ओमिक्रॉन आलाय! पण शाळा सुरु करायच्या कि नाही ते आरोग्य मंत्रालय ठरवणार

ओमिक्रॉन…

या नावानं सध्या जगभरात गजहब माजवला आहे. हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे. जसं कोरोनामुळं मागच वर्ष लॉकडाऊन मध्येच गेलं तसं आता हे ही वर्ष जाणार का ? असे प्रश्न उभे राहिलेत. या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो शाळांचा.

आज सकाळी दहा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झालीच नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभाग निर्णय घेईल असं ठरलंय.

तर याआधी 

महाराष्ट्र सरकारने एक डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन आढळल्याने खळबळ उडाली. राज्य सरकारनेही या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली.

ओमिक्रॉनमुळे चिंतेच वातावरण असताना दुसरीकडे आता पुन्हा शाळा सुरू होणार का, याबाबत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालयं.

आता आरोग्य विभागाच काय म्हणणं आहे ?

ओमिक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठली ही भीती नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हंटल आहे. ज्युनोमिक परिस्थितीचा कुठलाही तसा अहवाल नाही. त्यामुळे, अतिशय चिंता बाळगण्याची गरज नाही. पण, दक्षिण आफ्रिकेती त्याचा रिफ्लेक्ट झालेला प्रभाव लक्षात घेता, काळजी घ्यायला हवी म्हणून मुख्यमंत्र्यांसमेवत आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानुसार १ डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होतील असेही राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितल होत.

शाळा सुरु करण्यासाठीची नियमावली काय होती ? 

राज्यात सध्या पहिली ते सातवीचे सुमारे एक कोटी ३४ लाख ८५ हजार ८७९ विद्यार्थी आहेत. तर पाच लाख १२ हजार ६३ शिक्षक आहेत.

– शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल.

– जे शिक्षक कोविड-19 पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे.

– सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशा प्रकारची बैठक व्यवस्था करावी. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे व्यवस्था असावी.

– शाळेत स्नेह संमेलन, क्रीड वा अन्य तत्सम गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करू नयेत. शिक्षक-पालक बैठका ऑनलाइन घ्याव्यात.

– विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

– शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या आदी वारंवार निर्जंतुक कराव्यात.

-विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांचे दररोज थर्मल स्क्रिनींग करावे.

– विद्यार्थी एक दिवसाआड शाळेत उपस्थित राहतील. म्हणजेच 50 टक्के विद्यार्थी शाळेत तर 50 टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहतील.

शिक्षण विभागाचं काय मत आहे ?

पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम आहे. मार्गदर्शक सूचना बाबत पुन्हा एकदा टास्क फोर्स सोबत चर्चा करण्यात येणार आहे. चाइल्ड टास्क फोर्स सुद्धा नव्या मार्गदर्शक सूचना देणार आहे. मात्र सध्यातरी चाइल्ड टास्क सदस्य सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचे सूत्रांच म्हणणं आहे.

पालक शिक्षक संघटनांच काय मत आहे ?

सध्या तरी शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी असे शिक्षक संघटनांनी म्हटलं आहे. १५ दिवसांनी या निर्णयाबाबत विचार करावा. त्याचप्रमाणे राज्यातील शिक्षकांची दोन दिवसात पहिली ते सातवी या टप्प्यातील शाळा सुरू करण्याबाबत तयारी नसल्याचे काहींनी म्हटलय.

आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना पाहता आणि पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता शाळा सुरू करण्याची तयारी दोन दिवसात होणे अशक्य असल्याचे मुंबईतील शिक्षकांनी म्हटले आहे.

पालकांचं मत काय आहे ?

पालकांकडूनही शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत आता सावध पवित्रा घेतला जात आहे. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या काही पालकांनी बदललेल्या परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे.

या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बोल भिडुने शिक्षण विभागाच्या थिंक टॅन्कचे सदस्य भाऊसाहेब चासकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले,

सध्याची विद्यार्थ्यांची परिस्थिती असाधारण आहे. हि परिस्थिती खूप संवेदनशील पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. नाहीतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कोविड सोबत आपण जगायला शिकलं पाहिजे. कोविडचे नवे व्हेरियंट येतच राहतील. पण यासाठी सरकारनं कोणतीच तयारी केली नाहीये याची खंत आहे. म्हणून शाळा सुरु करण्याचा निर्णय आता परत फिरवण्याची गरज नाहीये. आधी अंदाज घ्यायला हवा आणि मग निर्णय घ्यावा. पण शाळा सुरु व्हायला हव्यात. याला कारण आहेत. 

१. भावनिक मानसिक पातळीवर मुलांची पडझड झाली आहे. मुलांच्या आनंदी वृत्तीचा निर्देशांक घसरला आहे

२. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. मुलं घरात आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. हे सर्वमान्य आहे. शाळा म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र जमायची जागा नसते किंवा वेळापत्रकानुसार विषय शिकायची, परीक्षा घ्यायचं केंद्र नसतं.

पुढचा येणारा काळ आपल्याला काही काळ शाळा बंद काही काळ शाळा सुरु असंच धोरण ठेवावं लागणार आहे. लगेचच पॅनिक होण्याची गरज नाही.

पण सध्या शासनाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जी नियमावली आली आहे त्यात विद्यार्थ्यांमध्ये ६ फुटांचं अंतर आवश्यक असल्याचं म्हंटल आहे. याआधी इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरु झाले आहेत. या नियमावलीच पालन करताना वर्ग कमी पडण्याची शक्यता आहे. मग शाळा कशा भरवायच्या या प्रश्नावर चासकर म्हंटले, 

कोविड सारख्या महामारीला सामोरं जाताना आपण जी तयारी करायला पाहिजे ती राज्य म्हणून आपण केलेली नाही. याकाळात शाळांना ज्या काहीअडचणी, गरजा लक्षात घेऊन एखादी विशेष योजना तयार करण्याची आवश्यकता होती. पण तसं काही झालं नाही. त्यात आणि टास्क फोर्सच्या आडमुठेपणामुळे शाळा सुरु व्हायलाच लेट झाला. त्यामुळं कोविडचा बागलबुवा न दाखवता अधिक प्रॅक्टिकल होण्याची गरज शासनाला आहे. 

 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.