आजवर तुम्ही दिवाळी अंक पाहिले असतील, आत्ता आला आहे “ईद विशेषांक”

काही गोष्टी आपण गृहित धरून चालतो. तशा त्या गृहित धरल्या की, अनेकदा आपल्याला अगदी साधेसाधे प्रश्नही पडत नाहीत. आपल्याकडे दिवाळी अंकांची शतकाहून मोठी परंपरा. आपल्यासाठी हा अभिव्यक्तीचा खास उत्सव. या निमित्त साहित्य, संस्कृती, समाज, कला आदी प्रांतात मुशाफिरी करणारे शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होतात.

जगण्यातले वेगवेगळे पैलू प्रकाशझोतात आणतात. अनेकांसाठी हा सृजनाचा सोहळा ठरतो. दिवाळीच्या उत्सवात निरपेक्ष आनंदाचे, परस्पर सौहार्दाचे, सामाजिक बांधिलकीचे ठळक सूचन असते. अर्थातच, हीच सारी वैशिष्ट्ये रमझाननंतर येणाऱ्या ईदच्या सणातही साठलेली असतात.

मग जसा दसरा-दिवाळी हा अभिव्यक्तीचा उत्सव ठरतो, तसाच रमझान ईद हासुद्धा अभिव्यक्तीचा उत्सव का ठरू नये?

आपण त्याच उत्साहाने, त्याच तीव्रतेने शब्दांच्या माध्यमातून ईदोत्सव का साजरा करू नये ? किंबहुना, आजवर आपण जसे दिवाळी अंक काढले, तसा ईद विशेषांक का काढू नये ? वा काढला जाऊ नये?

या वरवर साध्या वाटणाऱ्या पण कळत-नकळत दुर्लक्षिलेल्या प्रश्नाने ब्लॅक इंक मीडिया हाऊसच्या ‘नब्ज़’ या ईद विशेषांकाच्या निर्मितीला धग दिली.

दिवाळी हा जरी मुख्यतः हिंदु धर्मपद्धतीनुसार साजरा होणारा सण असला, तरीही तो एकट्या हिंदूचा सण ठरत नाही. तसेच रमझान ईद हा जरी मुख्यतः मुस्लिम धर्मपद्धतीनुसार साजरा होणारा सण असला तरीही, भारतासारख्या बहुसांस्कृतिक परंपरा जपलेल्या समाजात तो केवळ मुस्लिमांच सण वा उत्सव ठरत नाही. इथे आनंदाचे सारेच समान वाटेकरी असतात.

मुळात दिवाळी प्रमाणेच ईद हादेखील एकोप्याचा उत्सव असतो. यानिमित्ताने होणाऱ्या अभिव्यक्तीतही याचे प्रतिबिंब पडायला हवे. धर्म आणि कर्मकांडापेक्षाही संस्कृती-परंपरा, जीवनशैली, सार्वजनिक स्तरावरचे आनंद-समाधान, अडीअडचणी, वर्तमानातल्या समस्यांची बसणारी झळ असे सारे, मुख्य म्हणजे कोणा एका समूहाला लक्ष्य करणारे वा वळी ठरवणारे नव्हे, तर समष्टीला कवेत घेणारे या विशेषांकात प्राधान्याने असावे,

या उद्देशाने संपादकीय मंडळाने ‘नब्ज’चे आशय-विषय निश्चित केले.  

यात अर्थातच प्राधान्य दिले, गेले ते रमझान ईदशी जोडल्या गेलेल्या राष्ट्रीय, सामाजिक-सांस्कृतिक आणि कलाविषयक पैलूंना.

याच अनुषंगाने हिंदी चित्रपटसृष्टीतले नामवंत शायर, गीतकार, लेखक-पटकथा लेखक जावेद अख्तर (प्रत्येक भारतीय हा राष्ट्रवादीच आहे!) यांनी आपले मन मोकळे करताना खऱ्याखुऱ्या राष्ट्रवादाचा अर्थ उलगडून सांगितला आहे.

रमझानच्या महिन्यात पक्वान्नांचा घमघमाट, ईदच्या दिवशी अत्तर आणि मेहंदीचा गंध सर्वदूर पसरतो, तेव्हा तो कुठल्या एका धर्माचा उरत नाही. ईदच्या प्रहरी बडे-बुजुर्ग नमाज अदा करत असताना कोणी एक आपल्याच धुंदीत उभा चिमुरडा लक्ष वेधून घेतो. तेव्हा त्याच्यात झळकणारी निरागसता कोणा एका धर्माची राहात नाही.

Screenshot 2021 05 13 at 6.01.42 PM

यात सारेच आपला आनंद शोधत असतात. ही खरे तर आनंदाची प्रतिके असतात, या प्रतिकांचा लक्षवेधी मागोवा शर्मिष्ठा भोसले (किसी के दर्द को अपना बना के ईद मनाए) यांनी एका रिपोर्ताजच्या माध्यमातून घेतला आहे.

मिनाज लाटकर यांनी ‘ईद हमारी आप की’ या शीर्षकांर्गत अनिल अवचट, रझिया पटेल, अरुण म्हात्रे, उर्मिला पवार, फ. म. शहाजिंदे, इंद्रजीत खांबे आदी मान्यवरांच्या ईद सणाशी जोडलेल्या हद्य आठवणींना शब्दरुप दिले आहे. हिना कौसर-खान यांनी, ‘आंतरधर्मीय ईद’ या संकलित लेखात, आरजू तांबोळी-विशाल विमल, मुमताज शेख-राहुल गवारे, आशा अमर- अमर हबीब आदी विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या मान्यवरांच्या अनुभवांना शब्दरुप दिले आहे.

वास्तूरचनाकार-लेखक अर्शद शेख (निसर्ग आणि इस्लाम) यांनी इस्लाम आणि पर्यावरणाचा असलेला अनुंबध एका लेखाद्वारे उलगडून सांगितला आहे. डॉ. मुफीज मुजावर (आँखे खोल देखो भाई) यांनी मराठीच्या परीघात मुस्लिम साहित्य परंपरेचा सर्वंकष वेध घेतलेला आहे.

ईदशी निगडित पैलूंसोबत सामाजिक-सांस्कृतिक आणि कलेशी संबंधित विषयांचा साकल्याने वेध घेण्याला नब्ज विशेषांकात प्राधान्य देण्यात आले आहे.

यात, सिनेअभ्यासक जीतेंद्र घाटगे यांनी समाजशास्त्रीय अंगाने लिहिलेल्या ‘मालेगावचा सिनेमॅटिक हॅपिनेस इंडेक्स’ या दीर्घ लेखाद्वारे मालेगावच्या पॉवरलूममध्ये राबणारे मजूर, तिथे आकारास आलेली श्रमसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे सिनेमाशी असलेले घट्ट नाते उलगडून सांगितले आहे.

लेखक मुबारक अली (यह कैसी साजिश है गालिब?) यांनी, बिगर मुस्लिम कलावंतांच्या योगदानाची यथोचित दखल घेत, हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मुस्लिमधर्मीय कलावंतांविरोधात मूळ धरू लागलेल्या द्वेषमूलक मानसिकतेची लक्षवेधी चिकित्सा केली आहे. 

अलीम रंगरेज (साहिर मिले ना दोबारा) यांनी प्रतिभावंत शायर साहिर लुधियानवी यांच्यातल्या काव्यप्रतिभेची अत्यंत मनोवेधक उकल केली आहे. याच जोडीने विसाव्या शतकातले थोर उर्दू कवी अशी ओळख असलेल्या फैज अहमद फैज यांच्या आगामी शेखर देशमुख ( फैज आणि मिथक) अनुवादित चरित्रातले उतारे यात आहेत.

डॉ. अरुण वाहूळ (रोहिंग्या मुस्लिम जन्माची फरफट) यांच्या रोहिंग्या मुस्लिमांच्या फटफटीची दारुण कथा सांगणाऱ्या आगामी पुस्तकातील उतारे यात आहेत. मुस्लिम संस्कृती-परंपरेचे प्रतीक असलेल्या महाराष्ट्रातल्या वारसा वास्तुंच्या होणाऱ्या अक्षम्य हेळसांडीवर नागनाथ खरात यांनी लिहिलेला लेख या विशेषांकात आहे.

‘नब्ज’ला सर्वसमावेशकता देताना, भारत-पाक या दोन देशांदरम्यानच्या कधी चिघळणाऱ्या तर कधी निवळणाऱ्या ताणतणावावर ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई (भारत-पाक मैत्रीची नवी हूल?) यांनी प्रकाश टाकला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-लेखक हुमायून मुरसल ( कोंडी मुस्लिम शिक्षण आणि आरक्षणाची) यांनी मुस्लिम समाजातल्या शिक्षण आणि आरक्षणाचा तिढा समजावून सांगितला आहे. त्यावर उपाययोजनाही सुचवली आहे.

ज्येष्ठ आरोग्यविषयक तज्ज्ञ संतोष आंधळे ( आरोग्य गुप्तवार्ता ही काळाची गरज) यांनी आपल्या लेखाद्वारे कोरोनोत्तर आदर्श आरोग्य यंत्रणेचे चित्र रेखाटले आहे. तर अभ्यासक-पत्रकार श्रुती गणपत्ये (पुरुषसत्तेच्या शत्रू) यांनी वर्तमानातल्या आंदोलक स्त्रियांवर सविस्तर लेख लिहिला आहे. खाटिक म्हणजेच मुस्लिम हा समज खोडून काढणारा लक्षवेधी लेख डॉ. रमेश रावळकर (खाटिक कोण, तर हिंदू…त्यात स्त्रियादेखील!) यांनी लिहिला आहे.

व्यक्तिचित्रे हे नब्ज विशेषांकाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आहे.

या मालिकेत विखाखा शिर्के (सह्याद्रीच्या रानावनांतले धाकले ठाकरे)  यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंधू तेजस ठाकरे यांच्या जीवसृष्टीतल्या संशोधनपर कर्तृत्वाचा वेध घेतला आहे.

क्रीडा पत्रकार प्रसाद लाड (निद्रिस्त ज्वालामुखी) यांनी अबोल स्वभावाच्या भारतीय क्रिकेट संघाचील लकी मॅस्कॉट ठरलेल्या अजिंक्य रहाणेच्या व्यक्तिमत्वाचा रंजक वेध घेतला आहे.

सानिया भालेराव (मिलेनियल गर्ल्स) यांनी सान्या मल्होत्रा आणि फातिमा साना शेख या लोकप्रिय अभिनेत्रीद्वयीचे विश्व उलगडून सांगितले आहे. लेखक यमन (सक्सेस क्या है…फेल्युअर के बाद का चॅप्टर) यांनी आपल्या लेखात अभिनेता प्रतीक गांधी यांच्या अभिनयसामर्थ्याचे रंगतदार वर्णन केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार (माणुसकीचा जिवंत झरा) यांनी कोविडकाळात निस्वार्थ भाव राखून अंत्यसंस्काराचा धर्मनिहाय विधी करणाऱ्या जावेद जकारिया या सामाजिक कार्यकर्त्याचे विश्व समोर आणले आहे.

Screenshot 2021 05 13 at 6.01.52 PM

दिवाळी अंकांप्रमाणेच आशयगर्भ कविता (दिशा शेख, शमिभा पाटील, स्वप्नील चव्हाण, साहील कबीर, सागर कांबळे, प्रदीप कोकरे, प्रेशित सिद्धभट्टी,विशाखा विशाखा, सुरेखा पैठणे, श्रीकांत ठेरंगे आदी) हे नब्ज विशेषांकाचे वैशिष्ट्य आहेच, परंतु या विशेषांकात मनाला चटका लावणाऱ्या गजलांचा (मुबारक शेख, साबिर सोलापुरी, सदानंद डबीर, शोभा तेलंग, डॉ. स्नेहल कुलकर्णी, आबिद मुनशी,सिद्धार्थ भगत,श्रीकृषण राऊत, वैभव वसंतराव कुलकर्णी, डॉ. राम पंडित, विनय मिरासे, कलीम खान, सुनंदा पाटील आदी) आणि अल्पशब्दांत हृदयाला भिडणाऱ्या लघुकथांचा (इर्शाद बागवान) आवर्जून समावेश करण्यात आला आहे. 

आताचा काळ खूप वेदनादायी आहे, प्रत्येक घरातला कोणी ना कोणी कोरोना विषाणूशी झुंजतोय, काही क्षणांपूर्वी सोबत असलेले अचानक जग सोडून जाताहेत. अशा या आव्हानात्मक काळात नेहमीच्या उत्साहाने ईद साजरी करता येणार नाही, हे नक्की.

पण एकमेकांना धीर देऊन, हुरुप वाढवण्याकामी प्रस्तुत विशेषांक सकारात्मक भूमिका बजावेल, अशी आशा ‘नब्ज़’कारांना या क्षणी वाटते आहे.  

नब्ज़ ईदोत्सव २०२१

प्रकाशक- ब्लॅक इंक मीडिया हाऊस, मुंबई

संपादक –प्रशांत पवार, शेखर देशमुख

पृष्ठे – १८०

मूल्य – १८० रु.

संपर्क तपशील-९९३०८०३३२८

Leave A Reply

Your email address will not be published.