३ दिवस, २ रशियन नागरिकांचा मृत्यू अन् पुतीन यांचं नाव… भारतातल्या त्या दोन मृत्यूंचं गुढ

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन ३०० पेक्षा अधिक दिवस उलटून गेलेत. रशिया युक्रेन युद्धाचे संपुर्ण जगावर परिणाम होतायत. जगभरातून रशिया युक्रेन युद्ध थांबलं पाहिजे अश्या प्रतिक्रिया येतायत. मात्र, रशिया काही हल्ले थांबवत नाहीये आणि युक्रेन मागे हटायला तयार नाहीये.

अश्या परिस्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यावर अनेक जण टीका करतायत. रशियातील लोकही पुतीन यांच्यावर टीका करतायत.

मागच्या आठवड्याभरात दोन रशियन नागरिकांचा भारतात ओडिशामध्ये मृत्यू झालाय.

भारतात मृत्यू झालेल्या दोघांपैकी एकाने पुतीन यांच्यावर टीका केली होती.
पावेल अँटोव्ह यांनी यांनी जून महिन्यात एका ब्लॉगमध्ये पुतीन यांच्यावर टीका केलेली. नंतर मात्र त्यांनी त्या टीकेबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.

आधी पाहूया पावेल अँटोव्ह हे कोण होते.
पावेल अँटोव्ह हे रशियातील एक सक्रिय राजकारणी होते. त्यांची ओळख ही राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर टीका करणारं एक परखड व्यक्तिमत्व म्हणून होती. याशिवाय ते एक यशस्वी व्यावसायिक सुद्धा होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यूमुळं रशियामध्ये खळबळ माजलीये याशिवाय, भारतातही त्यांच्या मृत्यूनं गुढ निर्माण केलंय.

त्यांनी केलेली टीका नेमकी काय होती.
रशिया युक्रेन युद्धाबद्दल लिहतांना पावेल अँटोव्ह यांनी आपल्या ब्लॉगमध्ये टीका केली होती. या ब्लॉगमध्ये त्यांनी रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यांचा उल्लेख ‘रशियन अतिरेक’ असा केला होता. आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार, या टीकेनंतर त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता.

दबावानंतर टीका मागे घेतली.
दबाव आल्यानंतर त्यांनी ब्लॉगमधून केलेली टीका मागे घेत आपण नेहमीच राष्ट्राध्यक्षांच्या समर्थनात उभे असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय ती टीका गैरसमजातून आणि काही टेक्निकल एररमुळे केली होती असंही त्यांनी म्हटलं होतं.

हे स्पष्टीकरण त्यांनी दिलं असलं तरी, माध्यमांच्या मते, त्यांनी टीका मागे घेतल्याचं कारण म्हणजे दबाव हेच होतं.

पावेल अँटोव्ह यांचा मृत्यू नेमका कसा झाला ते पाहुया.
पावेल अँटोव्ह हे भारतात ओडिशामधल्या रायगडा जिल्ह्यातल्या एका हॉटेलमध्ये राहात होते. त्यांच्यासोबत रशियातील आणखी तीन पर्यटक हे भारतात आले होते. एकुण चार जणांपैकी व्लादिमीर बिदेनोव्ह हे अँटोव्ह यांचे मित्र होते.

बिदेनोव्ह हे २२ डिसेंबरला त्याच हॉटेलमधल्या पहिल्या माळ्यावरच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला वाईनच्या काही बॉटल्सही होत्या. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

२२ तारखेला ही घटना घडली आणि तीन दिवसात २५ तारखेला अँटोव्ह यांचा मृतदेह त्याच हॉटेलबाहेर आढळला. हॉटेलच्या बाहेर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात हा मृतदेह सापडला होता. दरम्यान, या मृत्यूचा तपास अजून सुरू आहे. या मृत्यूबाबत माध्यमांशी बोलताना वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले,

“मित्राच्या मृत्यूमुळे पावेल डिप्रेशनमध्ये होते त्यामुळे त्यांचा मृत्यू हा आत्महत्या असु शकते.”

या सगळ्यामध्ये पुतीन यांच्याकडे संशयाची सुई जाण्याचं कारण काय…
या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई पुतीन यांच्याकडे जाण्याचं कारण म्हणजे पावेल अँटोव्ह यांनी जहरी शब्दात पुतीन यांच्यावर केलेली टीका इतकंच नाहीये तर, पुतीन यांच्यावर टीका करणाऱ्यांचा याआधीही बऱ्याचदा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पाहुया याआधी कोणाच्या मृत्यूमध्ये पुतीन यांच्याकडे संशय गेलाय…

अलेक्झांडर लिटव्हिनेन्को हा व्यक्ती ज्याने पुतीन यांच्यावर अनेकदा टीका केली होती त्या व्यक्तीचा लंडनमध्ये मृत्यू झाला होता. हॉटेलमध्ये चहा प्यायल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या चहामध्ये पोलोनियम – २१० हे विष मिसळण्यात आलं होतं.संशयाची सुई पुतीन यांच्यावर होती.

अण्णा पोलिटकोव्स्काया या रशियन पत्रकार होत्या ज्यांचा मृत्यू ५ जणांच्या काँट्रॅक किलर्सच्या समुहाने केला होता. आता यात मुद्दा हा आहे की, त्यांनी पुतीन्स रशिया या पुस्तकातून पुतीन यांच्यावर टीका केली होती. या टीकेत त्यांनी पुतीन रशियाला पोलिस राज्यात रुपांतरित करतायत अशी टीका केली होती. त्यानंतर, त्यांचा खून करण्यात आला होता.

बोरिस नेमत्सोव्ह हे रशियाचे माजी उप राष्ट्राध्यक्ष होते. हॉटेलमधून घरी जात असताना त्यांच्या पाठीत ४ गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. आता नेमत्सोव्ह हे पुतीन यांच्यावर टीका करण्यात आघाडीवर होते. त्यामुळे या प्रकरणातही संशयाची सुई ही पुतीन यांच्याकडे गेली होती.

ग्रेटा वेडलर ही रशियन मॉडेल होती. तिचा मृतदेह हा मार्च २०२२ मध्ये एका सुटकेसमध्ये सापडला होता. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याच्या साधारण एक महिन्यानंतरची ही घटना होती. वेडलर हिने पुतीन यांच्यावर ते सायकोपॅथ असल्याची टीका केली होती. याशिवाय, पुतीन यांच्यासारखे लोक हे लहानपणीपासूनच घाबरट आणि भित्रे असतात अशी टीकाही तिने केली होती. त्यामुळे वेडलरच्या मृत्यूमागे पुतीन यांचा हात होता अश्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

या सर्व मृत्यूंमागे पुतीन यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता त्याचप्रमाणे, आता पावेल अँटोव्ह यांच्या मृत्यूमागेही पुतीन आहेत का असा एक संशयाचा सूर कुठे तरी समोर येताना दिसतोय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.