अख्ख्या महाराष्ट्रात भाई जगताप हे पहिले कामगार नेते आहेत ज्यांना पोलीस प्रोटेक्शन आहे…

मुंबई आणि कामगार चळवळी यांचं जुनं नातं आहे. भारतात कामगारांची चळवळ इथंच सुरु झाली. गेली शंभर वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भाषा बोलणारी, संस्कृती असणारी करोडो जनता पोट भरण्यासाठी  मुंबईत आली. इथल्या कापड गिरण्यामध्ये नोकरीला लागली.

याच गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या जोरावर डाव्या पक्षांनी मुंबईवर राज्य केलं. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा नेता आपल्या एका इशाऱ्यावर मुंबईला थांबवू शकत होता ते कामगारांच्या ताकदीच्या बळावर. मुंबई जिंकायची तर कामगारांना जिंकलं पाहिजे याच सूत्रानुसार प्रत्येक पक्ष काम करत होता. या महानगरीने अनेक कामगार नेते दिले.

यातच एक नाव म्हणजे अशोक अर्जुनराव जगताप उर्फ भाई जगताप.

मुंबईतल्या कामगार वस्तीत सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेले भाई अगदी लहान वयातच चळवळीत आले. आपल्या अवतीभवती राहणाऱ्या कामगारांची दयनीय अवस्था त्यांच्या संवेदनशील मनाला सतावत होती. याच कामगारांच्या कष्टावर सजलेली मुंबई आणि श्रीमंत झालेले काही लोक यांचा रुबाब व दबाव पाहून भाईंचे मन अस्वस्थ होत होते.

विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. नंतर युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. भारतीय कामगार कर्मचारी महासंघातून त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली.  मुंबईतील इंजीनियरिंग कारखान्यांमध्ये त्यांच्या युनियनने चांगलाच जोर पकडला होता.

साधारण १९८८ पासून त्यांनी रस्त्यावर उतरून कामगारांसाठी लढा उभारला. या काळात त्यांचा संघर्ष सुरु झाला शिवसैनिकांबरोबर.

शिवसेना आणि कामगार संघटनांचा छत्तीसचा आकडा होता. कामगार संघटना आरोप करायच्या की सेना गिरणीच्या मालकांच्या व काँग्रेसच्या इशाऱ्यावर काम करते. तर शिवसेना म्हणायची कि युनियन कामगारांना व तरुणांना संप करायला लावून चुकीच्या मार्गावर नेते. जवळपास तीस वर्षे शिवसेना आणि कामगार संघटना एकमेकांशी लढत होत्या. 

कृष्णा देसाई यांच्यापासून ते अनेक कामगार नेत्यांच्या वर झालेल्या हल्ल्यांना शिवसेना जबाबदार आहे असे आरोप विरोधकांकडून केले गेले.

नव्वदच्या दशकात कामगार चळवळींना घरघर सुरु लागली. अशातच साधारण १९९७ साली सुप्रसिद्ध कामगार नेते कॉ. दत्ता सामंत यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.  संपूर्ण मुंबई मध्ये भीतीचे वातावरण पसरले. गँगस्टर छोटा राजन याचा या हल्ल्यात सहभाग असल्याचं बोललं गेलं.

त्या काळात युती शासन सत्तेत होतं. सेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री गृहमंत्री होते. मुंबईत वाढलेला अंडरवर्ल्डचा सुळसुळाट संपवायची प्रतिज्ञा मुंडेंनी गृहमंत्रीपदावरून केली होती. मोक्का सारखा कडक कायदा, मुंबई पोलिसांना दिलेली सूट यामुळे अनेक गुंडाना एकतर जेलमध्ये टाकलं किंवा यमसदनी धाडलं.

दत्ता सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी कामगार नेते भाई जगताप यांना आपल्या ऑफिस मध्ये बोलावून घेतलं. भाई जगतापांना मित्राकडून निरोप आला कि मंत्रालयातून बोलावणं आलं आहे. भाईंना आश्चर्य वाटलं कारण त्यांचा आणि शिवसेनेचा संघर्ष तर जगजाहीर होता. युती शासनाच्या काळात त्यांच्यावर तब्बल ३८ वेळा हल्ला झाला होता.

थोड्याशा संभ्रमावस्थेत भाई जगताप गृहमंत्र्यांच्या दालनात पोहचले. दोघांच्यात बराच वेळ चर्चा झाली.  यावेळी गोपीनाथ मुंडे उद्गारले,

” भाई तू वेडा झाला आहेस काय ? अजून कितीवेळा पहाडापुढे डोकं आपटणार आहेस? यासाठी संरक्षण घे.”

भाई जगताप यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं. मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या  इतिहासात पोलीस संरक्षण मिळालेला पहिला कामगार नेता म्हणजे भाई जगताप ठरले. तेव्हापासून आज पर्यंत त्यांना हे संरक्षण आहे.

त्यांना दिलेल्या पोलीस संरक्षणावरून युतीच्या नेत्यांमध्ये वाद देखील झाले. पण मुंडेंनी पक्षाचा विचार केला नाही, भाई जगताप विरोधी पक्षाच्या काँग्रेसचे नेते आहेत याचा विचार केला नाही. त्यांना संरक्षण दिल्यामुळे सेनेची नाराजी ओढवली तर त्यांनी फिकीर केली नाही.

दरवर्षी भाई जगताप १ मे रोजी मुंबईत कामगार दिनानिमित्त कार्यक्रम घ्यायचे.त्याची निमंत्रणपत्रिका देण्यासाठी ते जेव्हा मंत्रालयात गेले तेव्हा उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे त्यांना म्हणाले,

आम्ही या कार्यक्रमाला आला तर चालेल ना?

भाईंनी त्यांना सांगितलं,

“मी कामगारांचा नेता म्हणून राज्याच्या प्रमुखाला निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. मी काँग्रेस चळवळीत असेन, शिवसेनेला विरोध करत असेन. मात्र आमचा लढा पक्षाचा नाही तर तो रोजी रोटीचा आहे.”

भाई जगताप यांच्या त्या कार्यक्रमाला मुंडे हजर राहू शकले नाहीत. पण संध्याकाळी असलेल्या जगताप यांच्या कामगार मेळाव्याला मात्र त्यांनी अचानक भेट दिली. जवळपास दिड तास ते या काँग्रेस समर्थक कामगारांच्या सोबत गप्पा मारत होते. त्याच वेळी युती शासनाचा एक कार्यक्रम होता त्याला जाण्यासाठी मुंडेंना उशीर झाला पण याची त्यांनी काळजी केली नाही.

त्यावेळी त्यांचं झालेलं भाषण आजही भाई जगताप यांच्या संग्रही आहे.

भाई जगताप म्हणतात मुंडे माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठे असतील मात्र त्यांनी मला शेवट्पर्यंत मित्रत्वाच्या नात्याने वागवलं. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांप्रमाणे वागणारे राजकारणाबाहेर जाऊन इतरांना मदत करणारे ते एकमेव नेते असतील.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.