गोपीनाथ मुंडे म्हणाले, भाजप आता मुंडे -फडणवीस यांचा नाही तर पाटलांचा देखील पक्ष झाला आहे

आधीचा जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष… तशी या पक्षांची १९७०-८० च्या दशकातील ओळख म्हणजे ‘शेटजी-भटजीं’चा पक्ष अशीच होती. म्हणजे, ब्राह्मण आणि मारवाडी समाज भाजपसोबत असायचा. एक प्रकारे त्यांचा हक्काचा मतदारचं होता. पुढे ८० च्या दशकात वसंतराव भागवत यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपला इतर मागासवर्गीयांमध्ये पोहोचवलं.

यातुनच महाराष्ट्रात माळी-धनगर-वंजारी (माधव) फॉर्म्युलाचा उगम झाला. पुढे गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, माधवराव शिवणकर यांसारखे नेते आले. त्यामुळे ओबीसी समाज देखील भाजपसोबत आहे असं म्हंटलं जावू लागलं…

या सगळ्यामुळेच एक वेळ महाराष्ट्रात अशी आली होती की भाजपला मुंडे – फडणवीस यांचा पक्ष म्हणून ओळखलं जावू लागलं होतं… पण २०१४ च्या निवडणूकांआधी हि ओळख मुंडेंनी स्वतः बदलून टाकली आणि जाहिर केलं की,

भाजप आता मुंडे – फडणवीसांचा नाही तर पाटलांचा देखील पक्ष झाला आहे.. याचं वाक्याचं कारण जेवढं राजकीय होतं तेवढचं मजेशीर देखील होतं.

२०१३ – १४ मध्ये देशात काँग्रेसविरोधी वातावरण तापू लागलं होतं. तर त्याचवेळी महाराष्ट्रात हे वातावरण काँग्रेस सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात देखील तापू लागलं होतं. यातूनच आता २०१४ च्या निवडणूकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सत्ता मिळणार हे जवळपास नक्की झालं होतं.

त्यामुळे या राजकीय वऱ्याची दिशा ओळखून निवडणूकांच्या तोंडावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. त्यातच गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादी यांच्यात विळ्या-भोपळ्याचं नातं. त्यामुळे मुंडे एक प्रकारे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर डोळा ठेवून होते.

याबद्दल मुंडेंनी जाहीररित्या बोलून देखील दाखवलं. ते म्हणाले,

मी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागलो असून पवार काका-पुतण्यांना निवडणूक काळात पश्चिम महाराष्ट्रातून बाहेर पडू देणार नाही. त्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणारच..!!

अशातच पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते आणि विधानपरिषदेवर आमदार असलेले संजय काका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्यासोबतच खेड-गुहागरचे माजी भाजप आमदार विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार डी. बी. पाटील, मराठवाडा विकास मंचचे अध्यक्ष दिलीप माने, सटाणा मधील डॉ. संजय पाटील, बीडचे अमित उसगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

एकाच वेळेस तीन दिग्गज पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यावेळी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

त्याचवेळी गोपीनाथ मुंडे यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एक पाटील आपल्या पक्षात घेतले. ते होते त्यावेळचे राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील. त्यांनी देखील निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला.

कपिल पाटील यांचा यांचा पक्ष प्रवेशच्या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे आपल्या गमतीशीर स्वभावात म्हणाले,

मागच्या काही दिवसात पाटलांनी केलेल्या पक्षप्रवेशांमुळे भाजप आता केवळ मुंडे-फडणवीसांचा पक्षा राहिलेला नाही तर तो आता पाटलांचा देखील पक्ष झालेला आहे.

यामागे राजकीय कारण देखील दडलं होतं. यात एकूणच मुंडे यांना यातून मराठा समाजाला तर भाजपकडे वळवायचं होतचं. पण त्यासोबत भाजपाची ब्राह्मण आणि ओबीसी समाजाचा पक्ष अशी असलेली ओळख देखील बदलायची होती. आज जर आपण भाजपकडे बघितलं तर मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.