मरीन ड्राईव्ह एका मराठी इंजिनियरने उभारलाय. त्याचंच नाव एका धरणाला देण्यात आलंय.

मरीन ड्राइव्ह म्हणजे धावत्या मुंबईची ओळख. मायानगरीच्या गळ्याचा नेकलेस. रोज येथून शेकडो गाड्या प्रवास करत असतात. या शहरात पाऊल टाकणारा प्रत्येक व्यक्ती एकदा का होईना हे मुंबईच झळाळत वैभव पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हला येऊन जातोच.

मरीन ड्राइव्ह किनाऱ्यावरून रात्रीच्या वेळी चकाकणारी मुंबई अनेकांच्या मनात उद्याची स्वप्ने रंगवत असते.

समुद्रालगत नरीमन पॉईंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटीपर्यंत इंग्रजी सी आकारात पसरलेला हा किनारा जागतिक दर्जाचे आकर्षण केंद्र बनला आहे. पण याचा निर्माता कोण हे आपल्या पैकी अनेकांना माहित नसते.

मरीन ड्राईव्हच्या इंजिनियरचे नाव एन.व्ही.मोडक म्हणजेच नानासाहेब मोडक.

नानासाहेब मोडक हे जन्मले १८९० मध्ये. त्याकाळी मुंबई विद्यापीठातून त्यांनी सिव्हिल इंजिनियरींगच शिक्षण पूर्ण केलं आणि तेव्हाच्या बॉम्बे म्युन्सिपालटीमध्ये अभियंता म्हणून रुजू झाले. टाऊन प्लॅनिंग, सांडपाण्याची व्यवस्था यात त्यांचा स्पेशल अभ्यास होता. त्यांची कर्तृत्व पाहून इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील मुंबईच्या प्लॅनिंग मध्ये त्यांचा शब्द प्रमाण मानला.

मुंबई महानगरपालिकेचे स्पेशल इंजिनियर या पदावर त्यांची नेमणूक झाली होती.

त्यांनी मुंबईची भुयारी गटारे व सांडपाण्याचे योग्य नियोजन लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाट आहे. झोपडपट्टीक्षेत्राचा विकास, समुद्र हटवून त्यात भराव घालणे अशा अनेक मोठ्या मोठ्या योजना त्यांच्या सन्कल्पनेतून साकारत होते. मुंबई विद्यापीठात सिव्हिल इंजिनियरिंग डिपार्टमेंटचे ते डीन म्हणून देखील काम पाहिलं होता.

१९३८ साली भरलेल्या मुंबई इंजिनियर्स काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मेयर अलबर्ट यांच्या सोबत बनवलेला Outline of the master plan for Greater Bombay हा रिपोर्ट आज ही मुंबईच्या नगर विकासात मान स्तंभ मानला जातो.

एन व्ही मोडक यांच्याच संकल्पनेतुन मरीन ड्राईव्ह साकार झाली. याचे प्लॅनिंग त्यांनी बनवलेलं तर कॉन्ट्रॅकट शापूरजी पालनजी व भागोजी किर यांच्या कडे दिले होते.

१९५० साली मरीन ड्राईव्ह बांधून तयार झाले. या जवळपास ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला सुरवातीला क्वीन्स नेकलेस म्हणून ओळख मिळाली होती. आज त्याचे नाव नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग असे आहे.

नानासाहेब मोडक यांचे कार्य मात्र एवढ्यापुरते सीमित राहत नाही. मुंबईच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला याचं श्रेय सुद्धा मोडक यांनाच जाते. त्यांच्याच कारकिर्दीत महानगरपालिकेने तानसा, वैतरणा व भातसा हि धरणे उभारली.

नानासाहेब मोडक यांनी धरण बांधण्यापूर्वी नाशिक, पुणे, ठाणे या तीनही जिल्ह्यांची पाहणी केली आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीहून ठाणे जिल्ह्यात खडीर्पर्यंत वाहत येणाऱ्या वैतरणा नदीला पाण्याचा चांगला ओघ असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तिथे जवळच त्या नदीला बांध घातला व तलाव तयार केला.

शनिवार-रविवारी केवळ एक शिपाई बरोबर घेऊन नानासाहेबांनी वैतरणा धरणासाठीचे सर्वेक्षण चालून पूर्ण केले. त्यासाठी ते मुंबईहून रेल्वेने जात. त्यांच्या जिद्दी मुळे १९५६ साली हे धरण उभे राहिले. त्या तलावातून १९५७पासून दररोज ११४२ दशलक्ष लिटर पाणी मुंबईत येऊ लागले.

या कर्तृत्वान इंजिनियरची आठवण म्हणून महानगरपालिकेने नानासाहेबांच्या पश्चात या तलावाला ‘मोडकसागर’ असे नाव देण्यात आले. 

आज काल कोणत्याही प्रकल्पाचे उदघाटन झाले तर  त्याला नेते मंडळीच नाव दिले जाते. तो प्रकल्प उभा राहावा म्हणून राबले लोक कायम पडद्यामागेच राहतात. अशावेळी फक्त महाराष्ट्रच नाही तर इतरत्र हि इंजिनियरच नाव दिलेलं हे एकमेव धरण असेल.

हे हि वाच भिडू.

2 Comments
  1. अजय बनसोडे says

    अप्रतिम स्वरूपात आपण महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देतात याकरिता धन्यवाद…

  2. रत्नाकर says

    शुध्द लेखनाकडे लक्ष दयावे

Leave A Reply

Your email address will not be published.