बाजारीकरणाच्या वादळांशी लढत रयतचा वटवृक्ष खंबीरपणे उभा राहिला तो एन डी पाटलांमुळे

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी  ४ ऑक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या ध्येयाने शिक्षण संस्था सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेनं आजपर्यंत लाखो गरीब, बहुजन  विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले आहेत.

शिक्षणक्षेत्राचे बाजारीकरण झालेले असताना आणि धंदेवाईक लोकांनी या क्षेत्रावर कब्जा मिळवला असताना रयत शिक्षण संस्थेने मात्र आपलं ध्येय अजूनही जपलं आहे. यामध्ये सिंहाचा वाटा आहे  प्रा. एन. डी. पाटील यांचा . कर्मवीरांनी घालून दिलेल्या आदर्शांपासून संस्था अजिबात ढळणार नाही, यासाठी एन. डी. पाटील यांनी जागता पाहारा ठेवला होता.

एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या एन.डी. यांनी अत्यंत खडतर परिस्तिथीत पुणे विद्यापीठातून एम.ए. आणि एलएल.बी. या पदव्या घेतल्या. त्याच काळात त्यांनी ‘कमवा आणि शिका’ या योजनेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचे रेक्टर म्हणून काम केले. याचदरम्यान ते प्राध्यापक झाले.

पुढे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूरचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आणि ते रयत शिक्षण संस्थेशी  जोडले गेले ते कायमचेच.

पुढे १९५९ मध्ये ते रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य झाले. १९९०मध्ये रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून एनडींची निवड करण्यात आली.

शाळकरी वयात असतानाच ऐकायला मिळालेले सत्यशोधक विचार आणि पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांची झालेली भेट यामुळं नुसते पदानेच नाही तर विचाराने पण एनडी रयतशी जोडले गेले होते.

गेली अनेक वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे आहे. तसे पाहिले तर संस्थेमध्ये अध्यक्षपद हे नामधारी आहे. नियमित कामकाजामध्ये चेअरमनपद महत्त्वाचे असते आणि हीच धुरा एनडी पाटील यांनी समर्थपणे सांभाळली होती. संस्थेच्या अनेक दैनंदिन कामात एनडी जातीनं लक्ष घालून असत. संस्थेचा पै ना पै बहुजन विध्यार्थ्यांच्या कल्याणासाठी खर्च झाला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. 

संस्थेसासाठी फर्निचर घेण्याच्या असाच एक प्रसंग एनडींचा संस्थेवर किती जीव होता हे सांगून जातो.

रयतच्या कॉलेज, होस्टेलला लागणारे फर्निचर तात्यासाहेब कोरे यांच्या कोडोली येथील सहकारी संस्थेमार्फत खरेदी केले जात होते. मात्र या कामात काही दलाल होते. कॉलेज आणि या सहकारी संस्थेशी मध्यस्थी करून त्यातून ते स्वत:चे कमिशन काढायचे. त्यामुळे संस्थेला  फर्निचर महाग मिळते हे एनडी यांच्या लक्षात आले. एनडी यांनी मग स्वतः सूत्रे हातात घेतेली. एन.डी. स्वत: त्या सहकारी संस्थेत फर्निचर पहायला गेले. तेथे भाव ठरवून त्यांनी किंमतही कमी करून घेतली. शिवाय मी स्वत: आल्यामुळे दलालांची आता गरज नाही, असे म्हणत दलालीमुळे वाया जाणारे संस्थेचे पैसे वाचवले.

परिवर्तन, प्रबोधन, पुरोगामी, समतावादी, साम्यवादी, विज्ञानवादी, विवेकवादी अशा सर्वच चळवळींचे  कायम आधारवड राहिलेल्या एन. डी. पाटील यांनी या चळवळींची मूल्ये रयतच्या विद्यार्थ्यानपर्यंत पोहचतील याची पुरेपूर दक्षता घेतली. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मागे लागले तर संस्था मूळ उद्देशापासून ढळण्याचा धोका होता हे ओळखून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कामाला एन. डी. पाटील यांनी  कायमच प्राथमिकता दिली. 

रयत ही केवळ शिक्षणसंस्था नाही, तर शिक्षणक्षेत्रातला ‘विचार’ आहे असं मानणारे एनडी अखेरपर्यंत रयत शिक्षण संस्थेसाठी झटत राहिले. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.