समोर खेळायला आपली टीम घाबरायची. साठच्या दशकात सामने अनिर्णीत जरी राहिले तरी खूप मोठ यश समजल जायचं.

जस जस सत्तरच दशक आलं भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल घडून आले. यात टायगर पतौडी, अजित वाडेकर अशा कॅप्टन आणि सुनील गावस्कर, कपिल देव अशा खेळाडूंचा समावेश होता. याच आणखी एक खेळाडू होऊन गेला ज्याने फक्त भारतीय क्रिकेटचं नव्हे तर जगभरातल्या खेळाडूंसाठी फिल्डिंगचं एक स्टँडर्ड सेट करून टाकलं, त्याचं नाव एकनाथ सोलकर

एकनाथ सोलकरचे वडील मुंबईत हिंदू जिमखाना मध्ये ग्राउंडसंमन होते. मैदानात पाणी मारणे, वाढलेल गवत कापणे, पीच बनवणे या गोष्टी ते करायचे. घरची परिस्थिती गरीबीची. एकनाथ या मैदानातच वाढला. तेव्हापासूनच दिवसरात्र क्रिकेट खेळण हेच त्याच स्वप्न होत. कधी काळी स्कोअरबोर्ड बदलणारा एकनाथ हळहळू शालेय क्रिकेट, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नाव कमावून आंतरराष्ट्रीय टीममध्ये जाऊन पोहचला.

तो एक चांगला फलंदाज आणि बरा गोलंदाज होता. पण त्याची खरी ओळख जगातला सर्वोत्कृष्ट फिल्डर अशीच होती. फोरवर्ड शोर्ट लेग ही सर्वात डेंजरस फिल्डिंग पोजिशन आहे. यासाठी बॅट्समनच्या अगदी जवळ उभे राहावे लागते.तिथला फिल्डर कायम डोक्याला हेल्मेट घालतो. तरीही अनेकदा तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकांना वेगाने आलेला बॉल लागून ते जायबंदी झाले आहेत, काही वेळा खेळाडू मृत्युमुखी देखील पडले आहेत.

त्याकाळात तरी भारतात कोणी फिल्डर फोरवर्ड शोर्ट लेगला फिल्डिंग करायला तयार नसे. एकनाथ सोलकर मात्र बिनधास्तपणे डोक्यावर हेल्मेट न घालता तिथे उभा राहायचा आणि अशक्यप्राय वाटणारे झेल पकडायचा.एक सुप्रसिध्द क्रीडा समीक्षक म्हणतात ,

“एकनाथ सोलकर झेल पकडायचा नाही तर तो झेल तयार करायचा.  “

बॅट्समनच्या बॅॅट लागून बोल काही इंच जरी वर उडाला तरी एकनाथ वाघासारखा झेप घेऊन त्याचे रुपांतर कॅच मध्ये करायचा. त्याकाळात प्रसन्ना, चन्द्रशेखर, बेदी, वेंकटराघवन या भारतीय स्पिनरची जगभरात हवा होती. पण त्यांच्या बॉलिंगच्या यशाचं बरचस श्रेय एकनाथ सोलकरच्या फिल्डिंगला ही जाते. त्याला फोरवर्ड शोर्ट लेगवर उभेराहिलेलं बघून भलेभले दिग्गज फलंदाज दबावात यायचे आणि त्यातच विकेट फेकून आउट व्हायचे.

त्याच वर्णन Most Fearless Person in cricket असं केलं जायचं.

त्याचा सेन्स ऑफ ह्युमर सुद्धा खूप ताजातवाना होता. फोरवर्ड शोर्ट लेगवर राहून त्याने भारतीय क्रिकेटमध्ये स्लेजिंगला सुरवात केली. पूर्वी भारतीय खेळाडू फक्त ऐकून घ्यायचे. पण एकनाथ सोलकर आपल्या कच्च्या इंग्रजीमध्ये विरोधी फलंदाजाला झोंबणारी कमेंट मारायचा. ते ऐकूनही फलंदाज चिडीला यायचे आणि खराब फटका मारून आउट व्हायचे. यातून बऱ्याचदा गंमतीशीर किस्से घडायचे.

असाच एक किस्सा सोलकरचे शाळेत असल्यापासूनचे मित्र आणि भारताचे महानायक सुनील गावस्कर यांनी सांगितलं आहे

भारताचा वेस्ट इंडीजचा दौरा सुरु होता. तिथल्या सुपरफास्ट पीचवर खेळणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. त्यावेळचा सुपरस्टार क्रिकेटर गॅरी सोबर्स तेव्हा फुल फॉर्म होता. सोलकर बॅटींग आला. त्यादिवशी सोलकरला सोबर्सची बॉलिंग काही केल्या खेळायला जमत नव्हते. बऱ्याच बॉलला तर टचदेखील करायला जमत नव्हते. त्याची बॅटींग बघून सोबर्स वैतागला. तो सोलकर च्या जवळ जाऊन म्हणाला,

“एक्की जी तुझ्या हातात आहे तिला बॅट म्हणतात. त्याचा वापर चेंडूला टोलवण्यासाठी केला जातो. कमीतकमी त्याने बॉलला टच तरी कर. का किपरला दमवतोयस?”

एवढ बोलण ऐकून घेईल तो सोलकर कसला ! त्याने धिप्पाड सोबर्सला जास्त शहाणपणा न करता स्वतः स्वतःचा गेम खेळायचा सल्ला दिला . आता सोबर्स आणि सोलकर यांच्यात भांडण होनार म्हणून  बाकीचे खेळाडू घाबरले. पण सोलकरचा हजरजबाबीपणाला सोबर्स ने हलकीशी स्माईल दिली आणि वातावरण निवळल.

एकनाथ सोलकर आणि इंग्लंडचा सर्वात फेमस ओपनर जेफ्री बॉयकॉट यांची रायव्हलरी तर खूप गाजली . दोघे एकमेकांना भरपूर स्लेज करायचे. एकनाथ तसा पार्टटाईम बॉलर. पण एकदा एका सिरीज मध्ये जेफ्री बॉयकॉटला त्याने सलग तीन वेळा आउट काढले. तिसऱ्यांदा आउट काढल्यावर तर त्याने i got you bloody असं ओरडत जोरदार जल्लोष केला. एका पार्टटाईम बॉलरन केलेला हा अपमान जेफ्री बॉयकॉट कधीच विसरू शकला नाही.

जेफ्री बॉयकॉटने रिटायरमेंट नंतर  कॉमेट्री मध्ये नाव कमावलं. त्याला आपल्या फलंदाजीचा भलताच अभिमान होता. रवी शास्त्री म्हणतो कोमेंट्रीबॉक्स मध्ये जेफ्री बॉयकॉट स्वतःच गुणगाण गाऊ लागला तर बाकीचे कॉमेंटेटर त्याच्या पुढे एकनाथ सोलकरचं नाव काढायचे. एकनाथ सोलकरचं नाव ऐकलं तरी जेफ्री बॉयकॉटची बोलती बंद व्हायची. 

solkar
स्त्रोत. फर्स्टपोस्ट

एकनाथ सोलकर फियरलेस होता याचा अर्थ तो अॅरोगंट होता असं नव्हत. आपल्या कप्तानाला कधी त्याने ‘नाही’ हे उत्तर दिले नाही.  फास्ट बॉलिंग चांगली खेळतो म्हणून कधी त्याला ओपनिंग ला बॅटींगला पाठवण्यात आलं तर कधी गरजेनुसार मेडियम, फास्ट, स्पिन बॉलिंग टाकावी लागली. जिथे कमी तिथे आम्ही हे सूत्र त्यान आयुष्यभर जपलं. त्यामुळेच सगळ्याच भारतीय कर्णधारांचा, गोलंदाजांचा तो सगळ्यात आवडता खेळाडू होता.

एकनाथ सोलकरच्या फिल्डिंगमुळे भारताने अनेक सामने जिंकले. फक्त कॅचेसचं नाही तर त्यांनी अडवलेल्या धावा, रणआउट हे जगभर नावाजले गेले. फिल्डिंगचं व्याकरण सोलकर याच्यामुळ बदललं गेलं. फक्त क्षेत्ररक्षण एखादा सामना जिंकून देऊ शकते हे पहिल्यांदाच घडत होत. 

जॉंटी ऱ्होडसं सारखे कित्येक फिल्डर आजही आपला आदर्श एकनाथ सोलकर यांना मानतात. आज भारतीय फिल्डिंगमध्ये जो आत्मविश्वास दिसतो त्याचं श्रेय एकनाथ सोलकर यांना नक्की जात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.