महाराष्ट्रात महापुरूषांचा अपमान अन् महाविकास आघाडीचा महामोर्चा!

राज्यभरात सध्या एकाच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ती गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचा महामोर्चा… आज महाविकास आघाडीचा महामोर्चा मुंबईत निघाला आहे. खरंतर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून पहिल्यांदाच इतक्या आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे.

५ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक झाली… या बैठकीनंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अश्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली… या पत्रकार परिषदेत १७ डिसेंबरला मुंबईमध्ये मोर्चा निघणार अशी घोषणा करण्यात आली.

या मोर्चामागचं नेमकं कारण काय ते पाहूया…

पहिला मुद्दा म्हणजे राज्यात सतत महापुरूषांचा होत असलेला अपमान:
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्यानं महापुरूषांचा अपमान केलाय असं म्हणत राज्यपालांना हटवण्याची मुख्य मागणी ही महाविकास आघाडी करतंय. दरम्यान, ५ तारखेच्या पत्रकार परिषदेत मोर्चाच्या आधी जरी राज्यपालांना पदावरून हटवलं तरी हा मोर्चा काढणारच असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

याशिवाय, राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती… हा मुद्दाही महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये आहे.

यानंतरचा मुद्दा असणार आहे तो राज्यातली वाढती बेरोजगारी:

“राज्यात सध्या बेरोजगारी वाढतेय… शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरतंय”

असं वक्तव्य ५ तारखेच्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं.

राज्यातील प्रकल्प हे राज्याबाहेर जातायत:
मागच्या काही महिन्यात, प्रामुख्यानं शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील मोठे आणि महत्तवकांक्षी उद्योग प्रकल्प हे राज्याबाहेर जातायत असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. यामुळं राज्यातली बेरोजगारी वाढतच जाणार आहे, राज्याच्या विकासावर या सगळ्याचा थेट परिणाम होणार आहे.

यातला सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षाकडून केवळ टीका करण्यात आली होती. ठोस मोर्चा किंवा प्रचंड आक्रमकता अशी दिसली नाही. त्यामुळं, राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प हा ही मुद्दा आजच्या मोर्चात असणार आहे.

राज्यात सुरू असलेला सीमावाद:
राज्यात सध्या अनेक गावांमध्ये सीमाप्रश्न उफाळलेला आहे. सीमाभागातील मराठी बांधवांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात बैठक घेऊन मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थोडा शांत झालेला दिसत असला तरी हा मुद्दा अजूनही संपलेला नाहीये. त्यामुळं आजच्या मोर्चात हा मुद्दाही असणार आहेय

ही झाली मोर्चा काढण्यामागची कारणं पण, मोर्चा काढणार हे जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थानं राज्यात राजकारणाला सुरूवात झाली…

८ डिसेंबरला आणखी एक बैठक घेण्यात आला या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं असलेल्या संघटनाही उपस्थित होत्या. या बैठकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनता दल युनाईटेड, सीपीआय, सीपीएम, भीमशक्ती रिपब्लिक सेना या पक्षांसह अन्यही बऱ्याच पक्ष आणि संघटनांनी असे एकूण २५ पक्ष आणि संघटना या मोर्चाला पाठिंबा दिला असल्याचं म्हटलं.

महामोर्चाला परवानगी दिली नसल्याची बातमी पसरली:
मोर्चाच्या २-४ दिवसांपुर्वी राज्यभरात या मोर्चाला परवानगीच दिली नसल्याचं वृत्त पसरलं. आता या वृत्तानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि राग वाढला, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर, परवानगी दिली नाही तरी मोर्चा निघणारच असं घोषित केलं होतं.

फडणवीसांनी सांगितलं परवागनी दिलीय:
परवानगी दिली नसल्याचं वृत्त पसरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘या मोर्चाला परवानगी दिली आहे. फक्त हा मोर्चा शांतपणे पार पडावा असं म्हटलं.’

पोलिसांनी अटी-शर्तींसह दिली मोर्चाला परवानगी:
पोलिसांनी या मोर्चाला दिलेल्या परवानगीमध्ये १३ अटी आणि शर्ती लावल्यात. यामध्ये प्रामुख्यानं ‘पोलिसांनी दिलेल्या मार्गावरूनच हा मोर्चा काढावा, प्रक्षोभक विधनं करू नयेत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काहीही करू नये’ अश्या अटी आहेत.

मोर्चाच्या आदल्या दिवशी ट्विटरवरून भाजपची घणाघाती टीका:
१६ डिसेंबर रोजी भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरून या मोर्चावर टीका करण्यात आली. ‘वसुली बंद झाली यासाठी ,सत्ता गेली यासाठी’ हा मोर्चा असल्याचं म्हणत ही टीका करण्यात आली.

संजय राऊत यांची लावलेल्या अटी-शर्तींवर टीका:
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पोलिसांना लावलेल्या अटी-शर्तींवरून नाराजी व्यक्त केलीय. यावेळी बोलताना ते म्हणाले,

“महापुरूषांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांविरोधात आम्ही मोर्चा काढतोय आणि आमच्यावरच अटी-शर्ती लादल्या जातायत. अमुक शब्द वापरू नये, असं बोलू नये अश्या नियमांपेक्षा आमचं भाषणच राज्य सरकारनं लिहून द्यावं”

राज्यपालांच्या निषेधानं मोर्चाला सुरूवात:
‘कोश्यारी हटाव, महाराष्ट्र बचाव’ या घोषणेनं मोर्चाला सुरूवात करण्यात आलीये. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा होता.

महामोर्चात महापुरूषांचे पुतळे:

आजच्या महामोर्चात महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळेही आहेत. या पुतळ्यांच्या निमित्तानं त्यांचं कार्य आणि त्यांच्या कार्याचं महत्व समजवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते मोर्चात सहभागी:
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, रोहित पवार, अमोल मिटकरी, काँग्रेसचे सचिन सावंत हे नेते पोहोचलेत तर, काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही सहभागी झाले होते.

हे सर्व नेते आणि अनेक नेते सहभागी होणार असले तरीही. काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते अशोक चव्हाण मोर्चाला अनुपस्थित होते.

भाजपचा संजय राऊतांविरोधात मोर्चा:
आज महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्यात येतोय तर, याच वेळी भाजपकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा चुकीचा उल्लेख केल्याविरोधात मोर्चा काढण्यात येतोय. याशिवाय, वारकरी संप्रदायानं सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांच्या निषेधार्थ आज ठाणे बंदची हाक दिलीय. दरम्यान, या बंदला भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं पाठिंबाही जाहीर केलाय.

दरम्यान, या महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या पार्श्वभुमीवर मुंबईत पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात आहे. ट्राफिकचा प्रश्न लक्षात घेऊन अनेक रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलेत आणि नागरिकांना पर्यायी मार्ग सुचवले जातायत.

आतापर्यंतचा हा मोर्चा पाहिला तर, महाविकास आघाडीचे राज्यभरातील कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर मुंबईत एकवटलेत आणि प्रचंड जनसमुदाय हा या मोर्चात सहभागी झालेला दिसतोय.

दरम्यान बेरोजगारी, सीमाप्रश्न, राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प हे मुद्दे असले तरी… भाजप नेत्यांकडून सातत्यानं महापुरूषांबाबत येत असलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा निषेध करून जनतेच्या मनात सरकारविषयी राग निर्माण करणं हे या मोर्चाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं दिसतंय आणि एकंदरीत मोर्चाची व्याप्ती पाहता हा मोर्चा यशस्वी होतोय असंही वाटतंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.