२ हजारात सुरु झालेला मशरूम फार्मिंगचा उद्योग आज कोटींच्या घरात पोहोचलाय…

२०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेला महापूर हि एक समस्त भारतीयांच्या मनात असलेली एक दुःखद आठवण आहे. या आपत्तीमध्ये अनेक वाईट घटना घडल्या, मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. पण याच संकटातून प्रेरणा घेत एका महिलेने आज कोट्यवधींची कमाई केली आहे. नक्की काय आहे हि यशोगाथा जाणून घेऊया.

डेहराडून मध्ये राहणाऱ्या हिरेशा वर्मा आयटी सेक्टरमध्ये कामाला होत्या. चांगला पगार होता आणि आयुष्य एकदम सुरळीत चाललं होतं. पण याच काळात घडली ती उत्तराखंडची महाप्रलयाची घटना. पुरात घडलेल्या घटनांनी हिरेशा वर्मा यांचं मन व्यथित झालं. पुरात अडकलेल्या लोकांना बघून आणि इतकी मोठी हानी बघून हिरेशा वर्मा यांनी नोकरी सोडली.

नोकरी सोडल्यावर त्यांनी विचार केला कि त्या आता लोकांची उपजीविका भागेल असं काहीतरी काम करतील. २०१३ साली त्यांनी मशरूम फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला. या उद्योगाच्या माध्यमातून आज त्यांनी तब्बल २ हजार महिलांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे. आज घडीला ९ वेगवेगळ्या जातीतील मशरूमचं उत्पादन हिरेशा वर्मा घेतात. वर्षाचा टर्नओव्हर हा दीड कोटीच्या आसपास आहे.

मशरूम हेच का निवडलं तर हिरेशा वर्मा सांगतात कि उत्तराखंडमध्ये थंड वातावरण असतं. थंड वातावरणामुळे इथे मशरूमची शेती करणं फायदेशीर असतं. यातूनच प्रेरणा घेऊन मशरूमची शेती करायचं ठरवलं. यानंतर हिरेशा वर्मा यांनी हिमाचलच्या डायरेक्टोरेट ऑफ मशरूम मधून एक महिन्याची ट्रेनिंग घेतली आणि घरीच मशरूमचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. दोन तीन महिन्यानंतर मार्केटमध्ये हे मशरूम विकल्यावर त्यांना यातून ५ हजार रुपये मिळाले.

पहिल्याच प्रयत्नात चांगली कमाई झाल्याने हिरेशा वर्मा यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी गावातच काही जमीन भाडेतत्वावर मिळवून तिथे झोपडीत मशरूम शेती सुरु केली. या झोपडीत ५०० हुन अधिक मशरूम बॅग्स होत्या. यातूनही त्यांना भरघोस उत्पन्न मिळालं. 

उत्पन्न चांगलं मिळू लागल्यानं हिरेशा वर्मा यांनी गावातील लोकांनाही या कामात जोडून घेतलं. शेतकऱ्यांना आणि गावातील महीलांना मोफत ट्रेनिंग देण्याचं काम हिरेशा वर्मा यांनी सुरु केलं. गावकऱ्यांनीही हिरेशा वर्मा यांच्या आवाहनाला गंभीरतेने बघून अनेक लोकं जोडली गेली. ज्या महिलांना त्रास सहन करावा लागला अशा अनेक महिला या मशरूम फार्मिंगसोबत जोडल्या गेल्या.

पण प्रत्येक व्यवसायाला जसा भरभराटीचा काळ असतो तसाच काळ काही दिवस वाईटही असतो त्याचप्रमाणे हिरेशा वर्मा यांना मशरूमच्या शेतीत हा वाईट काळ सहन करावा लागला. याबद्दल हिरेशा वर्मा सांगतात कि दोन वर्ष हा व्यवसाय चांगला चालला पण उन्हाळ्यात मशरूमच्या उत्पादनात घट झाली. यावर उपाय म्हणून हिरेशा वर्मा यांनी ८० लाख रुपयांचं लोन घेतलं आणि एसी सेटअप तयार केला. 

या सगळ्या उपाय योजनेचा फायदा असा झाला कि ऑईस्टर मशरूम बरोबरच बटन, मिल्की, क्रेमिनी आणि इतर मशरूम व्हरायटीसुद्धा येऊ लागल्या. आज हिरेशा वर्मा यांच्याकडे १० एसी रूमचा सेटअप आहे. या सगळ्यातून दररोज १ टन मशरूम उत्पादन घेतलं जातं. सुरवातीच्या काळात हिरेशा वर्मा स्वतः मार्केटिंगसाठी बाजारात/ मंडईत जात असतं पण त्यांच्या मशरूम शेतीच्या चर्चेमुळे लोकंच त्यांच्या फार्मवर येऊन मशरूम खरेदी करून घेऊन जातात.

मोठमोठे व्यापारी आणि हॉटेलवाले हे हिरेशा वर्मा यांच्या फार्मवरच्या मशरूमचे रेग्युलर कस्टमर आहेत, अगदी काही तासांमध्येच या मशरूमची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मशरूम विक्री केली जाते आणि सोबतच कोटींची उलाढाल सुद्धा होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.