मुंडे म्हणायचे, “मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते”

विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे म्हणजे महान लोकनेते. दुष्काळी मराठवाड्यातून आलेल्या या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला, आज दोघांच्याही मृत्यूनंतर एवढे वर्षे झाले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही कमतरता आलेली नाही.

दोघे दोन वेगवेगळ्या पक्षाचे होते, त्यांची विचारसरणी वेगळी होती, तरीही त्यांच्या दोस्तीचे अनेक किस्से अजरामर झालेले आहेत. असाच एक किस्सा त्यांच्या मैत्रीतील बंध उलगडणारा.

विलासराव बाभळगाव लातूरचे तर गोपीनाथराव परळीचे. दोघेही एकाच भागातले, तसं बघायला गेलं तर शेजारी-शेजारी. वयानेही तसे समवयस्क. पुण्यात कॉलेजला असताना त्यांची ओळख झाली असावी.

वरवर पाहिलं तर जिवाभावाची मैत्री जुळावी असा कोणताही समान धागा त्या दोघांमध्ये नव्हता. गोपीनाथराव यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता, तर विलासराव हे देशमुखी ऐश्वर्यात वाढले होते.गोपीनाथराव मुंडे हे ओबीसी समाजातून आलेले तर विलासराव हे प्रस्थापित मराठा समाजाचे.

दोघांच्याही राजकारणाची सुरवात मात्र एकाच काळात झाली.

गोपीनाथराव मुंडे हे अखिल भारतीय विद्यार्थी चळवळीतून घडले, आणीबाणीच्या कठोर कारावासात तलावून सुखावून त्यांचं नेतृत्व घडलं. तर विलासरावांनी गावच्या सरपंचपदापासून राजकारणात पाय जमवायला सुरवात केली.

गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर हिंदुत्वाची मशाल आपल्या खांद्यावर वाहिली तर विलासराव काँग्रेसच्या पुरोगामी विचारांवर ठाम राहिले.

अशा अनेक बाबतीत त्यांच्यात विषमता असूनही त्यांच्या मैत्रीत कधी अंतर पडले नाही.

दोघेही १९७८ साली जिल्हा परिषदेवर एकदम निवडून गेले.

पुढच्या दोनच वर्षात त्यांच्या कामाचा झपाटा बघून त्यांच्या पक्षाने आमदारकीची तिकिटे दिली. मुंडे आणि देशमुख दोघेही एकाच वेळी आमदार म्हणून निवडून आले.

अस म्हणतात की त्यांनी त्याही काळात एकमेकांना निवडणुकीत मदत केली होती.

याचाच परिणाम दोघांनीही आपापल्या मतदारसंघात जुन्या नेत्यांना पाडून स्वतःचे राज्य सुरू केले.

निवडून आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा ते अभिमानाने भारावून गेले होते. या तरुण आमदारांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार पुढे आले.

तेव्हा गोपीनाथ मुंडे पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. तर विलासरावही तसाच पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. फरक इतकाच होता तो म्हणजे विलासरावांनी त्यावर काळे बंद गळयाचे जॅकेट घातले होते.

दोघे समोरासमोर आले आणि एकमेकांना मिठी मारली. दोघेही देखणे होते. बाजूच्या लोकांनी सांगितले,

‘‘दोघे सारखेच दिसता. फरक एकच. विलासराव तुम्ही जॅकेट घातल्यामुळे जरा वेगळे दिसत आहात.’’

दुस-या दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वी पुन्हा दोघे जण भेटले.

आजूबाजूला इतर आमदारांचे कोंडाळे होते. इतक्यात विलासरावांनी आपल्या सहायकाला हाक मारली. तो जवळ आला तशी विलासरावांनी त्याच्या हातातील बॅग घेतली. ती उघडली आणि आपण जसे जॅकेट घातले होते, तसेच जॅकेट त्यांनी बॅगेतून काढले आणि मुंडे यांच्याकडे सोपवले.

तिथेच ते मुंडेंना घालायला लावले आणि पुन्हा कडकडून मिठी मारली आणि उपस्थित आमदारांना विचारले,

‘आता दिसतो का आम्ही सारखे?’

सर्वच जण खळखळून हसले. तेव्हापासून गोपीनाथ मुंडेही जॅकेट घालू लागले. विलासरावांचे निधन झाले तेव्हा मुंडे यांनी ही आठवण सांगितली व भावुक होऊन म्हणाले,

“मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.