अंबानीपासून दाऊदपर्यंत प्रत्येकाच्या गुड लिस्ट मध्ये राहणे फक्त मुरली देवरा यांनाच जमायचं

काँग्रेस म्हणजे जुनी पुराणी हवेली. यात कित्येक कुटुंबे राहतात त्यांचा कोणाचा कोणाला पायपोस नसतो. रोज उठून प्रत्येकाच्या तऱ्हा सांभाळा हे कुटुंब प्रमुखांचे मेन काम. कधी कोण वाटण्याचं मागतंय, कोण शेजारच्याशी भांडणे करतंय, कोणी आजारीच पडलंय असे असंख्य प्रकार चाललेले असतात.

अशा मोठ्या कुटुंबाचा खर्च सांभाळणे हे देखील तारेवरची कसरत असते कारण कमावणारे लोक फार कमी आणि खाणारी तोंडे शंभर असतात. अशावेळी प्रत्येक फॅमिली मध्ये असा एक तर माणूस असतो जो किती पण संकट येऊ दे कसली का गरिबी असू दे ऐनवेळी लागेल तसे पैसे कुठून ना कुठून तरी पैदा करतोच.

काँग्रेसमध्ये हे काम मुरली देवरा करायचे. पक्षनिधीच्या उभारणीत देवरा यांच्याएवढा वाकबगार माणूस आजवर देशाने पाहिला नाही.

मूळचे राजस्थानचे. पण जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबईच. मुरली देवरा यांनी अर्थशास्त्रात पदवी तर मिळवली होतीच पण प्रत्येक व्यापारी माणसात असतो तो व्यवहारिक शहाणपणा देखील त्यांच्याकडे भरपूर होता. राजकारणात आले ते हा व्यावहारिक शहाणपणा घेऊनच.

१९६८ साली त्यांनी मुंबई महानगरपालिकेची पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि धडाक्यात नगरसेवक पदी निवडून आले.

मुंबई काँग्रेस म्हणजे एक वेगळेच संस्थान होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पेक्षा वेगळा असलेला हा सवतासुभा. एकेकाळी स.का.पाटील नावाचा सम्राट मुंबई काँग्रेस वर आणि पर्यायाने मुंबईवर राज्य करायचा. त्यांच्याच काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान कॉग्रेसला घरघर लागली. आधी आचार्य अत्रेंनी आणि पुढील काळात बाळासाहेब ठाकरेंनी पाटलांना सोलून काढले. जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांचा निवडणुकीत पराभव केला.

पुढे मुंबई काँग्रेसला सावरण्याचं काम रजनी पटेलांनी केलं. त्यांच्याच काळात मुरली देवरांचा उदय झाला.

मुरलीभाईच्या बाबतीत असे बोलले जायचे की, ‘आहेत काँग्रेसचे. पण, जमवून घ्यायला सगळ्या पक्षांचे.’ त्याप्रमाणे त्यांचे सर्व पक्षाच्या नेत्यांशी अगदी घरगुती संबंध होते. इतके की एकदा थेट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुंबईचा महापौर बनवलं होतं. इंदिरा गांधींची आणि शिवसेना प्रमुखांची भेट देखील देवरांच्या मध्यस्तीने झाली होती असं म्हणतात.

मुंबईच्या राजकारणाचे धडे रजनी पटेल यांच्याकडून गिरवणाऱ्या मुरली देवरा हे लवकरच इंदिरा गांधींच्या खास वर्तुळाचा भाग बनले.

गंमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि काँग्रेस मधून बाहेर पडून स्वतःचे पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा त्यांनी मुरलीभाईंना लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष केले आणि काँग्रेसमध्ये असूनही मुरलीभाईंनी ते स्वीकारले.

१९८० साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, पण काँग्रेसची लाट होती पण तरी त्यांचा पराभव झाला.

मुरली देवरा निराश झाले नाहीत. ते थेट हातात पुष्पगुच्छ घेऊन आपल्याला हरवणाऱ्या रतनसिंह राजदांचे अभिनंदन करायला गेले. राजकारणातला असा मोकळेपणा मुरलीभाईंजवळ होता.

चर्चगेटला खेतान भवन येथे त्यांचा दरबार भरायचा. येथे धीरूभाई अंबानी, नसली वाडिया या उद्योगपतींपासून ते थेट छोट्या मोठ्या वर्तमानपत्रांचे पत्रकार अशा सर्वांचा मनमोकळा राबता सुरु असलेला दिसायचा. हाजी मस्तान वगैरे डॉन मंडळी देखील त्यांच्या एका फोनच्या हाकेवर हजर व्हायची. 

मुरली देवरा हे काही फर्डे वक्ते किंवा लोकनेते नव्हते मात्र त्यांनी सांभाळलेल्या जबरदस्त नेटवर्कमुळे  मुंबई वरची त्यांची पकड कधी ढिली झाली नाही.

इंदिरा गांधी मुंबईला जेव्हा जेव्हा यायच्या तेव्हा तेव्हा विमानतळापासून पुढच्या सर्व कार्यक्रमात पुढच्या सीटवर इंदिराजी आणि मागच्या सीटवर मुरली देवरा बसलेले असणार, हे ठरलेले असायचे.

१९८१ साली मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनले ते थेट २२ वर्षांनी २००३ साली ते पाय उतार झाले. त्यांच्याच काळात मुंबई मध्ये काँग्रेसच्या शताब्दीचा महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यांनी केलेलं अफाट नियोजन पंतप्रधान राजीव गांधींना प्रभावित करून गेले. दिल्ली दरबारात मुरली देवरा यांचे वजन वाढतच गेले.

मुरली देवरा यांच्या काळात काँग्रेसने मुंबई मध्ये पुन्हा उभारी घेतली.

महानगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले. स्वतः मुरली देवरा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले. त्यांनी दक्षिण मुंबई हा आपला गडच बनवला होता.

मुंबईच्या विकासासाठी त्यांनी आपल्या पक्षाची सत्ता आहे किंवा नाही असलं कधीही पाहिलं नाही. त्यांच्या प्रयत्नातून राजीव गांधी यांनी मुंबई शहराला १०० कोटींचा निधी दिला.

पुढेही जेव्हा महानगरपालिकेला पैशांची गरज होती तेव्हा त्यांनी आपले सुप्रसिद्ध नेट्वर्किंग कौशल्य वापरून जागतिक बँकेतुन निधी आणून दिला.

मुंबईच्या राजकारणातील गट तट त्यांनी हसत मुखाने सांभाळले. भडकलेल्या गुरुदास कामत सारख्या तरुण कार्यकर्त्यांची त्यांच्या घरात जाऊन समजूत काढणे हे फक्त मुरली देवरा यांनाच जमत असे. मुरली देवरा यांच्यामुळेच कितीही संकट आले तरी काँग्रेसची तिजोरी कधी हलकी झाली नाही.

त्यांच्याबद्दल अनेक वाद देखील झाले. एकदा दाऊद इब्राहिम त्यांच्या इफ्तार पार्टी मध्ये सामील झाला होता, याचे फोटो देखील वर्तमानपत्रात छापून आले होते मात्र अशा गोष्टींचा त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होऊ दिला नाही.

राजीव गांधींच्या मृत्यू नंतर सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. या काळात पीव्ही नरसिंहराव यांनी त्यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. उलट ते सोनिया गांधी मुंबईला आल्यावर सीसीआय मध्ये मोठमोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींना पत्रकारांना बोलवून स्वागत समारंभ ठेवायचे. यामुळे सोनिया गांधींचे राजकीय महत्व टिकून राहिले व हे करण्यात मुरली देवरा यांचा मोठा वाटा होता.

म्हणूनच सोनिया गांधी आणि पुढे राहुल प्रियांका ही मंडळी मुरली देवरा यांच्याप्रति कायम उपकृत राहिले.

जेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेत आली व मनमोहन सिंग पंतप्रधान बनले तेव्हा मुरली देवरा यांना पेट्रोलियम खात्याचा मंत्री बनवण्यात आलं. पुढे त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच मिलिंद देवरा यांना राजकारणात आणले. तेही पुढे मंत्री झाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनले पण मुरली देवरा यांचा करिष्मा त्यांना जमला नाही. आज मुंबईत पक्षाचे अस्तित्व संपत आलंय.

मुरली देवरा यांच्या मृत्यूनंतर बाकी कोणाला नाही पण काँग्रेसला तरी मोठा फटका बसला होता हे नक्की.

रिलायन्स आणि अंबानी कुटुंब यांची मोदी-शहा यांच्याशी असलेलं सख्य जगजाहीर आहे. पण इतकं असलं तरी दक्षिण मुंबई या मतदारसंघात अंबानी आपलं मत काँग्रेसलाच देतात आणि इतकंच नाही तर मिलिंद देवरा यांचा प्रचार देखील करतात यातच मुरली देवरा या नावातलं सामर्थ्य दडलेलं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.