मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते पण मनमोहन सिंग यांनी नकार दिला…

गोष्ट आहे २०११ सालची. मुंबईत आझाद मैदानावर शिवशक्ती भीमशक्ती मेळावा भरवण्यात आला होता. शिवसेना भाजप युतीचे सगळे दिग्गज नेते उपस्थित होते. रामदास आठवले आणि त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते युतीत सामील होत होते.उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, एकनाथ खडसे,  या महामेळाव्याला भाजपच्या एका मोठ्या नेत्याची कमतरता भासत होती. त्याची चर्चा थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत झाली.

ते नेते होते गोपीनाथराव मुंडे.

मुंडे तेव्हा दिल्लीत होते आणि काँग्रेस मध्ये प्रवेशाची तयारी करत होते.

गेली अनेक वर्षे भाजपचे महाराष्ट्रातले राजकारण मुंडे महाजन या दोन नावाभोवती फिरत होतं. अगदी कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी बहुजन ओबीसी समाजाच्या तरुणांना भारतीय जनता पक्षात आणलं. काहीच अस्तित्व नसलेल्या भाजपला उभं केलं ते मुंडे आणि महाजनांनी. महाजन केंद्रात आणि मुंडे महाराष्ट्रात अशी त्यांच्यात वाटणी देखील झाली होती. वाजपेयींच्या पासून ते नगरसेवक पदावर असलेल्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचा सहज संपर्क होता.

पण २००६ साली प्रमोद महाजनांचा त्यांच्या भावाने हत्या केली आणि संपूर्ण .देश हादरला. आपला जिवाभावाच्या मित्राच्या जाण्याने मुंडेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर अनेक राजकीय समीकरणे बद्लार होती. या दोघांचे पंख कापावेत यासाठी भाजपमध्ये प्रयत्न चालू होतेच पण महाजनांच्या मृत्यूमुळे त्यांना आयती संधी चालून आली.

पुढची चार पाच वर्षे महाराष्ट्रात आणि केंद्रात याच दिशेने प्रयत्न झाले. अशातच त्यांच्यापेक्षा ज्युनियर असणाऱ्या नितीन गडकरींना भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपद दिले आणि त्यांची ताकद वाढवण्याचं काम करण्यात आलं. पण पॉवर बॅलन्स साधण्यासाठी मुंडेंना लोकसभेचे उपनेतेपद देण्यात आलं. पण तरी त्यांचं समाधान झालं नाही.

मधल्या काळात मुंडे अनेकदा नाराज झाले. पक्ष सोडून जाणार याच्या वावड्या उठल्या. पण ऐनवेळी कोणी ना कोणी मध्यस्ती करून त्यांना थांबवलं होतं. पण २०११ ला याचा कडेलोट झाला.

कारण ठरलं होतं पुण्यातील भाजप शहर अध्यक्षपद.

मुंडेंचे कार्यकर्ते असणाऱ्या योगेश गोगवले यांना डावलून प्रा.विकास मठकरी यांची निवड करण्यात आली होती. यामागे गडकरी व तावडे आहेत हे स्पष्ट होतं. ही निवडही मुंबईतील पक्ष कार्यालयाच्या बाहेरून जाहीर झाली होती.

”ज्या पद्धतीने ही निवड झाली, तो एका अर्थाने मुंडे यांना डिवचण्याचाच प्रकार आहे,” अशी टीका मुंडे यांच्या एका निकटवतीर्याने केली.

पांडुरंग फुंडकर यांचे विरोधी पक्ष नेते पद यावरूनहि काही काळ वाद सुरु होता. भाजप मधले दोन्ही गटाचे नेते आमनेसामने येत होते पण खरी ठणगी या नियुक्ती मुळे पडली. पुण्यात शिवशक्ती भीमशक्तीच्या बैठकीसाठी आलेले मुंडे त्यात सहभागी झालेच नाहीत.

नाराजीचे लोण राज्यभरात पसरले. ‘पक्षात ओबीसी बहुजनांना स्थान आहे, की नाही, याची शंका येत आहे,’ असा प्रश्न मुंडे यांच्या गोटातून विचारण्यात येऊ लागला.

या सगळ्यामागे मोठं राजकारण सुरु आहे असं म्हटलं जात होतं.

झालं असं होते की मुंडेंना शह देण्यासाठी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी उमा भारतींना पक्षात परत आणलं होतं. एवढंच नाही तर उमा भारतींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या प्रचाराची धुरा दिली होती. त्यामुळे साहिजिकच गोपीनाथ मुंडेंच्या भाजप कार्यकारिणीतल्या सर्वात मोठे ओबीसी नेतेपद धोक्यात आलं होतं.

थोडक्यात आता एक घाव दोन तुकडे करायचे म्हणून गोपीनाथराव मुंडे यांनी ठरवलं. मुंबईत शिवशक्ती भिमशक्ती मेळावा होत होता आणि मुंडे दिल्लीला आले होते.

तिथे त्यांच्यासाठी मोर्चेबांधणी करत होते जीवाचे मित्र विलासराव देशमुख. मुंडेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख केंद्रात ग्रामीण विकास मंत्री होते. त्यांनीच गोपीनाथ मुंडेंची प्रणब मुखर्जी यांच्याशी भेट घालून दिली. माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, पाशा पटेल असे पाच सहा आमदार मुंडे याच्यासोबत कॉंग्रेस मध्ये जाण्याच्या तयारीत होते.

सगळं ठरलं होतं पण अचानक बातमी आली की मुंडेंचा काँग्रेस प्रवेश बारगळला. विलसराव देशमुखांनी फिल्डिंग लावून देखील मुंडे यांनी भाजप सोडली नाही. पुढच्या दोन तीन वर्षात ते भाजपकडून केंद्रात मंत्री देखील झाले.

मधल्या मध्ये काय जादू घडली हा प्रश्न अनेकांना सतावत राहिला.

पुढे अनेक वर्षांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तेव्हा नेमकं काय घडलं याबद्दल गौफ्यस्फोट केला. ते सांगतात कि तेव्हाचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश रद्द झाला होता.

यामागे कोणतेही राजकीय कारण नव्हते तर फक्त तात्विकदृष्ट्या त्यांना पक्ष फोडणी पटलं नव्हतं.  मुंडे त्यावेळी लोकसभेतील उपनेते होते. असे विरोधी पक्षाला फोडणे योग्य नाही असे नमूद करीत मनमोहनसिंग यांनी मुंडे यांना पक्षात घेण्यास मनाई केल्याने त्यांचा कॉंग्रेस प्रवेश रहित झाला.

पण काँग्रेस जरी घेत नसेल तरी आपण भाजप सोडणार असं मुंडे म्हणत होते. पण सुषमा स्वराज यांनी दिल्लीतच त्यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.