तो भुतांचं, आत्म्याचं गुढ सोडवायचा, त्याचा मृत्यू कसा झाला हे गुढ मात्र कधीच उलगडलं नाही…

२०१० सालची गोष्ट आहे. मिसरुड फुटायचं वय होतं, टीव्हीवर कार्टून्स न बघता गाण्याची चॅनेल्स बघायची असतात, हे अगदी परफेक्ट समजलं होतं. या गाण्याच्या चॅनेल्सवर आता रियॅलिटी शो लागायला सुरूवात झाली होती. मेंदू बधिर करणारं मटरेल या शो मध्ये हमखास असायचं. पण यांची वेळ असायची रात्री ८ किंवा त्यानंतरच.

त्यामुळं सासू-सुनांच्या सिरीयलमध्ये आपल्या हातात रिमोट येणं अवघडच होतं, पण कधीतरी आपला जॅक लागायचा. असाच एक दिवस लागला, तेव्हा एमटीव्ही लावलं, दाराची कडी लागलीये का नाही, हे पाहिलं. तेव्हा पोरांच्या गप्पांमध्ये एक नाव कानावर पडायचं, ते म्हणजे सनी लिऑन. हीच सनी या टीव्ही शो मध्ये होती.

हॉंटेड विकेंड्स विथ सनी, बघायला सुरुवात तर सनीसाठी केली, पण त्यात भूत, आत्मे असले विषय बघून डायरेक्ट घाम फुटला. घरचे आलेच तर टेन्शन कसलं आलं, हे सांगायची पण सोय नव्हती.

पण या कार्यक्रमात एक कार्यकर्ता होता, जो सगळ्या गोष्टींचा अचूक शोध घ्यायचा. कसलंही गूढ शोधून काढायचा. हिरव्या लाईटमध्ये मशीन वगैरे घेऊन त्याच्या करामती बघून कार्यक्रमातल्या सगळ्या पोरीही इम्प्रेस व्हायच्या. मग या कार्यकर्त्याबद्दल गूढ वाढलं, पण तेव्हा त्याचं नाव गुगल करावं इतकं डोकं नव्हतं आणि त्यासाठी सायबर कॅफेमध्ये पैसे घालवायचा विषयही नव्हता.

मग मध्ये बरीच वर्ष गेली आणि एक दिवस टीव्हीवर त्याच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर झळकली. हा कार्यकर्ता होता गौरव तिवारी, इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचा संस्थापक.

त्याच्या मृत्यूची बरीच चर्चा झाली आणि लोकांना अनेक प्रश्नही पडले, तो नेमकं करायचा काय ? तो या कामाकडे कसा काय वळला ? पण सगळ्यात मोठा प्रश्न होता ? तो म्हणजे त्याचा मृत्यू कसा झाला ?

गौरव दिल्लीचा मुलगा, आपण पायलट बनावं हे स्वप्न उराशी बाळगून तो अमेरिकेला गेला. तिथं तो ज्या घरात भाड्यानं राहत होता, तिथं त्याला चित्रविचित्र हालचाली जाणवल्या. त्याला वाटायला लागलं की, आपल्या आजूबाजूला कुणीतरी अदृश्य व्यक्ती आहे. या गोष्टीमुळं त्याची पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बद्दल उत्सुकता वाढली आणि त्यानं २००६ मध्ये आपलं पायलट ट्रेनिंग सोडलं. सलग तीन वर्ष त्यानं याबद्दल रिसर्च केला. वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या, बरीच रहस्य सोडवली.

२००९ मध्ये तो भारतात परत आला, इथं त्यानं इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली. या विषयात इंटरेस्ट असलेले आणखी लोक या सोसायटीचा हिस्सा झाले. राजस्थानचं भानगड असेल किंवा इतर कुठलीही भुताटकीसाठी फेमस असलेली जागा, गौरव तिथं भेट द्यायचा.

कॅमेरा आणि इतर उपकरणं वापरुन तो लोकांच्या भितीमागचं सत्य शोधून काढायचा. विज्ञानाचा वापर करुन त्यानं कित्येक ठिकाणचा फोलपणा उघड केला होता. सोबतच त्यानं काही ठिकाणी असलेल्या पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीबद्दलही माहिती दिली होती. तो अशा भन्नाट जागांचे व्हिडिओही काढायचा आणि ते बघून शप्पथ भीती वाटायची.

गौरव जी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी चालवायचा, त्यांना अनेक लोकांचे फोन ईमेल यायचे. त्यानुसार हे लोक त्या ठिकाणांवर जाऊन त्यांच्या समस्या सोडवायचे. जवळपास ६ हजार जागांना गौरवनं भेट दिली होती. त्यानं एमटीव्हीचं गर्ल्स नाईट आऊट, ऑस्ट्रेलिया: हॉन्टींग अशा टीव्ही शोजमध्ये १६ डिसेंबर आणि टॅंगो चार्ली अशा पिक्चरमध्येही काम केलं.

मग २०१६ मध्ये बातमी आली, त्याच्या मृत्यूची. मुख्य म्हणजे यातही गुढ होतंच

‘फर्स्टपोस्ट’नं दिलेल्या माहितीनुसार, एका पॅरानॉर्मल साईटची तपासणी करुन गौरव घरी आला होता, त्यानंतर त्यानं आपल्या लॅपटॉपवर काही ईमेलही चेक केले आणि नंतर झोपला. सकाळी पुन्हा लॅपटॉप वर काम केलं आणि काही वेळानं बाथरुममध्ये गेला. थोड्या वेळानंतर त्याच्या घरच्यांना काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी दार तोडून पाहिलं, तेव्हा त्यांना गौरव अस्वस्थ अवस्थेत पडल्याचं दिसलं आणि त्यांनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र त्याचे प्राण वाचले नाहीत.

गौरवच्या मृत्यूचं गूढ वाढण्याचं कारण होतं, ते म्हणजे त्यानं त्याच्या वडिलांशी साधलेला संवाद.

इतर वेळी तो आपल्या कामाबद्दल कुणाशी चर्चा करायचा नाही, मात्र मृत्यूच्या काही दिवस आधीच तो वडिलांना म्हणालेला की, ‘एक अदृश्य शक्ती सतत माझ्या बरोबर असल्याचा भास होतो, कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी मला खेचून घेतीये असं वाटतं.’

त्यात चौकशी दरम्यान त्याच्या बायकोनं खुलासा केला की, ‘गौरवनं मला सांगितलेलं की काही निगेटिव्ह एनर्जी त्याला मरण्यासाठी मजबूर करतायत.’

गौरवचा पॅरानॉर्मल ठिकाणचा वावर, स्मशानासारख्या ठिकाणी सतत जाणं यामुळे अनेकांनी त्याचा मृत्यू अशाच कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जीमुळे झाला असावा असा अंदाज वर्तवला. त्यात त्याच्या गळ्यावर काळी खून असल्याची बातमी पसरली आणि अफवांना अधिकच पेव फुटलं.

त्यामुळं सगळ्याचं ठोस उत्तर पोलिसांच्या तपासातूनच मिळणार होतं…

पोलिसांचा प्राथमिक तपास आणि पोस्टमार्टम रिपोर्टवरुन असं समोर आलं की, गौरवनं आत्महत्या केली. त्यानं बाथरूममध्ये ओढणीनं गळफास घेतला आणि त्याचीच खूण त्याच्या गळ्यावर उमटली. या आत्महत्येचं कारण पोलिसांनी, ‘घरगुती भांडणं आणि तणाव’ असल्याचं सांगितलं.

मात्र गौरवच्या घरच्यांचं म्हणणं होतं की, ‘त्याच्यावर तणाव असण्याचं काही कारणच नव्हतं. त्याच्यात जबरदस्त हिंमत होती. उपकरणं आली, तरीही त्याची टीम फक्त गौरवच्या अनुभवावर वेगवेगळ्या ठिकाणी जायची. त्यामुळं तो असं काही करणं शक्यच नाही.’

पोलिसांकडून कारण सांगितलं जात होतं आणि गौरवच्या घरचे मात्र तो असं काही करणार नाही यावर ठाम होते, या सगळ्यात लोकांमधल्या अफवांना पेव फुटलं ते गौरवनं बायकोला सांगितलेल्या निगेटिव्ह एनर्जीमुळं. साहजिकच ठोस कारण पुढं आलं नाही आणि हजारो ठिकाणांचं गूढ उलगडणाऱ्या गौरव तिवारीच्या मृत्यूचं गूढ कायम राहिलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.