१६ वर्ष होतील बघा, पण डोंबिवलीच्या स्नेहल गवारेचा खुनी काही सापडलेला नाही…

डोंबिवली, तसं वर्दळीचं पण काहीसं शांत शहर. आजच्या घडीला डोंबिवलीत चांगलीच गर्दी असली, तरी १५ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सोशल मीडिया नव्हतं, एखाद्या घटनेची चर्चा झाली की ती एक-दोन दिवसांत संपायची नाही आणि अफवा असेल तर खरं काय हे समजायला बराच काळ वाट पाहावी लागायची.

१५ वर्षांपूर्वीच म्हणजेच २००७ मध्ये एका बातमीनं फक्त डोंबिवलीच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला हादरवलं होतं. डोंबिवलीमध्ये स्नेहल गवारे नावाची एक २१ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहायची. अंधेरीच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत होती.

२००७ च्या जून महिन्यात स्नेहलच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळं तिचं घराबाहेर जाणं कमी झालेलं. १९ जुलै २००७ ला स्नेहलची आई कामासाठी बाहेर पडली, तेव्हा स्नेहल घरात एकटीच होती. तिची आई संध्याकाळी घरी आली, तेव्हा तिला स्नेहल कुठंच दिसली नाही.

ती कुठे बाहेर गेलीये का? हे पाहायला स्नेहलला लावला तेव्हा तो बंद आला. तिच्या मित्र-मैत्रिणींना, बॉयफ्रेंडलाही फोन लावले पण कुणालाच काही माहीत नव्हतं.

त्यात स्नेहलची चप्पल घरातच होती…

पुढं तिच्या आईनं पोलिसांशीही संपर्क साधला. पण स्नेहल कुठे आहे हे पोलिसांआधी तिच्या आईलाच समजलं. पहाटेच्या सुमारास तिच्या आईला कायम बेडच्या ड्रॉवरमध्ये असणारा एक थर्मास बाहेर दिसला, तो पुन्हा आत टाकायला त्यांनी ड्रॉवर उघडला. तिथल्या काही बॅग्स आणि बेडशीट बाजूला केले…

आणि त्यांना स्नेहलचा हात बांधलेला, तोंडात बोळा कोंबलेला मृतदेह सापडला.

त्यांनी पुन्हा पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा घरात एक पाण्याचा ग्लास आणि स्नेहलच्या चष्म्याची एकच काचही सापडली. तिचा मोबाईल आणि गळ्यातली सोन्याची चेन मात्र गायब होती. स्नेहलच्या मोबाईलवरुन दुपारच्या सुमारास आपल्याला एक ब्लँक मेसेजही आल्याचं तिच्या आईनं सांगितलं.

पोलिसांच्या तपासात स्नेहलचा मृत्यू गुदमरल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं. तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले नव्हते आणि घरातून कुठली मोठी मौल्यवान वस्तूही चोरीला गेली नव्हती. त्यामुळं पोलिसांना हत्येचा उद्देश लक्षात घेणं आणि मग आरोपीला अटक करणं हे अग्निदिव्य पार करायचं होतं.

पोलिसांनी तपासाचा मोर्चा स्नेहलच्या मोबाईलकडे वळवला. फोर्ट परिसरातल्या एका दुकानदाराकडे स्नेहलचा मोबाईल सापडला, पण त्याच्यात सिम कार्ड नव्हतं. त्या दुकानदाराला ज्यानं मोबाईल विकला होता, त्याचं स्केच बनवण्यात आलं, पण हा इसम कोण आहे याचा छडा लागला नाही.

WhatsApp Image 2022 05 10 at 6.49.34 PM
स्नेहलचा फोन विकणाऱ्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेले स्केच

या प्रकरणात स्नेहलचे आई-वडील, बहीण, मित्र, मैत्रिणी, घरकाम करणारे, लाईटचं काम करणाऱ्या अशा एकूण ८० जणांची चौकशी केली. तेव्हा चर्चेत असलेल्या डी कंपनीच्या गुंडांनाही पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या रडारवर घेतलं होतं. पण हाती काहीच लागलं नाही.

स्नेहलचे कुटुंबीय, तिचा बॉयफ्रेंड यांची कसून चौकशी झाली. पोलिसांनी संशयाची सुई स्नेहलचा बॉयफ्रेंड हिरेन राठोडवर वळवली. फोन विकत घेणाऱ्यानं ओळख परेडमध्ये हिरेनला ओळखलं नाही, त्यानं केलेल्या वर्णनानुसार फोन विकणाऱ्याच्या आणि हिरेनच्या उंचीतही मोठा फरक होता. त्यामुळं पोलिसांनी हिरेनला ताब्यात घेतलं नाही.

हिरेन तेव्हा वोल्टास कंपनीमध्ये कामाला होता. माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार त्याची आणि स्नेहलची ओळख कॉलेजमध्ये असताना झाली होती, त्यांचे प्रेमसंबंध होते आणि ते लग्नही करणार होते. २००८ पर्यंत हिरेन भारतात होता, त्यानं पोलिसांना पूर्ण सहकार्यही केलं. २००८ मध्ये तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.

२०१० मध्ये मात्र एक घटना घडली आणि या केसला नवं वळण लागलं…

हिरेन आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळं भारतात परतला होता, नेमकं त्याचवेळी स्नेहलच्या हत्येची केस कल्याण पोलिसांकडे गेली आणि त्यांनी हिरेनला ताब्यात घेतलं. त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली, नार्को टेस्टची मागणीही करण्यात आली. मात्र हिरेननं संमती न दिल्यानं नार्को टेस्ट घेण्यात आली नाही.

जवळपास वर्षभर हिरेन पोलिसांच्या ताब्यात होता आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. त्याच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. थोडक्यात पोलिसांच्या तपासानुसार हिरेन राठोड निर्दोष होता. 

दुसऱ्या बाजूला माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार या केसला आणखी एक अँगल होता. 

स्नेहलच्या बहिणीनं स्नेहलच्या हत्येआधी काही दिवस आपले वडील हिंदुराव गवारे मारहाण करत असल्याची तक्रार पोलिस चौकीत नोंदवली होती. एका कौटुंबिक संबंध असलेल्या रिटायर्ड पोलिस अधिकाऱ्यानं मध्यस्ती करत गवारे कुटुंबातला हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र या अँगलचा फारसा तपास झालाच नाही.

पुढे हिरेननं लग्न केलं आणि आता परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतोय. त्याची पत्नी ईशा यांनी एका ब्लॉगमध्ये हिरेनचं निर्दोष असणं, त्याला माध्यमांमध्ये असलेल्या चुकीच्या माहितीमुळे झालेला त्रास याबद्दल आपली बाजू मांडली आहे.

एक मात्र आहे, पोलिसांकडे स्केच उपलब्ध आहे, त्यांनी कित्येक जणांची चौकशी केलीये… पण एका २१ वर्षांच्या मुलीचा खून करुन तिचा मृतदेह तिच्याच बेडमध्ये कोंबणारा गुन्हेगार आजही मोकाट आहे… 

१५ वर्ष उलटली तरीही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.