एन.डी.पाटलांच्या आक्रमक नेतृत्वामुळे अंबानींना देखील माघार घ्यावी लागली होती

सुप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो असे म्हणाले होते,
मला थकवा येत नाही कारण मी काम करत असताना चपलांप्रमाणेच माझं शरीरही बाहेर काढून ठेवत असतो.

हे वाक्य ऐकून कोणाची आठवण यावी तर फक्त आणि फक्त एन.डी. पाटील सरांची. कारण गेल्या साडे तीन दशकाहून अधिक काळ ते सतत कामाच्या रगाड्यात व्यस्त व व्यग्र होते. दिवसाचे चोवीस तास ही अपुरे वाटावेत आणि सलग चार सहा तासांची झोप म्हणजे चैन वाटावी इतका त्यांचा कामाचा व्याप.

लोकांची गर्दी, कार्यक्रमाची आखणी, कृती, प्रचंड स्वरूपाचे अद्ययावत वाचन, अफाट व्यासंग, पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे होणारा प्रवास, सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत गाऱ्हाण्यांपासून संस्थात्मक अडचणीतून मार्ग काढण्याची धडपड हे सारे वर्षानुवर्षे नव्हे तर दशकांहुन दशके सुरू होत.

एक पाय आणि एक किडणीच गेली अनेक वर्षे सक्रिय असणारे सर म्हणायचे, मी कोणत्याही आंदोलनासाठी एका पायावर आणि एका किडनीवर लढण्यासाठी सदैव तयार आहे. आणि लढण्याची हीच उमेद त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी ही कायम होती.

त्या वयात त्यांनी दंड थोपटले होते खुद्द अंबानी विरोधात.

८० वर्षाचे असतानाही एन.डी. सरांची सर्वात मोठी लढाई म्हणजे रायगड जिल्ह्यातील अंबानींच्या विरोधातली लढाई, सेझच्या विरोधातली लढाई. ही लढाई म्हणजे एकहाती लढाई होती. या लढाईतून एन.डी. पाटलांच्या आक्रमक नेतृत्वामुळेच सरकारला आणि रिलायन्सला माघार घ्यावी लागली.

त्यावेळी केंद्र सरकारने एक धोरण जाहीर केल होतं. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पेण, उरण आणि पनवेल या तालुक्यातल्या ४५ गावातली तीस हजार एकर जमीन रिलायन्सने ताब्यात घ्यायची आणि ती विकसित करून तिथं उद्योग उभारायचे. हा प्रकल्प सेझ अंतर्गत होता. प्रकल्पाला रायगडातल्या शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. त्या लढ्याचं नेतृत्व एन.डी. सरांनी हाती घेतलं. सरकारने जी मुदत जमीन संपादन करण्याकरिता दिली होती, त्या मुदतीत जमीन संपादन करणं शक्य झालं नव्हतं. म्हणून रिलायन्सने मुदतवाढ मागितली.

ती मुदतवाढ द्यायला एन.डी. सरांच्या नेतृत्वाखाली विरोध झाला आणि मग ही मुदतवाढ मागे घ्यावी लागली.

याच रिलायन्स कंपनीने शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक केली होती. जमीन सहज मिळाली म्हणून साठेखत, खरेदी खत करताना शेतकऱ्यांना पुनर्वसन पॅकेज दिल होत. त्यानुसार वरकड जमिनीसाठी एकरी पाच लाख, भातशेतीसाठी एकरी दहा लाख, असं पॅकेज ठरलं होतं. ही सगळी लबाडी होती. जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना विकलेल्या जमिनीपैकी साडेबारा टक्के भूखंड देण्याचे कंपनीने मान्य केल होत.

भूखंड नको असेल तर आणखीन पाच लाख अशी खैरात कंपनीने केली. पण ती सगळी आकडेवारी लबाडीची होती. या सगळ्या फसवणुकीविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरले आणि एन.डी. सरांनी त्यांचे नेतृत्व केले. एन.डी. सर काही रायगड या जिल्ह्यातले नव्हते. पण सेझचा लढा लढायला ते रायगडात आले.

वंचितांचे प्रश्न सोडविताना, त्यांच्यासाठी लढा उभारताना आपल्या जीवाचीही पर्वा न करणारे एन. डी. पाटील सर कितीही संकटे आली तरी मागे हटले नाहीत. वयाच्या विशीपासून सुरु झालेला हा संघर्ष अजूनही सुरुच होता अगदी शेवटच्या श्वासापर्यंत !

हे ही वाच भिडू

Webtitle: N D Patil Updates: N D patil’s aggressive leadership forced ambani and reliance to back down in raigad

Leave A Reply

Your email address will not be published.