मुंडेनी दोस्ताच्या मैत्रीखातर मुलीचं नाव ‘प्रीतम’ ठेवलं.

गोपिनाथ मुंडे म्हणजे जिंदादिल माणूस. कायम लोकांच्या गोतावळ्यात वाढला. अगदी तळागाळातल्या ऊस तोडणी कामगारापासून ते विलासराव देशमुख यांच्या सारख्या राजकीय विरोधकापर्यंत प्रत्येकाला त्यांनी आपलेसे केले होते.

प्रत्येकाला बरोबरीने घेऊन जाण्याची हातोटी त्यांनी साधली होती. यामुळेच आजकालच्या द्वेषाने टोकाला गेलेल्या राजकारणातही त्यांचा दोस्तांचा लोकसंग्रह प्रचंड मोठा होता.

असाच त्यांच्या दोस्तीचा एक किस्सा.

प्रमोद महाजन हे देखील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे दिलखुलास व्यक्तिमत्वाचे. यामुळेच दोघांचे सूर जुळले. राजकारणात त्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या खेडोपाडी तर पोहचवलच पण वैयक्तिक आयुष्यातही त्यांचे ऋणानुबंध तयार झाले होते.

पुढे जाऊन गोपीनाथजींचा प्रमोद महाजन यांच्या बहिणीशी म्हणजे प्रज्ञा यांच्याशी विवाह झाला. दोस्तीचे नात्यात रुपांतर झाले. 

एका रक्षाबंधनाची गोष्ट. प्रमोद महाजन दरवर्षी प्रज्ञा मुंडे यांच्या कडे राखी बांधून घेण्यासाठी जायचे. त्या रक्षाबंधनाला प्रमोदजी आपल्या एका मित्राला देखील मुंडेंच्या घरी घेऊन आले.

हा मित्र म्हणजे दादरच्या सुप्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली. प्रमोदजींची राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्याशी खास मैत्री होती.

मागे एकदा गप्पांच्या ओघात महाजनांना कळालं की कुलवंतसिंग यांना बहिण नाही म्हणून त्यांनी थेट आपल्या बहिणीला त्यांना राखी बांधायला लावली. प्रज्ञा मुंडे यांनी देखील आपल्याला एक नवीन भाऊ मिळाला म्हणत तेव्हा पासून दरवर्षी त्यांना रक्षाबंधनाला राखी बांधायला सुरवात केली.

प्रमोद महाजनांमुळे गोपीनाथजी यांचे कोहली कुटुंबाशी घरचे नाते निर्माण झाले.

या सगळ्यांना जोडणारा दुवा होतं कोहली यांचं प्रीतम हॉटेल. मुंबईत पंजाबी जेवणाची मुहूर्तमेढ याच हॉटेलने घातली. राज कपूर, दिलीप कुमार, सुनील दत्त, शम्मी कपूर असे पंजाबी फिल्मी व्यक्ती कुलवंतसिंग कोहली यांचे मित्र होते. मात्र पंजाबी वर्तुळाबाहेर  असलेले मुंडे- महाजन यांच्याशी त्यांच नात अनोखं होतं.

दादरमध्ये असलेल्या या प्रीतम हॉटेलमध्ये अनेकदा गोपीनाथजी प्रमोद महाजन जेवायला जायचे. भाजपच्या गोपनीय मिटिंग देखील येथेच व्हायच्या. इतकच काय ज्या ज्या दिवशी संपूर्ण मुंडे कुटुंब मुंबईहून बीडला जायला दादर स्टेशनला येत असत तेव्हा हमखास जेवण प्रीतममध्येच करत मगच ट्रेन पकडत.

गोष्ट १९८२ सालची आहे.

गोपीनाथ मुंडे आपल्या गरोदर पत्नीसह बीडला जायला निघाले होते. दादर नांदेड ट्रेन होती मात्र प्रज्ञा यांची प्रकृती थोडी अस्वस्थ आहे म्हणून ते पहिल्यांदा कुलवंतसिंग कोहली यांच्या घरी आले. त्या फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेल्या.

प्रज्ञा मुंडे यांना थकवा आला होता त्यामुळे नेहमी पेक्षा जास्त वेळ त्या तिथे थांबल्या. कुलवंतसिंग यांच्या कुटुंबाने गोपीनाथजीना सर्व काही ठीक आहे ना असे विचारले. घामाने थबथबलेल्या प्रज्ञा यांना पाणी दिल. तेव्हा गोपीनाथ मुंडे आपल्या नेहमीच्या स्टाईलने गडगडाटी हसत म्हणाले,

“कोहलीजी, इस बार बेटा हुआ या बेटी, मैं उसका नाम ‘प्रीतम’ रखूंगा! “

पुढच्या काही महिन्यातच मुंडे दांपत्याला एक गोड कन्यारत्न झाल.

मुंबईत आल्या आल्या त्यांनी तिला कुलवंतसिंग यांच्या हातात दिल आणि गंमतीने म्हणाले,

कोहलीजी, ही ‘प्रीतम’! तुमच्या हॉटेलची मालक आहे आता!’’ 

आपल्याला मित्राला दिलेला शब्द पाळायचा म्हणून त्यांनी मुलीचं नाव प्रीतम ठेवल होतं. कुलवंतसिंग भारावून गेले.

कोहली व मुंडे- महाजन कुटुंबाची मैत्री अनेक वर्षी टिकली.

अगदी मुंडे यांच्या मुलांच्या लग्नात प्रमोदजीच्या बरोबरीने मामाचा मान कुलवंतसिंग यांना देखील होता. प्रीतम मुंडे यांच्या लग्नापूर्वी प्रमोद महाजन यांचे निधन झाले होते.  तेव्हा प्रीतम यांच्या लग्नात मुलीचा मामा म्हणून करायच्या सर्व गोष्टीचा कुलवंतसिंग यांनी केल्या.

पुढे कालांतराने गोपीनाथजी यांचा मृत्यू झाला. मुंडे कुटुंबाच्या पुढच्या पिढीने म्हणजेच पंकजाताई, डॉ.प्रीतमताई यांनी हे ऋणानुबंध असेच पुढे चालवले. मंत्रीपद, खासदारकी सारखे सत्तेची पदे मिळूनही त्याचा दर्प कधी जाणवला नाही. कुलवंतसिंग कोहली कधी भेटले तर या वयोवृद्ध व्यक्तीला अगदी सगळ्यांसमोर खाली वाकून नमस्कार करायला त्यांना कधी लाज वाटली नाही.

मुंडे-महाजन हे कायम सर्वसामान्य माणसांचे आप्त राहिले व त्यांच्या मुलीही हाच संस्काराचा वारसा पुढे चालवताना दिसत आहेत.

संदर्भ- कुलवंतसिंग कोहली यांनी लोकरंग या पुरवणीत मुंबई मेरी जान या सदरात हा किस्सा सांगितलेला आहे.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Baban bargaje says

    जिंदादिल व मोठ्या मनाचा माणूस स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ जी मुंडे साहेब. लाखो जनमनावर आपलं अधिराज्य गाजवणारा माणूस गेला खूप वाईट झालं

Leave A Reply

Your email address will not be published.