पुण्यात कुठलाही पाहूणा येऊदेत फेटा असतो तो मुरुडकरांचाच !
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुण्याच्या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. चातक पक्षाने सुद्धा पावसाची इतकी वाट बघतली नसलं, त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पुणेकर आपल्या या मेट्रोची वाट बघत होते.
स्वप्नपूर्ती होणार म्हंटल्यावर पुणेकर मंडळी महिनाभर आधीचं तयारीला लागलेली. बाह्या पसरून, शाहरुख खान सारखी डीडीएलजे वाली स्माईल आणूनं, आपली विशेष ओळख आणि स्टाईल असलेले फ्लेक्स, पाट्या लावून, पंतप्रधानांच्या स्वागताची जंग्गी तयारी सुरु होती.
दोन दिवस आधी पासूनच पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता काटेकोर पणाच्या बाबतीत पुणेकरांचा हात कोणी धरू शकतं नाही. त्यामुळं ठरल्याप्रमाणं सोहळा पार पडला. सभा झाली, गर्दी झाली, उद्घाटन झालं, बातम्या आल्या, फोटो- व्हिडिओ व्हायरल झाले, देशभर चर्चा झाली आणि मेट्रो सुद्धा धावायला लागली.
या सगळ्या गराड्यात मात्र एका गोष्टीनं लयं लक्ष वेधून घेतलं, ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी घातलेला फेटा. तसं पंतप्रधान जिथं कुठं जातील, तिथली खासीयत असलेल्या गोष्टींनी त्यांचं स्वागत करण्याची प्रथाचं आहे. तसं पुण्यात जरं कोणी पाहूणा म्हणून आलं तर पुणेरी पगडी घालून जातं, पंतप्रधान नरेंद्र मोदी या आधी जेव्हा पुण्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांना पुणेरी पगडी देऊनचं सन्मानित करण्यात आलं होतं.
पण यंदाच्या या स्पेशल फेट्यानं सगळ्यांचचंं लक्ष घेचून घेतलं, त्या शाही फेट्यात पंतप्रधान सुद्धा एकदम भारी दिसतं होते. असो… तर हा शाही फेटा तयार केलाय पुण्याच्या प्रसिद्ध मुरुडकर फेटेवाल्यांनी. आता इतिहास गवा हैं… पुण्यात कोणतीही मोठी हस्ती येऊदेत, त्यांचं स्वागतं मात्र मुरूडकरांच्या फेट्यांनीचं होत.
पुण्यात कुठलाही छोटा कार्यक्रम असो, सार्वजनिक कार्यक्रम असो, निवडणूका असोत, रामनवमी, शिवजयंती असे सण असोत फेटा लागतो तो मुरूडकरांचाच.
याच संर्दभात बोल भिडूशी बोलताना गिरीश मुरूडकर यांनी सांगितलं की,
आज आमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. १९४० च्या दरम्यान माझे आजोबा रघूनाथ शंकर मुरूडकर यांनी हा व्यवसाय सुरु केला होता. त्यानंतर वडिल पद्माकर मुरुडकर आणि आता मी स्वतः या व्यवसायात आहे.
गिरीश मुरुडकर सांगतात की, आजोबांनी जेव्हा व्यवसाय सुरू केला. तेव्हा स्पेशली फेट्यांवर आमचा फोकस नव्हता. कारण त्यावेळी फेट्यांचा वापर हा मर्यादित स्वरूपात होता आणि पब्लिसिटीचं कुठलं साधन नव्हतं. त्यात त्यावेळची लोकं स्वतः फेटे बांधायची. त्यामुळे आम्ही खण, लुगडी असे सगळे मटेरियल तयार करायचो.
पण हळूहळू स्पेशलायझेशनचा जमाना आला. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर डेव्हलप झाला. आणि फेट्यांचा सुद्धा ट्रेंड वाढला. आणि त्यात मुरूडकर झेंडोवाले हा ब्रँड बनला.
नुसतं फेटे पगड्या नाहीत, तर उत्सवाचं साहित्य, झेंडे बॅच, मोठे पडदे, गिफ्ट रॅप करायचं मखमली कापड, अशा सगळ्या गोष्टी लक्ष्मी रोडवर असलेल्या मुरूडकर झेंडेवाले यांच्याकडे मिळतात.
जसं की आधी सांगितल, पुण्यात किंवा महाराष्ट्रात कुठलाही पाहूणी येऊ देत, त्यांना मुरुडकर यांच्या पेट्या पगड्यांनीचं सन्मानित करण्यात येत. मग यात चंद्राबाबू नायडू, सचिन तेंडुलकर, राजीव गांधी, पी. व्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार अशा राजकीय, क्रीडा, साहित्यिक, मनोरंजन क्षेत्रातल्या दिग्गजांना मुरूडकरांच्या खास फेट्या आणि पगड्यांनी सन्मानित करण्यात आलयं.
गिरीश मुरूडकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संर्दभातला किस्सा सांगताना म्हटलं की,
बाळासाहेब सहसा कधी फेटा घालायचे नाहीत. एकदा सभेच्या निमित्ताने मी स्वतः कारागिर घेऊन मनोहर जोशी यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, मी पुण्यावरून आलोय, त्यावेळी बाळासाहेबांनी मला स्टेजवर बोलवून म्हणाले, मनोहर पंतांनी बांधलाय तसा बांधणार का? मी म्हटलं हो.. आणि मग स्टेजवर बाळासाहेबांनी फेटा बांधून घेतला.
आता मुरुडकर झेंडेववाल्यांचे फेटे, पगड्यांना फक्त महाराष्ट्रातचं नाही तर महाराष्ट्राबाहेर पार देश – विदेशातसुद्धा मागणी आहे.
इंग्लंडचा राजकुमार प्रिन्स चार्ल्स याला मुंबईच्या डबेवाल्यांनी जो फेटा दिला होता तो मुरुडकरांनीच डिजाइन केला होता. जो आजही प्रिन्सच्या व्यक्तीगत संग्रहालयात पहायला मिळेल.
याबाबत बोलताना गिरीश मुरुडकर मिश्कीलपणे सांगतात की, इंग्रजांनी आपल्याला दीडशे वर्षे टोप्या घातल्या पण त्याचा बदला म्हणून मुरुडकरांनी एकदाच फेटा घालून केली.
एवढेच नाही तर १० ते १५ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे जेव्हा पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव झाला होता, त्यावेळी आपल्या महाराष्ट्रासारखाच गणेश उत्सव साजरा केला जावा, म्हणून त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला, मुरुडकर सगळं मटेरियल द्यायला तयार होते, पण अडचण अशी होती की, त्यांच्यातल्या कोणालाच पेटे बांधता येत नव्हतं म्हणून मुरुडकरांनी फोल्डिंगचे फेटे बनवून दिले.
अनेक देवस्थानांना सुद्धा मुरुडकरांनी डिजाइन केलेले फेटे असतात. अगदी पुण्यातल्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला सुद्धा फेटे पगड्यांची जी सुरुवात झाली ती मुरुडकर यांच्या फेट्यानेच झाली.
गिरीश मुरुडकर सांगतात,
एकदा तात्यांनी म्हणजे प्रतापराव गोडसे यांनी मला फोन केला आणि मला बोलावून घेतलं ते म्हणाले अरे तुझं टीव्हीला बघितलं, प्रिन्स चार्ल्सला तुझा फेटा गेला, मग आपल्या बापाला असं का ठेवलय? मी म्हटलं करूयात, मग कितना तिथे मी कागद पेन घेतला, आणि त्यांना दहा मिनिट मागितली, त्यात दहा मिनिटात मी दोन-तीन कन्सेप्ट सांगितल्या आणि तिथून डिझाईनर कन्सेप्टने जन्म घेतला.
तिथून पुढे दगडूशेठ गणपतीला दरवर्षी डिझायनर फेटे बनवण्याचं काम आम्ही सुरु केलं, मग त्यात शिवशंभो फेटा ज्यात संपूर्णपणे शंकरांना आवडणाऱ्या किंवा त्यांच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी, म्हणजे हिरे-मोती न लावता रुद्राक्षाची माळ, त्रिशूळ अशा सगळ्या गोष्टी.
नंतर जय गणेश फेटा ज्यात गणपती संबंधित सगळ्या गोष्टी मग मोदक असेल, दुर्वा असेल, पुणेरी पगडी, शिंदेशाही पगडी अशा नवीन कन्सेप्ट आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.
मुरुडकरांच्या फेट्या पगड्यांना अभिनय क्षेत्रात सुद्धा मोठी मागणी आहे. म्हणजे संजय लीला भन्साळी यांच्या फेमस बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी सुद्धा २००० पगड्या मुरुडकरांनी डिझाईन केल्या होत्या. त्यावेळी फेमस डिझायनर अंजू मोदी यांनी स्वतः हा गिरीश मुरुडकर यांना फोन करून पुण्याला आल्या होत्या. त्यांनी मुरुडकरांना या पगडीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. फिल्ममध्ये जी रणवीर सिंगने घातलेली फेमस बाजीराव पगडी आहे, ती स्वतः मुरुडकरांनी डिझाइन केली त्यासाठी ते स्वतः माप घ्यायला मुंबईला गेले होते.
बरं मुरुडकरांच्या या फेट्या पगड्यांचू खासीयत म्हणजे ते स्वत: तर या गोष्टी डिजाइन करतात, पण यासाठी त्यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम वर्षभर काम करत असते. भारतीय संस्कृतीतल्या गोष्टींचा रिसर्च करून तसेच नव्या गोष्टींची मागणी पाहून ही टीम काम करते. ज्यानंतर नवनवीन डिजाइन मुरुडकर झेंडेवाले घेऊन येतात.
महत्त्वाची गोष्ट अशी की, मुरुडकर यांनी आपल्या या व्यवसायातून अनेकांना रोजगाराचं साधन सुविधा उपलब्ध करून दिलयं, म्हणजे त्यांच्या दुकानात जर कामगारांची संख्या बघितली ती आठ ते दहाचं आहे. पण अनेकांना ते पीस बेसिसवर घरबसल्या काम देतात. म्हणजे त्यांना हव्या त्या वेळेमध्ये ती लोक येऊन काम करतात आणि त्यांना त्या बदल्यात मोबदला दिला जातो.
मुरुडकरांकडे फेटा पगड्यांचे ५० पेक्षा जास्त डिजाइन आहेत. पण त्यातल्यात्यात शाही फेटा, पुणेरी फेटा, शिंदेशाही फेटा, फुलेंची पगडी किंवा पागोटं, तुकाराम पगडी, मावळ्यांची पगडी, जिरे टोप या सगळ्यांची मोठी मागणी आहे. ज्यांची किंमत म्हणालं तर २०० रुपयांपासून सुरु होते.
आत्तासुद्धा पंतप्रधान मोदी यांनी जो शाही फेटा घातला होता, त्यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गिरीश मुरुडकर यांना भेटायला बोलून कन्सेप्ट सांगितली होती. त्यावर मुरुडकर यांनीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने आणि या आरामाच्या दृष्टीने काम केलं.
यासाठी कॉटन आणि रेशमी कापडाचा वापर केला गेला, जेणेकरुन आता उन्हामुळे जास्त गरम होणार नाही. यात एअर व्हेंटिलेशनची सुद्धा सोय केली गेली. तसचं ऑस्ट्रेलियन डायमंड वापरले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे त्यात सूर्य आणि सूर्यफूल ही कन्सेप्ट सुद्धा वापरली गेली आहे म्हणजे आपण जर पक्षविरहित विचार केला तर कुठलाही पंतप्रधान हा देशाच्या विकासासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे सूर्यफूल आणि सूर्याची थीम या फेट्यामध्ये वापरण्यात आली. त्यात सतरंगी खडे सुद्धा वापरले गेलेत. तसेच वरच्या बाजूला सोन्याचा पाणी चढवलेली गोल्डन प्लेट लावण्यात आलीये. हा फेटा तयार करण्यासाठी त्यांना जवळपास ८ दिवस लागले.
अशा प्रकारे आजच्या आधुनिक जगात सुद्धा जुन्या आणि भारतीय संस्कृतीच्या गोष्टी जपत मुरुडकर झेंडेवाले यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केलीये.
हे ही वाचं भिडू :
- लोक म्हणायलेत मोदी ड्रेस घालताना पण पुढच्या निवडणुकीचा विचार करतात
- मोदींची स्तुती केल्यामुळे नाही तर टायपिंग मिस्टेकमुळे चुकीची पदवी दिली गेलीये..
- ४५ वर्षात पुण्याच्या J.M. रोडवर एकही खड्डा पडला नाही. हा चमत्कार असा घडला