जिथे ३५ रुपयांसाठी मजुरी केली आज तिथेच कोरोनाशी लढण्यासाठी भलंमोठ सेंटर उभारलं.

मुनाफ पटेल. भारतीय क्रिकेटचा दुर्लक्षित झगमगता तारा. तो आला तेव्हा त्याची हवा झाली होती की त्याची एॅक्शन सेम टू सेम ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्रा प्रमाणे आहे. तीच अॅक्युरसी, तीच लाईन आणि लेन्थ, त्याच्याहून भन्नाट स्पीड.

२०११ च्या वर्ल्डकप जिंकण्यात जेवढा सचिन, युवराज, धोनी यांचा वाटा आहे, तितकाच वाटा झहीर आणि मुनाफच्या बॉलिंगला देखील आहे.

पण मुनाफ पटेलचा भारतीय टीम पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

गुजरातच्या इखर या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला. घरी अठराविश्वे दारिद्य. सगळ्या गावाची स्थिती अशीच. छोटा मुनाफ बाकीच्या मित्रांबरोबर गुरं राखायला जायचा. तिथ टाईमपास म्हणून सगळे काही ना काही खेळत बसायचे. धावण्याची शर्यत असली की मुनाफ सगळ्यांना सहज हरवायचा.

नंतर नंतर त्याला धावण्याच एवढ वेड लागल की एकटाच अनवाणी धावत सुटायचा आणि जवळपास १५-२० किलोमीटर धावून परत यायचा. त्याचे मित्र त्याला वेडा म्हणायचे. पण मुनाफ म्हणतो,

“क्या करे. मुझे पता था, भागने के सिवा मुझे कुछ नही आता है.”

शाळेत सुद्धा अशीच प्रगती होती. मास्तरच्या छडीच्या भीतीने मुनाफ शाळेलाच जायचा नाही. अखेर  मुनाफ सातवी आठवी मध्ये असताना घरच्यांनी गावातली इतर मुले जातात त्याप्रमाणे एका टाईल्सच्या फॅकट्रीमध्ये त्याला कामाला लावल.

मुनाफ पटेल फक्त ३५ रुपयाच्या रोजंदारीवर त्या कारखान्यात आठ आठ तास मजुरी करू लागला.

वडील दुसऱ्याच्या शेतात राबायचे. मुनाफला व त्याच्या भावंडाना जर दोन वेळच जेवण हवं असेल तर मजुरीशिवाय पर्याय नव्हता.

दिवसभर काम करून आल्यावर संध्याकाळी गल्लीत मित्र क्रिकेट खेळायचे. मुनाफ सुद्धा त्यांच्यात सामील व्हायचा. मालकाच्या खालेल्ल्या शिव्या, ढोरमेहनतीमुळे दुखणारे अंग यामुळे बेजार झालेला मुनाफ दातओठ खाऊन बॉलिंग टाकायचा.

मनात साठलेला सगळा राग अंगार बनून बाहेर पडायचा. त्याची तुफानी बॉलिंग खेळायला कोणीही बॅट्समन तयार व्हायचं नाही. 

एकदिवस त्यांच्याच गावातल्या एका युसुफभाई नावाच्या एका बरी परिस्थिती असलेल्या माणसाने मुनाफला बॉलिंग करताना पाहिलं. त्याने मुनाफ साठी ४०० रुपयांचे बूट विकत आणले. हे मुनाफ पटेलच्या आयुष्यातले पहिले बूट. एवढच नाही तर युसुफ भाई यांनी त्याला बडोद्याला नेलं, एका क्रिकेट क्लबमध्ये त्याचा शिरकाव केला. त्यांचे हे आभाळाएवढे उपकार मुनाफ कधीही विसरू शकत नाही.

तिथून मुनाफने मागे वळून पाहण्याचे कारण नव्हते.

मुनाफला फक्त वेग माहिती होता, बडोद्यात तो लाईन आणि लेन्थ शिकला. बडोद्याचेच माजी क्रिकेटर किरण मोरे तेव्हा सिलेक्शन कमिटीमध्ये होते. त्यांनी त्याला चेन्नईमध्ये भरलेल्या डेनिस लिली यांच्या MRF पेस फौंडेशनला पाठवल.

एकदा सचिनने मुनाफला बॉलिंग करताना पाहिलं. त्याची एॅक्शन बघून तो प्रचंड प्रभावित झाला. मुनाफची भारतातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या रणजी टीमसाठी थेट निवड करण्यात आली. सचिन मुळ त्याचं आयुष्य बदलून गेल.

पुढच्या काही वर्षात मुनाफ भारतीय क्रिकेट टीमसाठी खेळताना दिसू लागला.

पण गंमत म्हणजे मुनाफला भारताच्या निळ्या जर्सीमध्ये खेळताना पाहायला त्याच्या शेतकरी बापाकडे टीव्हीदेखील नव्हता.

अनेकदा आपण अशा परीकथा लहानपणी अनेकदा ऐकलेल्या असतात. पण मुनाफसाठी ही परीकथा खरी ठरली होती. मजुरी करणाऱ्या खेड्यातला अडाणी मुलगा ज्याची बूट घेण्याचीसुद्धा ऐपत नव्हती तो सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशातून फक्त ११ जणांच्या टीमचा भाग झाला होता.

आजवर भारतीय टीममध्ये मुंबई,दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर अशा मोठ्या शहरातल्या खेळाडूंचा समावेश असायचा. रांचीचा धोनी, बडोद्याचा इरफान या सारख्या छोट्या शहरातले खेळाडू दिसू लागले तर मुनाफमुळे अगदी खेडेगावातली मुले टीममध्ये आली.

२००७ ला मुनाफ आपला पहिला वनडे वर्ल्ड कप खेळला.

तो वर्ल्डकप म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सर्वात वाईट आठवण. आपण बांगलादेशकडून त्या वर्ल्डकपला हरलो. पहिल्या फेरीत वर्ल्डकप मधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. धोनी, सचिन,  द्रविड यांच्या घरावर दगडफेक झाली. प्रत्येक खेळाडूला संरक्षण देण्यात येत होते. सचिनने मुनाफ पटेल ला विचारले,

“मुन्ना तुम्हारी सिक्युरिटी का क्या कंडीशन है?”

मुनाफ म्हणाला,

“पाजी मै जहां रहता हुं वहां आठ हजार लोग रहते है. और वो ८ हजार लोगही मेरी सिक्युरिटी है.”

मुनाफचे आपल्या गावावर आणि गावकऱ्यांचे मुनाफवर एवढे प्रेम आहे.

पुढे इंज्युरीमुळे मुनाफची कारकीर्द डळमळली. त्याचा स्पीड कमी झाला तरीही आपल्या अॅक्युरसीच्या जोरावर त्याने २०११ च्या वर्ल्डकप मध्ये अनेक सामने जिंकून दिले. भारताने वर्ल्ड कप उचलला तेव्हा संपूर्ण देशात प्रचंड जल्लोष झाला.

D3JRtFJX4AEHY6g

मुनाफच्या इखरमध्ये दिवाळी आणि ईद एकत्रच साजरी झाली. 

गेल्या वर्षी मुनाफ पटेल रिटायर झाला. पण निवृत्ती नंतरही तो आपल्या गावी बांधलेल्या घरात राहतो. शेतात काम करतो, मित्रांबरोबर गावातल्या चौकात उभ राहून गप्पा मारतो, त्यांच्या बरोबरच खेळतो. असच शांत निवांत आयुष्य चालू आहे. त्याच्या घरी मदत मागायला गेलेला प्रत्येकजण मोकळ्या हाती परतत नाही.

munafin
source- indian express

मात्र काही दिवसापूर्वी जगाला छळत असलेलं कोरोनाच संकट त्याच्या गावालाही येऊन धडकल.

गुजरातच्या एवढ्या कानाकोपऱ्यात असलेल्या इखरमध्ये कोरोना येईल अस कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हत. पण मजुरीसाठी तामिळनाडू गेलेले काही तरुण गावाकडे परत आले आणि त्यांच्यासोबत कोरोनाने त्या छोट्या खेड्यात प्रवेश केला.

गावातील बहुसंख्य जनता अडाणी, त्यांना सोशल डिस्टंसचा अर्थ समजत नव्हता न त्याच महत्व कळत होत. त्यात शेतात पिक कापणीला आलं होत. यासगळ्या गडबडीत कोरोनाचा विषाणू भयानक वेगाने पसरला.

अखेर गावचा हिरो मुनाफ पटेल समोर आला.

रोज ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्याने लोकांना आवाहन करण्यास सुरवात केली. रस्त्यावर उतरून हातात माईक घेऊन लोकांना समजावून सांगण सुरु केलं. आपला लाडका मुनाफ सांगतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनी लॉकडाऊनच व्यवस्थित पालन करण्या सुरवात केली.

मुनाफ फक्त  जनजागृती करत होता अस नाही तर त्याने गावात ४० बेडचं एक अत्याधुनिक कोव्हीड सेंटर उभारलंय. इथे लोकांना क्वारंटाईन होण्याची सोय केली गेली आहे. इथे राहणाऱ्या सर्वांचा अगदी खाण्यापिण्यापर्यंतचा सगळा खर्च मुनाफ पटेल उचलत आहे.

115929833 3177658308967612 54499491748155815 o

मुनाफ पटेलने क्रिकेटमध्ये काही खूप पैसा कमवला नाही. इतर खेळाडूंप्रमाणे तो कधी प्रचंड प्रकाशझोतात नव्हता न कधी त्याला टीव्ही जाहिराती मिळाल्या. पण मुनाफने जे काही कमवल ते गावाच्या जीवावर हे त्याला पक्क ठाऊक आहे. म्हणूनच तो म्हणतो,

“ये संकट की घडी नही, ये घडी एहसान चुकाने की घडी है.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.