नादिर खानच्या फितुरीने विष्णु गणेश पिंगळेंना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवले

१८५७ च्या उठावाची योजना फसल्यानंतर देखील भारतात स्वातंत्र्यासाठी अनेक प्रयत्न चालू राहिले. यातुनच क्रांतिकार घडत होते. देशासाठी जीव तळहातावर घेवून लढत होते. २० व्या शतकात पहिले महायुद्ध सुरु होताच असाच सशस्त्र क्रांतीने भारताच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर चळवळीने आणि याच गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे !

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावात २ जानेवारी १८८८ मध्ये विष्णू गणेश पिंगळेंचा जन्म झाला. शिक्षणानंतर काही काळ मुंबईत नोकरी केली, मात्र चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या स्वभावामुळे आणि राष्ट्र प्रेमाने प्रेरित होवून स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी त्यांनी लातूर जवळ हातमाग सुरु केले.

पुढे मेकॅनीकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून, घरी काहीही न सांगता १९११ मध्ये त्यांनी थेट अमेरिका गाठली. तिथे शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी अपार कष्ट करत शिक्षण पुर्ण केले.

याच काळात सावरकरांचे अभिनव भारत मधील निकटचे सहकारी लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर चळवळ सुरु केली होती. १९१४ ला महायुद्ध सुरु होताच, भारतात जाऊन क्रांती करण्याची हीच योग्य संधी आहे, असा प्रचार त्यांनी गदर पत्रातून सुरु केला. यातुन प्रेरित होवून विष्णु गणेश पिंगळे आपल्या भविष्यावर तुळशीपत्र ठेवत गदर मध्ये सामिल झाले आणि स्वातंत्र्यासाठी तरुणांना क्रांतिकार्याकडे वळवण्याच्या विभागाचे प्रमुख झाले.

सप्टेंबर १९१४ मध्ये ‘कोमा गाटा मारू’ हे जहाज शेकडो शीख क्रांतिकारकांना घेऊन भारतात पोहोचले. त्यानंतर अनेक शीख वेगवेगळ्या जहाजातून परत येत राहिले. नोव्हेंबर मध्ये पिंगळेही गुप्तपणे भारतात परतले. येताना ही ते शांघाय सारख्या काही ठिकाणी जहाल भाषण करत परतले होते.

मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, बंगाली, पंजाबी अशा विविध भाषांवर प्रभुत्व असलेले पिंगळे पंजाब, बंगालमध्ये वेश आणि नाव बदलून क्रांतिकारकांच्या भेटी घेत, गदरचा प्रचार करीत राहिले. या दरम्यानच लाल हरदयाळांनी रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ, विष्णु पिंगळे यांच्या सहाय्याने बॉम्बस्फोट करून एकाच वेळी अनेक ब्रिटिश लष्करी छावण्या उद्ध्वस्त करण्याची योजना आखली.

सबंध पंजाब, बंगालपासून ते सिंगापूरपर्यंत क्रांतीची बीजे पेरली गेली होती. पिंगळेंना पुढे मेरठमधील सैनिक छावनीत क्रांतीची जबाबदारी देण्यात आली. इथे एक नादिर खान नावाचा जमादार होता. त्याने पिंगळेंना पकडून देण्याचे इंग्रजांना मान्य केले आणि फसवण्याची योजना ठरली.

वाराणसीमध्ये बंगाली क्रांतीकारकांच्या जवळ मोठ्या संख्येने बॉम्ब असल्याचे नादिरने पिंगळेंना सांगितले. त्यांना देखील क्रांतीसाठी बॉम्ब आणि दारुगोळ्याची आवश्यकता होती. दोघेही एकत्र वाराणसीला गेले, तिथे नादिरने १० बॉम्ब देवून विष्णु यांना पुढे जाण्यास सांगितले. आणि ही सगळी बातमी इंग्रजांना दिली.

इंग्रजांनी मीरत इथल्या लष्करी छावणीत फितुरीने विष्णु गणेश पिंगळे पकडले. आणि उठावाचा कट उधळला टाकला, बाजी पलटली. जर ही योजना प्रत्यक्षात आली असती तर लाहोरपासून सिंगापूरपर्यंत १८५७ सारखा पण एक यशस्वी उठाव झाली असता.

या चळवळीतील ८१ आरोपींपैकी ७ जणांना फाशीची शिक्षा झाली. या सात जणांमध्ये होते, विष्णु गणेश पिंगळे, कर्तारसिंग सराबा, बक्षिससिंग, जगनसिंग, सुरायणसिंग, ईश्वरसिंग आणि हरनामसिंग. या सगळ्या क्रांतीकारकांना १६ नोव्हेंबर १९१५ ला फाशी देण्यात आली.

लाहोरच्या तुरुंगात फासावर लटकताना त्यांना शेवटची इच्छा विचारली असता त्यांनी, हातकड्या काढून, दोन्ही हात जोडून प्रार्थना करू देण्यास सांगितले. प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा ठाकला असता पिंगळे यांचे शब्द होते,

‘‘मायभूमीला स्वतंत्र करावे ही एकच इच्छा होती. तेच ध्येय होते. आमचे बलिदान ज्यासाठी आहे ते आमचे ध्येय देवाने पूर्ण करावे.’’

त्यांच्या या वृत्तीचे क्लिव्हलंड सारख्या अधिकाऱ्यांनाही कौतुक वाटले. अवघ्या २७ व्या वर्षी पिंगळेंसह हे सर्वजण हसत हसत, वंदे मातरम् च्या जयघोषात फासावर गेले.

आज विष्णू गणेश पिंगळे यांचा स्मृतिदिन आणि या साऱ्यां वीरांचे स्मरण !!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.