अंगावर राख फासलेल्या नागा साधूंना बघितल्यावर अहमदशाह अब्दालीची टरकली होती.

कुंभमेळामध्ये नागा साधू म्हणजे फक्त भारतीयच नव्हे तर जगातील अनेकांसाठी जिवंत दंतकथा बनले आहेत. त्यांच्या अघोरी प्रथांच्या बद्दलच्या खऱ्या खोट्या आख्यायिका यावर अनेक लेखक,फोटोग्राफर,संशोधक,युट्युबर यांच पोट भरत असत. पण नागा साधूंचे युद्धकौशल्य यावर कधी जास्त चर्चा होत नाही.

इसवी सणाच्या आठव्या शतकात आदि शंकराचार्य यांनी हिंदू धर्माचं पुनरुथ्थान केलं. 

ब्रम्हंसत्यं जगन्मिथ्या’ हे तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी शैव व वैष्णव हा वाद संपवण्याचे एक मोठे काम केले.

त्यांनी द्वारका, जगन्नाथपुरी, बद्रीकेदार आणि शृंगेरी येथे चार पीठ स्थापन केले. पुराणकाळापासून संपन्न भारतावर परकीय आक्रमणे होत होती. मंदिरे श्रीमंत होती. त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून शंकराचार्यानी सशस्त्र  साधूंची सेना उभी केली, ते म्हणजे नागा साधू.

शक हुन यांच्यापासून ते मुघल आक्रमणाना तोंड देण्याचं काम काम नागा साधूंनी केलं. असं म्हणतात सोळाव्या शतकात अद्वैत तत्त्वज्ञानी मधुसूदन सरस्वती यांनी अकबर बादशाहजवळ हिंदू मंदिरावर होणाऱ्या जुलुमाचा पाढा वाचला, तेव्हा दरबारामध्ये हजर असलेल्या हुशार बिरबलाने त्यांना नागा परंपरेची आठवण करून दिली.

मधुसूदन सरस्वतींनी नागा आखाड्यांना मजबूत केले. 

अठराव्या शतकात मुघल सत्ता खिळखिळी झाली होती. दिल्लीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी मराठे आणि जाट यांच्यात चढाओढ सुरु होती. या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा उठवला अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली दुर्रानी याने. दरवर्षी तो भारतात फक्त लुट करण्यासाठी यायचा आणि प्रचंड संपत्ती गोळा करून काबुलला परत जायचा.

त्याकाळात अवधच्या नवाबाचे या गोसावी सैन्याबरोबर ब्रजभूमीमध्ये आपले वर्चस्व राहावे यासाठी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते.

अहमद शाह अब्दालीने १७५७ सालच्या आक्रमणावेळी दिल्ली लुटल्यावर त्याने आपला मोर्चा जाट प्रदेशाकडे वळवला. त्याला माहित होते मराठा जाट संघर्षामुळे ते आपल्याला अडवण्यासाठी येणार नाहीत. सर्वप्रथम त्याने वल्लभगड जिंकले. वल्लभगड मध्ये प्रचंड लुट केल्यावर वीस हजाराचे सैन्य मथुरेवर पाठवले.

अब्दाली हा फक्त पैश्यासाठीच नाही तर रक्ताचा सुद्धा पिपासू होता. त्याने त्या सैनिकांच्यात जोश वाढवण्यासाठी या आक्रमणाला धर्मयुद्धाचे स्वरूप दिले. मथुरेवरून कापून आणल्या जाणाऱ्या प्रत्येक हिंदूच्या शिराला पाच रुपये बक्षीस मिळेल असे जाहीर केले होते . 

मथुरा आणि वृंदावन या शहरामध्ये न भूतो न भविष्यती असा नरसंहार करण्यात आला. रस्त्यांवर शीर नसलेल्या धडाचे खच पडले होते. मंदिरे उध्वस्त झाली होती. जिथे जाईल तिथे मृतदेहांची दुर्गंधी येत होती. अहमद शह अब्दालीच्या समोर कापून आणलेल्या मुंडक्यांची रास उभी करण्यात आली.

आता त्यांचा रोख आग्र्यावर होता. पण जाता जाता ब्रजभूमीतील तिसरे महत्वाचे तीर्थक्षेत्र गोकुळ इथे लुट करून जाण्याची त्यांची योजना होती. पण गोकुळमध्ये होते नागा साधू.

गोकुळच्या नागा साधुना मथुरा वृंदावनच्या बातम्या येत होत्या. आसपासच्या प्रदेशातले नागा आखाडे एकत्र आले. त्यांनी लढण्याची पूर्ण तयारी केली. जेव्हा अब्दालीच्या पठाणांची सेना गोकुळवर हल्ला करण्यासाठी आली तेव्हा अनपेक्षितपणे त्यांच्यावर या भंयकर दिसणाऱ्या नागा साधुनी हल्ला केला.

अंगाला राख फासून घेतलेले त्रिशुळधारी पूर्ण नग्न संन्यासीचा प्रचंड आरडाओरडा करत आलेला लोंढा पाहिल्यावर अफगाण सेनेमध्ये भीतीने गोंधळ उडाला. त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण हे एकएक साधू शंभर पठाणांवर भारी होते.

जगजेत्त्या अब्दालीचे क्रूर सैनिक या नागासाधुचां सामना करण्यास अपयशी ठरले. सैन्यामध्ये पटकीमुळे उलटीची साथ पसरली आहे असे कारण काढून अहमद शाह अब्द्लीने आपल्या सैन्याची लाज झाकण्याचा प्रयत्न केला आणि गोकुळवरून आग्र्याला ते निघून गेले. 

हेच नागा साधू मात्र चारच वर्षांनी पानिपतच्या युद्धावेळी अवधचा नवाबा शुजा उद्दौलासमवेत मराठा सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी अब्दालीच्या गटात सामील झाले.

अवधच्या नवाबाचे त्यांच्यावर उपकार होते .गोकुळवर झालेल्या हल्ल्यावेळी पेशव्यांनी जाटाची खोड मोडावी म्हणून मुद्दाम मदत पाठवली नव्हती असा समज झाल्याने त्यांचा मराठ्यांवर राग होता. यामुळे ते पानिपतला अवध नवाबासमवेत आले. 

हे नग्न गोसावी जेव्हा अफगाणी सैनिकांच्या तळात दाखल झाले तेव्हा त्यांना पाहून अगोदर तर पठाणांची धावपळ सुरु झाली. स्वतः अहमद शाह अब्दाली त्यांना घेण्याच्या विरुद्ध होता मात्र शुजाउद्दौलाच्या मध्यस्तीनंतर नागा साधू पानिपत युद्धात लढले.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Amit Jadhav says

    दिल्ली प्रदूषण बद्दल सविस्तर माहिती द्या. कुठुन? कस? का ?
    जबाबदार कोण? उपाय काय? परीणाम? कारणे?

Leave A Reply

Your email address will not be published.