लांब केसाच्या धोनीला बघून मुशर्रफ गांगुलीला म्हणाले, “इसे कहां से उठा के लाए हो..?”

वर्ष होतं २००५. भारत पाकिस्तान मैत्रीचं वारं वाहात होतं. वाजपेयींच्या काळात सुरु झालेला समझोत्याचा हा दौर नवे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी देखील पुढे चालवला होता. दोन्ही देशात बस सुविधा, रेल्वे व्यापार यातून शेजारच नातं घट्ट करायचा हा प्रयत्न होता.

याचंच पुढचं पाऊल होतं क्रिकेट डिप्लोमसी. मधल्या काळात दोन्ही देशातील मॅचेस बंदच झालं होतं. ऍशेस पेक्षा अस्सल क्रिकेट या दोन संघाच्या सामन्यात बघायला मिळतात असं म्हटलं जायचं. अगदी एकप्रकारचं महायुद्ध खेळलं जायचं. कोणी किती जरी कट्टर असेना तरी हे सामने बघायची इच्छा प्रत्येकाला असते.

कारगिल युद्धानंतर बंद झालेले भारत पाक क्रिकेटचे दरवाजे आता खुले झाले होते.

१९९९ सालच्या फेमस दौऱ्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. त्यांचा कप्तान होता इंझमाम उल हक तर भारताचा कप्तान होता दादा गांगुली.

सगळं जग या सीरिजसाठी आतुर होतं. भारताचा मीडिया तर वेड लागल्यासारखा करत होता. इंझमाम आणि गांगुलीला अगदी जुन्या योद्ध्यांच्या वेशात हातात ढाल तलवार घेऊन शूटिंग करण्यात आलं होतं.  एकूणच वातावरण तापलं होतं.

पहिला तीन कसोटीची टेस्ट सिरीज झाली. यात एक मॅच ड्रॉ, एक मॅच भारत जिंकला आणि एक पाकिस्तान अशी बरोबरी झाली. खरी उत्सुकता होती वनडे सिरीजची.

कोचीला पहिली वनडे सेहवागच्या सेंच्युरीवर आपण जिंकलो. पुढची मॅच विशाखापट्टणमला होणार होती. गांगुलीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. नेहमी प्रमाणे सचिन सेहवाग उतरले. पण त्या दिवशी सचिन लवकर आउट झाला. तिसऱ्या ओव्हरला त्याच्यात आणि सेहवागमध्ये रन कॉल साठी कन्फ्युजन झालं. सचिन फक्त दोन धावांवर पॅव्हेलियन मध्ये परतला.

संपूर्ण स्टेडियम शांत झालं. आता सगळ्यांना अपेक्षा होती तीन नंबरला गांगुली येणार. पण तस झालं नाही. त्याच्या ऐवजी एक वेगळाच खेळाडू उतरला. त्याच नाव एम.एस.धोनी.

झारखंडच्या धोनीला गांगुलीचा फाईंड समजलं जात होतं. खरं तर तो मागच्या बांगलादेश सिरीज पासून टीम मध्ये आला होता पण त्याला कधी चांगली कामगिरी करता आली नव्हती. सात नबंर वर खेळणाऱ्या धोनीला कधी चांगली संधी मिळाली नव्हती म्हणूनच गांगुलीने मुद्दामहून त्याला वर पाठवले.

त्याने चमत्कार करून दाखवला. सेहवाग बरोबर तुफान हाणामारी करत त्याने पाकिस्तानी बॉलर्सची पिसे काढली. त्याचे हेल्मेटवरून बाहेर येणारे लांब केस, त्याचे रानटी शॉट, सगळ्यात भारी हेलिकॉप्टरवॉल सिक्सर यांनी मैदान दणाणून गेलं.

धोनीने त्या मॅच मध्ये  १२३ बॉलमध्ये १४८ धावा काढल्या यात चार सिक्सरचा समावेश होता. भारताने हा सामना सहज खिशात टाकला. धोनीची पॉप्युलॅरीटी फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये देखील टॉपवर पोहचली होती.

त्याचा सर्वात मोठा फॅन बनला होता पाकिस्तानचे लष्करशाह परवेझ मुशर्रफ.  

भारत पाकिस्तान क्रिकेट डिप्लोमसीचा आग्रह धरणारे परवेझ मुशरर्फ दिल्लीला होणारी फायनल मॅच बघण्यासाठी खास भारताला आले. मागच्या वर्षी त्यांनी पाकिस्तानमध्ये भारतीय टीमचा दौरा आयोजित केला होता तेव्हा त्यांनी सगळ्या भारतीय टीमची खास भेट घेतली होती. सर्वांशी त्यांची तेव्हापासून चांगली ओळख झाली होती.

यावेळी भारतात आल्यावर त्यांनी कोटला स्टेडियमवर भारतीय कप्तान गांगुलीची भेट घेतली तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न धोनी बद्दल विचारला,

“इसे कहां से  उठाके लाएं हो?”

तेव्हा हजरजबाबी गांगुली हसत हसत म्हणाला,

वाघा बॉर्डर के पास घूम रहा था, अंदर खींच लिया

मुशर्रफ यांनी देखील हसून त्याला दाद दिली. धोनी हा भारताचा भावी चॅम्पियन खेळाडू आहे असं त्याच कौतुक केलं. एवढंच नाही तर धोनीला तुझी हेअरस्टाईल चांगली आहे कधीच केस कापू नको असा सल्ला दिला.

धोनीची पर्सनॅलिटी त्याचा साधेपणा, त्याची स्माईल या सगळ्याच्या प्रेमात परवेझ मुशर्रफ होते. छोट्या गावातून येऊन धोनीने दाखवलेलं धैर्य, त्याची बॅटिंग याच कौतुक करताना ते थकत नसत.  

ती सीरिजचं नाही तर पुढे जेव्हा जेव्हा धोनी मुशरर्फ यांना भेटला तेव्हा त्यांनी त्याला केस तेवढं कधी कापू नको असं सांगितलं. तरीही २००७च्या वर्ल्ड कप नंतर धोनीने आपली हेअर स्टाईल बददली पण मुशरर्फ यांचं त्याच्या बद्दलच प्रेम कधी कमी झालं नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.