म्हणून कोणार्कच्या सूर्यमंदिरात जायचा मुख्य दरवाजा गेल्या ११८ वर्षांपासून बंद आहे

भारत हा मंदिरांचा देश म्हणून सुद्धा ओळखला जातो. जितके वेगवेगळे धर्म, संस्कृती भारतात आहेत तितकेच वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर सुद्धा आहेत. जैन, बौद्ध, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन प्रत्येकाच्या प्रार्थनास्थळांच्या वास्तू वेगळ्या प्रकारे निर्माण केलेल्या आपल्याला दिसतात. यात हिंदू मंदिरांमध्ये जास्त प्रकार आपल्याला बघायला मिळतात.

महाराष्ट्रात हिंदू मंदिरांची रचना जशी आहे त्यापेक्षा वेगळी रचना इतर राज्यांमध्ये आहे. यामध्ये दक्षिण भारतातील मंदिरांच्या रचनेला कल्पकतेचं माहेरघर म्हटलं जातं. आजच्या मॉडर्न इंजिनिअरिंगला देखील लाजवेल अशी या मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. तिरुपती बालाजी, मीनाक्षी मंदिर, पद्मनाभ स्वामी मंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर अशा अनेक वास्तू उदाहरण म्हणून आपण घेऊ शकतो. याच रांगेत नंबर लागतो तो

कोणार्कच्या सूर्य मंदिराचा…

ओडिशाच्या पुरीपासून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर कोणार्क नावाच्या शहरात हे सूर्य मंदिर वसलेलं आहे. या मंदिराच्या रचनेबद्दल, कलाकृतीबद्दल जेवढं बोललं जातं तेवढंच त्याच्या एका रहस्याबद्दल सुद्धा बोललं जातं ते म्हणजे

गेल्या ११८ वर्षांपासून या मंदिराचं बंद असलेलं दार!

मंदिरांमध्ये लोक जातात ते देवाचं दर्शन घ्यायला. मात्र हे असं मंदिर आहे ज्याचे दरवाजेच भाविकांसाठी एका शतकापासून जास्त काळ झाला बंद आहेत. तरीही अनेक भाविक, पर्यटक देश विदेशातून मोठ्या संख्येने दरवर्षी या मंदिराला भेट देतात.

म्हणून नक्की काय रहस्य आहे या दरवाजाच्या मागे? का बंद करण्यात आला आहे हा दरवाजा? जाणून घेऊया… 

आधी मंदिराबद्दल थोडी माहिती करून घेऊ…

इतिहास तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या मंदिराची निर्मिती तेराव्या शतकात करण्यात आली होती. १२३६ ते १२६४ या कालखंडात गंगवंशाचे पहिले राजा नरसिंह देव यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. या मंदिराच्या बांधकामात प्रामुख्याने वाळू, ग्रॅनाइट दगड आणि मौल्यवान धातूंचा वापर करण्यात आला आहे.

१२ वर्ष सुमारे १२०० मजुरांनी दिवसरात्र मेहनत करून मंदिराचं बांधकाम केलं होतं. ज्याची उंची सुमारे २२९ फूट असल्याचं सांगितलं जातं. याची रचना अशी करण्यात आली आहे की सकाळी सूर्याची पहिली किरण बरोबर मंदिराच्या दरवाजावर पडते.  

हे मंदिर म्हणजे कारागिरीचा उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक मानलं जातं. या मंदिराचा आकार हा एका अतिशय मोठ्या आणि भव्य रथासारखाच आहे. ज्याला चाकांच्या १२ जोड्या आहेत आणि रथ ७ शक्तिशाली घोड्यांद्वारे खेचला जात आहे, असं दाखवण्यात आलं आहे.

यामागची गोष्ट म्हणजे… हिंदू धर्मात सूर्य देवांना संपूर्ण ब्रह्मांडाच्या जीवनाचं स्रोत म्हटलं जातं. महाराजा नरसिंह देव आणि त्यांच्या साम्राज्यात सूर्य देवाला आराध्य मानलं जायचं. म्हणून भगवान सूर्य देवाला समर्पित या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. या मंदिरात सूर्य देवाच्या तीन मुर्त्या स्थापित केल्या गेल्या होत्या. 

शिवाय अशी देखील धारणा आहे की सूर्य देव सात घोडे असलेल्या रथावर स्वार होऊन ब्रह्मांडाचा प्रवास करतात. म्हणून या मंदिराची रचना रथासारखी करण्यात आली होती. यातील सात घोडे म्हणजे आठवड्याच्या सात दिवसांचं प्रतीक मानले जायचे. तर मंदिराचे १२ चक्र ज्याला रथाचे पाय म्हटलं जातं त्याला वर्षाच्या बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून बघितलं जायचं. 

चक्राच्या रेषा घड्याळाच्या आकड्यांप्रमाणे कार्य करायच्या आणि त्याकाळी लोक याच आधारे वेळेचा अंदाज लावायचे. मंदिराच्या चक्रांवर पडणाऱ्या सावलीवरून आपण वेळेचा अचूक अंदाज घेऊ शकतो, असं सांगितलं जातं.

मंदिरामध्ये सूर्योदय, सूर्य मावळणं यादरम्यान सकाळची स्फूर्ती, संध्याकाळचा थकवा अशा सर्व भावभावनांचा अंतर्भाव करून पायऱ्यांवरील शिल्पांची निर्मिती केली गेली आहे. इथे बनवलेलं प्रत्येक शिल्प काहीतरी सांगतं असं म्हणतात. जसं की इथे एक शिल्प आहे ज्यात दाखवण्यात आलं आहे की…

एक सिंह आहे त्याच्या खाली हत्ती दाबला गेला आहे तर त्याही खाली माणूस आहे.

एक्सपर्टसनुसार या शिल्पाचा अर्थ म्हणजे – सिंह म्हणजे माणसाचा अहंकार तर हत्ती म्हणजे माणसाच्या भावना. माणूस आपल्या अहंकारापायी भावनांच्या जाळ्यात आयुष्यभर अडकून राहतो. आपल्या अहंकारावर ताबा मिळवून कोणताही व्यक्ती खऱ्या अर्थाने माणसात येऊ शकतो, असा त्याचा अर्थ लागतो.  

त्याचबरोबर मंदिराच्या वरच्या टोकापासून भगवान सूर्यांचा उदय आणि अस्त होताना दिसतो. तिथून बघितलं तर असं वाटतं जणू संपूर्ण मंदिरात लाल रंग विखुरलेला आहे आणि मंदिराच्या अंगणात लाल सोनं पसरलेलं आहे.

हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याचे तीन महत्त्वाचे भाग आहेत – देउल गर्भगृह, नटमंडप आणि जगमोहन मंडप. हे तिन्ही देखील एकाच दिशेला आहेत. सर्वात आधी नटमंडपात ज्या गेटमधून प्रवेश करता येतो ते प्रवेशद्वार आहे. यानंतर जगमोहन आणि गर्भगृह एकाच ठिकाणी आहेत.

अशा या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे या मंदिराची चुंबकीय शक्ती. 

लोकप्रिय आख्यायिकेनुसार, मंदिराच्या वरच्या बाजूला लोडस्टोन नावाचं ५२ मेट्रिक टन चुंबक होतं. हे चुंबक मंदिराच्या वरती बसवण्यात आलं होतं. या चुंबकाच्या आधारे मंदिरातील सूर्यदेवाची मूर्ती पूर्णवेळ हवेत तरंगत राहायची, असं सांगितलं जातं. 

हे मंदिर आधी समुद्राच्या किनाऱ्यावर होतं. हळूहळू पाणी कमी झालं तसं हे मंदिर समुद्रापासून दूर झालं, असं म्हणतात. मात्र जेव्हा हे मंदिर समुद्राच्या जवळ होतं तेव्हा या चुंबकाचा त्रास समुद्री प्रवाशांना व्हायचा. चुंबकाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की समुद्रातून जाणारी जहाजं या चुंबकामुळे भरकटत असत आणि मंदिराच्या दिशेने ओढली जात असत. जहाजांमध्ये बसविण्यात आलेले होकायंत्र म्हणजेच दिशा सूचक यंत्र या चुंबकाच्या शक्तीने प्रभावित होऊन चुकीची दिशा दाखवत असत.

याच त्रासाला कंटाळून त्या वेळच्या खलाशांनी ते मौल्यवान चुंबक काढून आपल्याबरोबर नेलं, असं सांगितलं जातं.

या गोष्टीचा मंदिरावर मात्र मोठा परिणाम झाला. मंदिराची निर्मिती करताना दगडी ब्लॉक्सच्यामध्ये लोखंडी प्लेट टाकण्यात आल्या होत्या. चुंबक त्या सर्वांना धरून ठेवायचं म्हणून मंदिर ठामपणे उभं होतं. मात्र खलाशांनी हे चुंबकच काढून नेल्याने मंदिर कमकुवत झालं. त्याचे खांब, भिंती एकमेकांपासून विभक्त होऊ लागल्या ज्यामुळे मंदिराची पडझड सुरु झाली, असं देखिल सांगितलं जातं. 

तर काही लोक असंही म्हणतात की, या मंदिराचं पाडण्याचं कारण परदेशी लोकांनी केलेले हल्ले आहेत.

आज कोणार्कचं जे मंदिर आपण बघतो ते खरंतर पूर्ण मंदिर नाही, असंही काही इतिहासकार सांगतात. कारण आज या मंदिराच्या तीन मंडपांतून केवळ एक मंडप पर्यटकांना दिसतं. बाकी दोन दिसत नाहीत. काही जण म्हणतात परदेशी हल्ल्यांत ते नष्ट झाले तर काही जण म्हणतात हे कधी पूर्ण बांधल्याच गेले नव्हते म्हणून हळूहळू आपोआप पडून गेले.

१६ व्या शतकाच्या वेळी जेव्हा मंदिरातून भगवान सूर्याची मूर्ती हटवण्यात आली तेव्हा पूजा करणं बंद झालं. म्हणून भाविक इकडे जायचे कमी झाले, असे संदर्भ सापडतात. म्हणून कोणार्क नगर हळूहळू जंगलात रूपांतरित झालं. यादरम्यान मंदिराची खूप पडझड झाली. काही वर्षांनी जेव्हा मंदिर परत शोधण्यात आलं तेव्हा त्याची पारिस्थिती खूप खराब झाली होती, असं सांगतात.

यामुळेच आज केवळ एक मंडप सगळ्यांना बघायला मिळतं. पण या मंडपात यायचे सगळे रस्ते आजपासून ११८ वर्षांआधीच बंद करण्यात आले होते, असं अभ्यासक सांगतात. हेच याचं मोठं रहस्य मानलं जातं.

याबद्दल इतिहासकार सांगतात…

१९ वं शतक संपताना या मंदिराचं हे शेवटचं मंडप सुद्धा पडायला आलं होतं. जर याला पडण्यापासून थांबवायचं असेल तर एकच मार्ग होता. त्यानुसार १९०३ मध्ये तत्कालीन गव्हर्नर जॉन वूडबर्न यांनी मंदिरात रेती भरून सगळे दरवाजे सील केले.

नंतर खूप वेळा मंडपाच्या मुख्य दरवाज्याला उघडण्याचं बोललं गेलं मात्र तसं झालं नाही. म्हणून आजही हे मंदिर बंदच आहे.

मात्र जानेवारी २०२२ मध्ये ही रेती सुरक्षितपणे हटवण्याची प्लॅनिंग पुरातत्व विभाग करत असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं होतं. भारतीय पुरातत्व विभाग यासाठी एक रोडमॅप तयार करत असल्याचं सांगण्यात आलं होतं. म्हणून आता नक्की केव्हा हा दरवाजा खुला होईल, याची वाट सर्वजण बघत असल्याचं दिसतंय…

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.