म्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार रत्नागिरीमध्ये गाड्या सर्व्हिसिंग करतात.
एका प्रचंड मोठ्या देशाचा एक राजा असतो, तो त्याची राणी त्याच्या चार सुंदर राजकन्या एका भल्यामोठ्या राजवाड्यात राहात असतात. त्या राजवाड्यात राजाच्या सेवेला बरेच दासदासी असतात. यातील एका तरुण नोकरावर त्या राजाच्या थोरल्या राजकन्येचा जीव जडतो. दोघे पळून जाऊन लग्न करतात.
गोष्टीच्या पुस्तकातली किंवा एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटतीय नां? पण ही अगदी खरी स्टोरी आहे तीही रत्नागिरीची आणि म्यानमारच्या राजाची. आता म्यानमारचा राजा कोकणातल्या रत्नागिरीत काय करत होता हा तुम्हाला पण प्रश्न पडला असेल.
तर गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. तेव्हा म्यानमारच नाव होत ब्रम्हदेश उर्फ बर्मा.
भारताप्रमाणे इंग्रजांनी तिथ देखील नाक खुपसल होत. तिथे राजे केव्हाच त्यांचे मांडलिक झाले होते. पण तरीही इंग्रज राज्यकर्ते बर्मामध्ये थोडेसे सावध पावले उचलायचे.१८५७ साली भारतात झाशीची राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, पेशवा नाना साहेब यांच्यासारख्या संस्थानिकांनी मोठा स्वातंत्र्यलढा उभारला होता. अस काही ब्रम्हदेशात घडू नये याची खबरदारी घेतली जायची.
अशातच ब्रम्हदेशचा राजा मिंडन मीन मेला. त्याच्या मागे 45 मुलं मुली होते पण यातील अनेकांना ठार करून त्याचा मुलगा थिबा सिंहासनावर आला. या थिबाला सत्तेवर आणण्यात त्याच्या सावत्र आईचा हात होता कारण तिच्या पोरीशी म्हणजे सुप्रायत बरोबर थिबाच लग्न झालं होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे थिबा आणि त्याची सख्खी सावत्र बहिण राजा राणी बनले.
बर्माच्या राजघराण्याची परंपरा होती की आपले रक्त शुद्ध रहावे म्हणून सख्ख्या सावत्र भावाबहिणीमध्ये लग्न लावून द्यायचे.
मंडाले या आपल्या राजधानीत बसून थिबा राज्यकारभार पहात होता. तो शूर होता शिवाय दूरदृष्टीचा होता. त्याने आल्या आल्या अनेक धडाडीचे निर्णय घेतले. तिथले प्रशासकीय विभाग बदलले, रस्त्याची कामे सुरु केली. मधल्या काही काळात बर्माचा विकास मागे पडला होता त्याला मार्गावर आणायचं काम सुरु केलं. अशातच त्याच्या सल्लागारांनी त्याला सल्ला दिला की
आता ब्रिटीशांची गुलामगिरी सहन करायची नाही, त्यांच्या ताब्यात बर्माचा जो भाग आहे तो परत जिंकून घ्यायचा.
थिबा असले काही प्लॅन करतोय हे लक्षात आल्या आल्या इंग्रजांनी त्याच्यावर आक्रमण केलं. अवघ्या काही तासात त्यांचं सैन्य मंडालेमध्ये होतं. थिबाला ताब्यात घेण्यात आल. त्याने परत बंडखोरीचा प्रयत्न करू नये म्हणून त्याची रवानगी हजारो किलोमीटर दूर भारतात रत्नागिरीला करण्यात आली.
कितीही जरी झालं तरी थिबा हा राजबंदी होता. त्याला साध्या कैद्यांप्रमाणे ठेवणे शक्य नव्हते.
अखेर थिबासाठी एक रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ब्रिटीशांनी त्या काळचे सव्वा लाख रुपये खर्चून एक सुंदर राजवाडा बांधून दिला. थिबा, त्याची राणी आणि चार मुली या सगळ्या राजकुटुंबाची व्यवस्था तिथे करण्यात आली.
राजवाडा प्रचंड मोठा होता. सुंदर होता मात्र तो एक सोन्याचा पिंजराच होता. थिबाला त्याच्या कुटुंबाला कुठेही जाण्याची परवानगी नव्हती. कायम ब्रिटीश सैन्याचे त्यांच्यावर वचक असायचा. अशातच थिबाने १६ डिसेंबर १९१६ रोजी रत्नागिरीच्याच भूमीत अखेरचा श्वास घेतला.
मरणापूर्वी एकदा तरी आपल्या मायभूमीच दर्शन घेण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहिली. थिबाला रत्नागिरीमध्येच पुरण्यात आले.
पुढे काही वर्षांनी त्याच्या राणीला आणि मुलीना परत बर्माला पाठवण्यात आले.
पण थिबाची सर्वात मोठी राजकन्या फाया ही एकटीच तिथून परत रत्नागिरीला आली. तिचं राजवाड्यात काम करणाऱ्या गोपाल सावंत नावाच्या नोकरावर प्रेम जडल होतं. पारतन्त्र्यात असलेल्या दोन देशातील प्रचंड अंतर तिला आपल्या प्रेमाकडे परत येण्यापासून रोखू शकल नाही. आपला राजकीय वारसा, जडजवाहिरे, संपत्ती, आपला देश, नातेवाईक यांना रामराम करून फाया गोपाल सावंतशी लग्न करण्यासाठी परत आली.
या गोपाल सावंतच यापूर्वी लग्न झालेलं. तरीही त्याने फायाशी दुसर लग्न केलं. दोघांना टूटू नावाची मुलगी देखील झाली.
बऱ्याच प्रेमविवाहात होते तसेच झाले. गोपालसावंत व्यसनी होता. तो काही जास्त कमवायचा नाही. फायाला ब्रिटीश सरकारकडून जी काही तुटपुंजी पेन्शन मिळायची त्यावरच त्यांचा संसार चालू होता. म्यानमारची राजकन्या, थिबा पलेसची मालकीण अतिशय गरिबीत आयुष्य काढत होती. तिला तिच्या घरच्यांनी परत येण्याविषयी अनेकदा समजावले पण तिने रत्नागिरीला आपले घर मानलेले.
फाया कधीच परत गेली नाही. तिचा मृत्यू रत्नागिरीमध्येच झाला. कलेक्टरने वर्गणी काढून या ब्रम्हदेशाच्या राजकन्येचा अंत्यसंस्कार केला.
फायाच्या नंतर टूटूची अवस्था आणखी बिकट झाली. थिबा राजाच्या नातीला अक्षरशः रस्त्यावर झोपण्याची पाळी आली. तिने रिक्षा चालवणाऱ्या शंकर पवार यांच्याशी विवाह केला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली.
मुलाचं नाव चंद्रकांत पवार आणि मुलीच नाव मालती मोरे. रत्नागिरीमध्ये प्रचंड मोठा आपल्या आजोबांचा राजवाडा असलेली टूटू छोट्याशा घरात नेटका संसार करू लागली. प्रसंगी दुसऱ्याच्या घरात भांडी घासली पण आपल्या मुलांना वाढवले.
म्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार हे रत्नागिरीमध्ये गाड्या सर्व्हिसिंग करतात.
मध्यंतरी थिबाचे म्यानमार मधील वंशज थिबाच्या स्मृतीशताब्दीनिमित्त रत्नागिरीच्या भेटीला आले होते तेव्हा त्यांनी चंदू पवार यांची भेट घेतली. एका राजाचे दोन देशात वेगवेगळ्या परिस्थितीत राहणारे, वेगवेगळी भाषा बोलणारे हे वंशज एकत्र आले आहेत आपल्या आठवणी एकमेकांशी शेअर करत आहेत हे अनोखे दृश्य त्या दिवशी रत्नागिरीकरांना पाहायला मिळाले.
हे ही वाच भिडू.
- इतका हूशार राजा छत्रपती घराण्यात होता पण दुर्देव म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही.
- एका राजाने पेग भरला आणि पटियाला पेगला सुरवात झाली.
- हुंड्यात दिलेल्या मुंबईमुळं राडा झालेला, प्रकरण पेटलं असतं तर ब्रिटीशांची सून नांदली नसती.