जो बूट मारून ‘हिरो’ झाला, त्यालाच बुटानं मारलं !

परवा सकाळ सकाळी टिळक रोडवरच्या सुप्रसिद्ध अमृततुल्य मध्ये चहा घेण्यासाठी गेलो. चहा पिता पिता वर्तमानपत्र पाहिलं.

मुख्य बातमी होती ,

“दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर भाजपा कार्यकर्त्याचा लाल तिखटाचा हल्ला”

घरी मॉर्निंग वाॅक ला जातो म्हणून सांगून नाश्ता आणि गप्पा झोडायला आलेल्या रिटायर्ड आजोबांची तिथे मैफिल जमलेली.  “अमुक अमुक राजकारणी आहे ना त्याला जोड्याने हाणला पाहिजे,” आजोबा आम आदमीसाठी पोट तिडकीने बोलत होते. “नाही हो तो खरा देशाचा उद्धारकर्ता आहे, त्याच्या पेक्षा ढमुक ढमुक पुढारी आहे त्याला चांगला कोल्हापुरी वहानेने चेचला पाहिजे”

वेगवेगळ्या पक्षाच्या समर्थक आजोबांकडून वेगवेगळ्या नेत्यांची आणि चपलांची नावे घेतली जात होती. शेजारच्या चपलाच्या दुकानदार काकांनी गडबडीत दुकान उघडलं. एखादं तरी जोड खपेलंच अशी बिचाऱ्यांना अपेक्षा होती. पुण्यात नवे असावेत. पण काही वेळा नंतर ही हिंसक सभा बरखास्त झाली. आणि सगळे शूरवीर आपापल्या घरी उशिरा आल्याच्या शिव्या खायला  आपापल्या चपला घालून निघून गेले

राजकारण्यांना मारण्याने देशाचे सगळे प्रश्न सुटतील हा भाबडा आशावाद आम्हालाही आवडला. पण तेव्हा असा विचार मनात आला की जगभरात पहिल्यांदा कोणत्या नेत्याला पहिला चपलेचा प्रसाद खायला मिळाला असेल? (आम्हाला नेहमी इतिहासात डोकवायची घाण सवय पेठेत राहायला आल्यापासून लागली आहे. )आता तसं म्हटल तर खूप जन आपल्या गल्लीतल्या नगरसेवकाला कोणी कसा बुटाचा मार दिला हे उदाहरणे सांगतील. पण त्यावर आमचा काही विश्वास नाही.

तर सगळ्या जगाने डोळ्याने पाहिलेला असा पहिला किस्सा घडलेला सर्वशक्तिमान महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर.

१४ डिसेंबर २००८ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे इराक मध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. तेव्हा अचानक एक बूट जोरात त्यांच्या दिशेने आला. गावसकर ज्या चपळाईने विंडीजच्या फायर बॉलरचे बाउन्सर चुकवायचा त्या चपळाईने बुश यांनी तो नेम चुकवला. लगेचच पुढच्या क्षणाला आणखी एक बाउन्सर आला. बुश यांनी तो ही डक केला. फेकणाऱ्याच्या पायातले दोन्ही बूट संपल्यामुळे बुशसाहेब वाचले. काही सेकंदातच बूट फेकणाऱ्याला पकडण्यात आलं.

त्याच नाव होत, मुन्तझर अल झैदी. इराकच्या अल बगदादिया या चॅनलचा वार्ताहर. तो जोरजोरात ओरडत होता,

“This is a farewell kiss from the iraqi people, you dog “

असलं काम एखादा रिपोर्टरच करू शकतो हे ही तितकच खरं! (म्हणूनच काहीजन पत्रकार परिषद घेत नसतील का?)

बूट लागला नाही पण अमेरिकेच्या वर्मी घाव बसला होता. न भूतो न भविष्यती असा अपमान इराकी पत्रकाराने केला होता. हा हल्ला झाल्यानंतर बुश साहेब मात्र शांत होते. स्थितप्रज्ञाप्रमाणे त्यांनी हा अपमानाचा घोट गिळून ती पत्रकार परिषद पूर्ण केली.

अल झैदीची झाडून चौकशी करण्यात आली. युएस सैनिकांनी त्याला बेदम मार दिला पण शेवटी हा एक निरुपद्रवी पत्रकार आहे हे कळल्यावर त्याला ३ वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. पुढे तीही कमी करून त्याला ८ महिन्यात सोडण्यात आले.

अल झैदी बाहेर आला तेव्हा तो जगभरातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरो बनला होता.

आता ऐकताना नवल वाटेल पण बुश यांना मारल्याच्या घटनेने प्रेरित होऊन जगभरात राजकारण्यांना बूट फेकून मारायची चळवळ उभी राहिली. व्हाईट हाऊसच्याबाहेर बुश यांच्या फोटोला बुटाचा मार देऊनच या चळवळीचा शुभारंभ झाला होता.

इराणचे राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद यांच्या पासून ते चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ यांच्या पर्यंत अनेक राजकारणी या चळवळीचे बळी पडले. पाकिस्तानचे पूर्व राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्यावर तर किती वेळा बूट फेकण्यात आले याची तर गणनाच नाही.

भारतात देखील त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अहमदाबादच्या प्रचारसभेत बूट फेकण्यात आले. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री चिदम्बरम यांच्यावर देखील चप्पलफेकीचे प्रयोग झाले. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर तर या गोष्टीने भयंकर रूप घेतले. शरद पवार यांच्यावर शारीरिक हल्ला करण्यात आला. गांधीवादी अण्णा हजारे यांनी अप्रत्यक्षरित्या त्याचे समर्थनही केले.

आता पुढार्यांच्या अंगावर बुटाऐवजी प्रश्न फेकले तर ते जास्त अडचणीत येतात ही साधी सोपी गोष्ट कोणाच्या लक्षात आली नसेल? ज्यांनी या चळवळीला प्रोत्साहन दिले अशानांही आपलेच कडू औषध चाखावे लागले. अण्णा हजारेंचे मानसपुत्र अरविंद केजरीवाल यांना तेव्हाही बुटाचा मार खावा लागला होता.

हे सगळ ज्याच्या पासून सुरु झालं त्या मुन्तझर अल झैदी वर सुद्धा पॅरीस मध्ये बूटफेक झाली.

राजकारणी किती भ्रष्ट आणि राजकारण कसे बाद हे सांगता सांगता या चळवळीचे नेते स्वतःच राजकारणी बनले.  अल झैदीनेसुद्धा इराक मध्ये या वर्षी निवडणूक लढवली पण जनतेने त्याला साथ दिली नाही. आपण गांधीजींच्या विचाराचेच आहोत हे तो आजही सगळ्यांना समजावून सांगण्याच्या प्रयत्नात असतो.

शेवटी गांधीजींना नमस्कार करूनच राजकारण करायचं असत हे त्याला थोडं उशिरा कळालेल दिसतय.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.