हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचं स्वागत मुस्लिमांनी ‘फुलं’ उधळून केलं

१५ एप्रिलची घटना आहे. आम्ही सगळे ऑफिसमध्ये बसलो होतो, उद्या हनुमान जयंती आहे तेव्हा काय नवीन कंटेंट द्यावा आपल्या भिडूंना, असा विचार करत होतो. टीव्ही चालूच होती आणि त्यावर हिंदू-मुस्लिम न्यूज पण. तेव्हा एकजण म्हणाला की, “अशा वातावरणात उद्यादेखील काही तरी अघटित घडण्याची शक्यता आहे. खूपच खराब झालं आहे देशाचं सध्याचं वातावरण”. सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला.

शक्यता खरीच ठरली. घटना घडली देशाच्या राजधानी दिल्लीत. हनुमान जयंतीच्या दिवशी देशात ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. दिल्लीतही काढल्या गेल्या. मात्र दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास दगडफेक, हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. जहांगीरपुरीमधील बजरंगबलीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर दोन्ही समाजांमध्ये हिंसाचार सुरु झाला. 

ही पारंपरिक मिरवणूक होती आणि सुरक्षाव्यवस्थेत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, तरीही परिस्थितीने अचानक पेट घेतला. थांबवण्याच्या प्रयत्नात घटनास्थळी उपस्थित पोलीस जखमी झाले. समाजाच्या दोन घटकांमध्ये कशाप्रकारे सध्या कटुता निर्माण करण्यात आली आहे, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे.

या घटनेनं आम्ही खजील झालो, मात्र तितक्यात याच दिवसाची अजून एक घटना कळली, जिने सामाजिक बंधुतेचं, धार्मिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचं एक शानदार उदाहरण मांडलं. त्याच दिवशी देशाच्या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये मानवतेची दोन रूपं दिसली. 

घटना आहे मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधली. 

भोपाळमध्ये भगवान हनुमानाच्या जयंतीनिमित्त तलैय्या इथून भव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेचं मुस्लिम समाजातील लोकांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं. इतकंच नाही तर जसं ईदला मुस्लिम बांधव एकमेकांना मिठी मारतात तसंच त्यांनी यावेळी केलं. हिंदू रथयात्रेच्या निमित्ताने मुस्लिम बांधवानी एकमेकांना मिठी मारली.

या मुस्लिम बांधवांचं म्हणणं होतं, बंधुभाव हाच खरा हेतू असावा आणि त्यामुळेच आज आम्ही या यात्रेचं स्वागत करत आहोत.

महत्वाची गोष्ट अशी की, ही हनुमान जयंतीची रथयात्रा मुस्लिम परिसरातून काढण्यात आली होती. देशातील वातावरण बघता या यात्रेपूर्वी अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात होते आणि अनेक अफवाही उडत होत्या. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. हायरेंज इमारतीतील ड्रोन कॅमेरे आणि पोलिस दुर्बिणीसह तैनात करण्यात आले होते. संपूर्ण रथयात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जाण्यासाठी ५०० हून अधिक पोलिस उपस्थित होते.

मात्र घडलं उलटंच… हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी शेकडो मुस्लिम आधीच हातात फुलं घेऊन इथे उपस्थित होते. जशी रथयात्रा आली तसा त्यांनी फुलांचा वर्षाव सुरु केला.

हे चित्र खरंच सुख देणारं आहे… द्वेषाच्या आगीत होरपळणाऱ्या सध्याच्या भारताचं खरं सौंदर्य दाखवणारी ही घटना आहे.

ही काही इतिहासातील पहिलीच घटना नाहीये. याआधी सुद्धा असे अनेक सुंदर प्रसंग भारतीय समाजाचं मार्गदर्शन करणारे ठरले आहेत.

हरियाणाच्या वल्लभगडमधील उंचागाव या ठिकाणी प्रत्येक धर्माचा आणि समाजाचा उत्सव सगळे लोक एकसाथ साजरा करतात. या गावात २०१४ पासूनच सर्व सण साजरे करण्याची परंपरा सुरू केली, जी आजतागायत सुरू आहे. होळीच्या दिवशी हिंदू-मुस्लिम संपूर्ण वेळ रंग खेळतात. मस्तीच्या मूडमध्ये कधीही इथे गडबड झाली नाही. तर ईदला हिंदू बांधव शुभेच्छा देण्यासाठी जातात. काहींच्या घरातून मिठाई, पदार्थही येतात.

यागावातील लोकांचं म्हणणं आहे, “आम्ही सर्व भारतीय आहोत. आपल्या देशातील सर्व सण आपल्या सर्वांचेच आहेत. प्रत्येक धर्माचा आणि समाजाचा उत्सव परस्पर बंधुभाव आणि प्रेमाने जगण्याची शिकवण देतो.” 

कोलकात्याच्या जलपाईगुडी शहराच्या सीमेवरील तिस्ता नदीकाठी अल्पसंख्याकबहुल बालपारा वस्ती आहे. इथे दुर्गापूजा हा सण नेहमीच अनुकरणीय धार्मिक सलोख्याचं उदाहरण राहिलं आहे. देवीपक्षातील महासष्टीपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसांच्या उत्सवाची तयारी इथे सगळे मिळून करतात. पुष्पांजलीपासून ते ‘चांदीपथ’पर्यंत प्रत्येक विधी अत्यंत चोखपणे पार पडतात कारण…

डझनभर मुस्लिम कुटुंबे आपल्या हिंदू बंधू-भगिनींसोबत मिळून शांती आणि समृद्धीसाठी  इथे प्रार्थना करतात.

हिंदुस्थान टाइम्सच्या २०१९ च्या एक वृत्तानुसार, हुबळी जिल्ह्यातील एका गावातील लोकांनी गणेश चतुर्थी आणि मोहरम एकाच मांडवाखाली साजरा केला होता. “आम्हाला जातीय सलोख्याचा संदेश पाठवायचा आहे, जो या वेळी खूप महत्वाचा आहे,” असं एका मुस्लिम कार्यकर्त्याने त्यावेळी वृत्तसंस्थेला सांगितलं होतं.

गेल्या वर्षी जुलै २०२१ मध्ये कोविड-१९ महामारीमुळे आग्र्यातील ताजमहलमध्ये मोजक्याच लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी इथे  ईद अल-अधा साजरी करण्यासाठी मुस्लिम आणि हिंदू एकत्र आले होते. त्यावेळी ताजमहालमध्ये जातीय सलोख्याची झलक दिसली होती.  ईदचा सण साजरा करताना हिंदू आणि मुस्लिमांनी एकमेकांना मिठी मारली होती.

भारताच्या सौंदर्याचं प्रतीक असलेल्या ताजमहालमध्ये भारतीय समाजाच्या सौंदर्याचं प्रतिबिंब तेव्हा दिसलं होतं.

तर यावर्षी होळीच्या वेळी ‘शबे बारात’चा सणही याच दिवशी साजरा केला जाणार होता. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या फतेहपूरमध्ये दोन्ही सण साजरे करताना एकमेकांच्या परंपरांचा सन्मान राखत उत्सवाचा आनंद घेण्याचं आवाहन हिंदू धर्मगुरूंनी केलं होतं.

असे सौहार्द आणि बंधुभावाचा आदर्श घालून देणारे ढीगभर उदाहरण तुम्ही शोधायला गेलात तर सापडतील. जिथे मुस्लिम सणांमध्ये हिंदू आणि हिंदू उत्सवांमध्ये मुस्लिम भागीदार बनतात. मात्र सध्या राजकीय स्वार्थाने देशातील वातावरण खराब होत असल्याचं दिसतंय. अनेकांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल जागरूकता निर्माण करणारे अनेक सामान्य लोक समोर येत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हिंदू-मुस्लिम बांधव एकाच गल्लीत कुटुंब म्हणून राहतोय. आता आमच्यात विष कालवण्याचा प्रयत्न करू नका, अशा आशयाने अपील केली जातेय.

तेव्हा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नकारात्मक गोष्टीपेक्षा सकारात्मकतेकडे वळत भारताचं खरं सौंदर्य जाणण्याची गरज आहे.

जर विसर पडलाच असेल तर शाळेत परिपाठाच्या वेळेस म्हणायचो ती प्रतिज्ञा आणि भारतीय संविधानाची प्रस्तावना जरा आठवा… आठवत नसेल तर कोणतंही पाठयपुस्तक घेऊन वाचा… म्हणजे या सकारात्मक स्टोरीचा अट्टहास हा केला, हे समजेल.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.