संगीतकार नदीम श्रवणचा अपमान काजोलकडून झाला पण त्याची झळ दोघांच्या करिअरला बसली…

मेरा दिल भी कितना पागल है,
ऐसी दिवानगी देखी नहीं कही, दुल्हे का सेहरा,
नजर के सामने…
ही आणि अशी शेकडो गाणी आपण ऐकली असतील. कुणी शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टरवाल्याच्या बाजूला बसून मोठ्या स्पिकरवर ऐकली असतील तर कोणी हीच गाणी एखाद्या दर्द देणाऱ्या बारमध्ये ऐकली असतील. या गाण्यांसोबत हजारो आठवणी लोकांच्या आहेत. विशेषतः 90 च्या दशकातील लोकांना ही गाणी म्हणजे आजच्या संगीत जगतातील अस्सल बावनकशी सोनं वाटत असावं.
ही गाणी कम्पोज केली होती 90 च्या दशकातील तोफ संगीतकार म्हणून ओळखली जाणारी जोडगोळी म्हणजे नदीम-श्रवण. या जोडीने लोकांना दिला तो म्हणजे नॉस्टॅल्जिया. पण आता कौतुक वैगरे होतच असतं आपल्याला किस्से महत्वाचे आहेत.
आता हे दिग्गज संगीतकार होते पण 90 च्या दशकातील एक हिट फिल्म त्यांच्याकडून सुटली होती आणि ती होती बाजिगर. पण याच्यामागे स्टोरी लै डेंजर आहे.
हा तो काळ होता जेव्हा ओरिजनल बॉलिवूड पाहायला मिळत होतं. त्यात काजोल नवीनच होती. मोजकेच सिनेमे करणे आणि वेगळी भूमिका असेल तरच तो रोल करणे यामुळे काजोल लवकर हिट झाली पण काजोलला बॉलिवूडमध्ये आणण्याचा मानपान हा नदीम श्रवण या जोडीला जातो.
बॉलिवूडमध्ये काजोलचा जवळचा मित्र कोण तर तो म्हणजे शाहरुख खान हे सगळ्या भारताला माहिती आहे. पण शाहरुख खानच्या आधी काजोलची घट्ट मैत्री होती ती म्हणजे नदीम श्रवण या जोडीतील नदीम सोबत. पण असा किस्सा घडला की ही दोस्ती तुटली आणि दोघांनी पायावर धोंडा मारून घेतला.
काजोलने तेव्हा एकही सिनेमा केलेला नव्हता आणि नेमकं त्याच काळात नदीम श्रवण यांनी आशीकी, साजन, दिल है के मानता नहीं,सडक असे सिनेमे केले होते आणि बॉलिवूडमध्ये टॉप संगीतकार म्हणून त्यांचा दबदबा होता.
जे सिनेमे चालत नव्हते ते सिनेमे संगीतकार नदीम श्रवण या जोडीमुळे लक्षात राहू लागले.
एक सिनेमा होता बेहूदी ज्यात काजोल आणि सैफ अली खान काम करत होते आणि संगीतकार नदीम श्रवण होते. पण नंतर सैफ अली खान ऐवजी कमल सदानाला घेण्यात आलं. हा सिनेमा नदीम श्रवण या जोडीसाठी फार महत्वाचा होता कारण ते पहिल्यांदा काजोल सोबत काम करत होते.
काजोल ही तनुजा यांची मुलगी असल्याने या जोडिसाठी ही फिल्म स्पेशल होती. इथून नदीम श्रवण यांनी प्रोड्युसर लोकांना काजोल बद्दल सांगणं सुरू केलं आणि त्यांची मैत्री अजून घट्ट होत गेली.
ज्या सिनेमांसाठी नदीम श्रवण म्युझिक द्यायचे ते तिथं हिरोईन म्हणून काजोलच नाव सांगून यायचे. अब्बास मस्तान या जोडीने बाजीगर सिनेमाच्या म्युझिकसाठी नदीम श्रवण यांना विचारणा केली तेव्हा यांनी तिथेही काजोल हिरोईन घ्या म्हणून सांगितलं.
नदीम श्रवण यांच्या सांगण्यावरून काजोलला कास्ट करण्यात आलं. याच काळात अजून एका सिनेमासाठी नदीम श्रवणमुळे काजोलला कास्ट करण्यात आलं. काजोलसाठी नदीम श्रवण मेंटर म्हणून काम करत होते.
याच सिनेमाच्या बाबतीत नदीम श्रवण काजोलच्या घरी गेले आणि काजोल तेव्हा कशात तरी बिझी होती. बाहेरच्या हॉलमध्ये अभिनेत्री तनुजा या पत्ते खेळत होत्या. त्यांनी नदीमकडे अनोळखी माणूस म्हणून कटाक्ष टाकला, नदिम श्रवण यांनी हॅलो केलं पण तनुजाने उत्तर दिलं नाही आणि दुर्लक्ष केलं.
नदीम श्रवण बराच वेळ काजोलची वाट पाहिली पण काजोल काय आलीच नाही. एवढ्या वेळात तनुजाने त्यांना साधं पाणीही विचारलं नाही की त्यांच्याशी बोलणं केलं नाही. यामुळे नदीम श्रवण वैतागले आणि त्यांना अपमानित झाल्यासारख वाटलं. घरी बोलावून अपमान करणं याचा राग या जोडीला आला.
या दिवसानंतर नदीम श्रवण जोडीने काजोलसाठी काम करणं बंद केलं इतकंच नाही तर बाजिगर सिनेमासाठी त्यांनी कंपोज केलेलं जादूगर ओ जादूगर हे गाणं सुद्धा कॅन्सल केलं आणि मग अब्बास मस्तान यांनी याच धाटणीच बाजिगर ओ बाजिगर हे गाणं अन्नू मलिक कडून करून घेतलं.
जितके सिनेमे त्यांनी काजोलसाठी सांगून ठेवले होते ते कॅन्सल केले. पण याचा फटका दोघांना असा बसला की नदीम श्रवण यांच्या हातून बाजीगर सारखा सिनेमा गेला आणि तो पुढे भरपूर हिट झाला याचा तोटा त्यांना झाला आणि या अपमानाचा फटका काजोलला बरेच चांगले सिनेमे तिच्या हातून गेल्याने बसला. पण भिडू हे बॉलिवूड आहे इथ काय घडेल सांगता येत नाही…!
हे ही वाच भिडू :
- काजोलच्या आईने मराठमोळा हिसका दाखवत धर्मेंद्रच्या कानफटात हाणली होती…
- DDLJ च्या शाहरुख-काजोलप्रमाणे रेल्वे स्टेशनवर युवी आणि भज्जीची लव्हस्टोरी सुरु झाली.
- रांझनाच्या कुंदनची रिअल लाईफ लव्ह स्टोरीही एखाद्या चित्रपटासारखीच आहे
- शास्त्रीबुवांनी ठिणगी टाकली आणि अमृता सिंग विनोद खन्नापायी वेडी झाली…