आधी हार्ट अटॅकची चर्चा, मग मृत्यूभोवती संशयाचं धुकं, सोनाली फोगट यांचं संपूर्ण प्रकरण काय ?

मंगळवारी २३ ऑगस्टला एक बातमी आली, भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचा गोव्यात हार्ट अटॅकमुळं मृत्यू. त्यानंतर अनेक ठिकाणी कमी वयात हार्ट अटॅक येण्याची कारणं, हार्ट अटॅक कसा रोखावा याबाबतची माहिती आपण सगळ्यांनी वाचली. लाइफस्टाइलमध्ये बदल करायचा असं ठरवलंही आणि तोवर सोनाली फोगट यांच्या मृत्यूबाबत वेगळाच खुलासा झाला. 

हा खुलासा म्हणजे, फोगट यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळं झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येच्या आरोपाखाली दोन जणांना अटकही करण्यात आलीये.

 एकीकडे फोगट यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना, दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाभोवती संशयाचं धुकं दाटलंय…

ज्यांच्या मृत्युमुळं हरियाणा आणि गोव्यात रान उठलंय, त्या सोनाली फोगट आहेत तरी कोण ?

फोगट या अभिनेत्री, भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होत्या. बिग बॉसच्या १४ व्या सिझन मध्ये त्यांनी  सहभाग घेतला होता आणि सोबतच वेगवेगळ्या टीव्ही सिरियल्समध्ये काम केल्यानंही त्यांचं नाव चर्चेत होतं. २०१९ मध्ये त्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिल्या होत्या, मात्र काँग्रेसच्या कुलदीप बिष्णोई यांनी फोगट यांचा पराभव केला.

गोव्यात काय घडलं ?

सोनाली फोगट या आपल्या दोन सहकाऱ्यांसह गोव्याला गेल्या होत्या. २३ ऑगस्टच्या सकाळी त्यांना अंजुनाच्या सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक सांगण्यात आलं. मृत्यूच्या आदल्या रात्री सोनाली या गोव्यातल्या ‘कर्लीज’ क्लबमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर सकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, पण तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

देशभरात विविध क्षेत्रांमधून त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करण्यात आला आणि वयाच्या ४३ व्या वर्षी हार्ट अटॅक आल्याची चर्चाही झाली.

मात्र गुरुवारी या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला…

फोगट यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आणि गोव्यात फोगट यांच्यासोबत असलेले पीए सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर वासी यांनी फोगट यांची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. फोगट यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी तक्रार दाखल केली आणि साहजिकच पोलिसांनी चौकशीची सूत्रं हलवली.

पोलिसांच्या तपासात हे पुढं आलं की, फोगट या संगवान आणि सुखविंदर सोबतच कर्लीज क्लबमध्ये गेल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

फोगट यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला की,
‘फोगट यांनी आपल्या रात्रीच्या जेवणात काहीतरी मिसळलं आहे आणि त्यामुळं आपल्याला त्रास होतोय, असं फोनवर सांगितलं होतं. या आधीही संगवाननं सोनाली फोगट यांच्यावर अत्याचार करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न केला होता. संगवानच त्यांना गोव्यात घेऊन आला होता आणि त्यानंच त्यांच्या मृत्यूचा कट रचला आहे. त्यामुळं या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी.’

गोव्यात पोलिसांचा तपास सुरु होता, त्यांनी संगवान आणि सुखविंदरला रिसॉर्ट आणि क्लबमध्ये नेऊन आणलं आणि सोबतच त्यांची चौकशीही केली. फोगट कुटुंबीयांनी, ‘हरियाणामधल्या फार्महाऊसमधून  सोनाली फोगट यांचा लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी गायब झाल्या आहेत,’ असा आरोपही केला.

पोलिसांनी मात्र सुरुवातीला संगवान आणि सुखविंदर यांना अटक केली नव्हती. त्यांच्या प्राथमिक तपासात सोनाली यांच्या अंगावर कुठल्याच जखमा नसल्याचं पुढं आलं होतं. त्यांची भूमिका होती की पोस्टमार्टम झाल्यावरच पावलं उचलण्यात येतील, मात्र फोगट कुटुंबीयांनी गोव्याऐवजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात यावं असा आग्रह धरला होता. 

अखेर मृत्यूच्या दोन दिवसानंतर गुरुवारी गोव्यातच सोनाली फोगट यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यातूनच सोनाली यांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं जाणार होतं… 

पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय समोर आलं ?

सोनाली फोगट यांच्या अंगावर ‘ब्लण्ट कट’ म्हणजेच मुक्यामारासारख्या जखमा असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला नसून त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय. मात्र अजूनही या जखमा नेमक्या कशामुळं झाल्या हे काही स्पष्ट झालेलं नाही.

पोस्टमार्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांना अटक केली आहे. साहजिकच त्यांच्या चौकशीतून सोनाली यांच्या मृत्यूबद्दल खुलासा  होईल असं बोललं जातंय. सोनाली यांच्या कुटुंबीयांनी मात्र या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येण्याची मागणी केली आहे. 

त्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ‘कुटुंबीयांनी लेखी मागणी केली, तर सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात येतील’ अशी भूमिका घेतली आहे.

तर गोव्यात विरोधी पक्षांनी सरकारचं कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे का ? आणि पोस्टमार्टमच्या आधीच हार्टअटॅकनं मृत्यू झाल्याचं कशाच्या आधारे घोषित करण्यात आलं ? क्लीन चिट देण्याची एवढी घाई का ? असे आरोप केले आहे. 

त्यामुळं या प्रकरणावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहेच.

पण या प्रकरणाचा केंद्रबिंदू असणारा फोगट यांचा पीए सुधीर संगवान नेमका आहे कोण ? आणि त्याच्यावर कोणकोणते आरोप आहेत ?

२०१९ मध्ये सोनाली फोगट यांनी हरियाणामधून विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हाच त्यांची सुधीर संगवान आणि सुखविंदर वासी यांच्यासोबत ओळख झाली होती. संगवान त्यांच्यासोबत मॅनेजर म्हणून काम करायचा. सोनाली बिग बॉसमध्ये सामील झाल्या होत्या, तेव्हाही संगवाननं त्यांचा जोरदार प्रचार केला होता.

मात्र फोगट यांचा भाऊ रिंकूनं मात्र संगवानवर वेगवेगळे आरोप केले आहेत.

‘संगवाननं ३ वर्षांपूर्वी सोनाली यांना खाण्यातून औषध देत बेशुद्ध केलं, त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्याचा व्हिडीओ काढून तो ब्लॅकमेल करत होता. याबाबत पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून घेतली नाही. सोनाली यांचे बँक अकाऊंट्स, एटीएम हे सगळं त्यानं आपल्या ताब्यात घेतलं होतं. तो सोनाली यांना घरच्यांशीही बोलू देत नव्हता.
ज्या दिवशी मृत्यू झाला त्याआधी सोनाली यांनी फोनवर संगवानबाबत आमच्याकडे तक्रार केली होती. शूटिंग २४ ऑगस्टला असताना त्याआधीच २२ ऑगस्टपर्यंतच हॉटेलमध्ये २ रुम्सचं बुकिंग करण्यात आलं होतं, ते कशासाठी ? सोनाली यांना वेळेआधीच गोव्याला का नेण्यात आलं ? प्रॉपर्टी हडपण्याचा डाव होता म्हणून संगवाननंच त्यांची हत्या घडवून आणली आहे.’

असे आरोप सोनाली यांच्या भावानं सुधीर संगवानवर केले आहेत. आता गोव्यात नेमकं काय घडलेलं ? आणि सोनाली यांच्या हत्येमागचं कारण आणि सूत्रधार कोण आहेत हे पोलिस चौकशीमधूनच स्पष्ट होईल. तोवर या प्रकरणामुळं राजकारणात खळबळ उडणार का ? तपास सीबीआयकडे जाणार का ? अशा अनेक प्रश्नांकडे लोकांचंही लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.