नदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिलेत…

काश्मीर फाईल्स हा सिनेमा पुन्हा एकदा वादात अडकला आहे. मार्च २०२२ मध्ये रिलीज झाल्यापासून या चित्रपटावर अनेकांनी टीका केली आहे. हा सिनेमा एक प्रोपगंडा पसरवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अशी टीका अनेक सिनेमा विश्लेषकांनी केली होती. विरोधी पक्षांनी सुद्धा या सिनेमावर शंका उपस्थित केली होती.

त्यानंतर हळूहळू नवनवीन सिनेमे येत गेले आणि या सिनेमाचा वाद शांत झाला, पण काल पुन्हा एकदा या सिनेमाचा वाद उफाळून आला. कारण…

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फीच्या ५३ व्या समारोहात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या आंतरराष्ट्रीय विभागात एकूण १५ सिनेमांना नॉमिनेशन मिळालं होतं. यात सिनेमांच्या लिस्टमध्ये काश्मीर फाईल्स, द स्टोरी टेलर, कुरंगु पेडल या भारतीय सिनेमांचे सुद्धा स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. 

या कार्यक्रमाचे मुख्य परीक्षक नदाव लॅपिडने सर्व १५ सिनेमांचं परीक्षण केलं, शेवटी स्वतःच मत मांडतांना त्यांनी १४ सिनेमांच्या सीनेमॅटोग्राफीचं कौतुक केलं. मात्र १५ व्या क्रमांकावर असलेल्या काश्मीर फाईल्सवर टीका केली. 

ते म्हणाले की, “बाकी १४ सिनेमांमध्ये सिनेमॅटिक गुण होते परंतु आम्ही सर्व परीक्षक काश्मीर फाईल्स बघून आश्चर्यचकित झालो. एवढ्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल मध्ये हा सिनेमा सादर करणे मला अयोग्य वाटलं. हा सिनेमा प्रोपागंडा पसरवणारा आहे.”

नदाव लॅपिडच्या या टीकेनंतर भारतीय सिनेसृष्टीत नामवंत लोकांसोबतच स्वतः इस्राईलचे भारतातील राजदूत नॉर गिलोन यांनी ट्विटरवर एक खुलं पत्र ट्विट करून नदाव लॅपिडवर टीका केलीय. लॅपिडने मांडलेलं मत हे अयोग्य आहे असं त्यांनी म्हटलं, तसेच भारत आणि इस्राईलमध्ये असलेले परराष्ट्र संबंध ताणले जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं सांगितलं. 

पण नदाव लॅपिडने फक्त काश्मीर फाईल्सवरच वादग्रस्त मत मांडलेलं नाहीय तर त्यांनी स्वतःच्या देशावर सुद्धा वादग्रस्त मत मांडलेले आहेत.  

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या सिनोनिम्स या सिनेमाला मिळालेला गोल्डन बिअर अवॉर्ड स्वीकारतांना लॅपिडने इस्राईलच्या सामान्य लोकांच्या विचारांवर टीका केली होती. 

ते म्हणाले होते की, 

“इस्राईलमधील झुंडीचा आत्मा हा आजारी आत्मा आहे.”

लॅपिडच्या या टीकेमुळे त्यांचे विचार आणि मतं पुरेशी स्पष्ट होतात. लॅपिड हे इस्राईलमधील कट्टर ज्यूंच्या विरोधात मत मांडणारे टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे सिनेमे आणि विचार हे कायम इस्राईलच्या राजकारणाचा विरोध करणारे आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असतात. लॅपिड हे विचाराने डावे नाहीत परंतु इस्राईलच्या प्रस्थापित राजकारणावर भाष्य करणारे आहेत.

कट्टर धार्मिक देशात जन्माला आलेल्या लॅपिड यांचे मत उदारमतवादी असण्यामागे त्यांची युरोपातील जडणघडण जबादार आहे.

लॅपिड यांचा जन्म इस्राईलमध्ये झाला, त्यांनी स्वतःचं प्राथमिक शिक्षण तेल अवीव विद्यापीठातुन पूर्ण केलं आणि नियमाप्रमाणे इस्त्राईलच्या आर्मीमध्ये काम केलं. लॅपिडचे आई वडील हे लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत त्यामुळे आर्मीतून बाहेर पडल्यानंतर ते पॅरिसला गेले.

तेल अवीव विद्यापीठात तत्वज्ञानाचं अभ्यास करणाऱ्या लॅपिडने पॅरिस युनिव्हर्सिटी मधून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतलं आणि या व्यवसायात उतरले.

तत्वज्ञानाचा अभ्यास आणि युरोपमधील उदरतावादी मूल्य यातूनच लॅपिड यांचे सिनेमे इस्राईलमधील धार्मिक कट्टरतावादाच्या विरोधात जाणारे असतात. २०११ मध्ये त्यांनी पोलिसमॅन नावाचा सिनेमा बनवला. या सिनेमात इस्राईलमधील निरंकुश सत्ता कशी आहे याचं चित्रण करण्यात आलं आहे. या चित्रपटाला लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला होता.

तर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अहेड नी’ या सिनेमात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी व्यवस्थेशी लढणाऱ्या एका अधिकाऱ्याची कथा साकारण्यात आली आहे. लॅपिड यांच्या सिनेमामध्ये इस्रायली ओळख मांडली जात असली तरी ज्यू धर्मातील कट्टरतावादावर टीका केली जाते.   

या सिनेमांच्या जोडीला लॅपिडची परखड मतं सुद्धा वादात अडकत असतात.

‘अहेड नी’ या सिनेमानंतर एका मुलाखतीत त्याने इस्राईलच्या धार्मिक आणि राजकीय प्रचारतंत्रावर टीका केली होती.

“इस्राईलची कथा ही सामूहिक आत्म्याची कथा आहे, पण प्रचार तंत्रामुळे लोक आंधळे झाले आहेत. त्यांची डोळे पुन्हा उघडणे, त्यांचं शरीर गदागदा हलवून त्यांना जागं करणे, त्यांच्या डोक्यावर चापट मारून त्यांना शुद्धीवर आणणे पुरेसं नाही. कारण आपण एका मोठ्या सैनिकांच्या तुकडीबरोबर लढत आहोत.” असं म्हणून त्याने इस्राईलच्या व्यवस्थेवर परखड मत मांडलं होतं.

लॅपिडचे हेच मत त्याच्या सिनेमांमध्ये दिसते. त्यांचे सिनेमे हे प्रखर डावे नाहीत, मात्र काहीएक राजकीय मतं मांडणाऱ्या आणि भूमिका घेणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत, असं सिनेमाचे विश्लेषक सांगतात.

याप्रमाणेच काश्मीर फाईल्स सिनेमातुन प्रोपगंडा पसरवला जात आहे असं नदाव लॅपिडने म्हटलं असं सांगितलं जातंय. लॅपिडच्या या वक्तव्यामुळे भारतात त्याच्याविरोधात एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आली आहे. परंतु इस्राईलच्या राजदूत कार्यालयाने खुलासा केला असल्यामुळे प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळेल याकडे विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.