आमदार नागनाथ अण्णा कार्यकर्त्यांना आपला बेड देऊन स्वतः धोतरावर झोपायचे

एक काळ असा होता की कोणालाही आधार वाटावा अशी माणस समाजात होती. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यापैकीच एक होते.

बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातील काका देसाई आणि नागनाथ अण्णा नायकवडी महत्वाच्या व्यक्ती होत्या. सुरुवातीपासूनच ते शेवटपर्यंत त्यांनी चळवळ यशस्वी करण्यासाठी जे योगदान त्याग केला त्याला तोड नाही. वाळव्याचे नागनाथ नायकवडी म्हणजे क्रांतिकारकांचे मुकुटमणी शोभावेत असे कर्तृत्ववान नायक ! क्रांतिसिंह नाना पाटलांचे ते एक सेनापती होते.

नागनाथ अण्णांचा आपुलकीचा स्वभाव सगळ्यांना माहीतच होता. आज जी जुनी जाणती लोक अण्णांना ओळखायची, अशी ह्यात असणारी लोक अण्णांविषयी भरभरून बोलतात. तर काही जणांनी अण्णांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूरचे खासदार उदयसिंगराव गायकवाड.

त्यांनी अण्णांच्या साधेपणाचा किस्सा आपल्या कथा बारा अक्षरांची या पुस्तकात लिहिला आहे. 

नागनाथ अण्णांची आणि खासदार गायकवाडांची ओळख ही तपोवणामध्ये जेव्हा गायकवाडांचं वास्तव्य होत तेव्हाची. रात्री अपरात्री नागनाथ आण्णा तपोवनात येत झोपत आणि पहाटे दिवस उजाडण्यापूर्वी निघून जातं. त्यावेळी त्यांच्याशी गायकवाडांचा संबंध आला. पुढं हा परिचय वाढतच  गेला.

जेव्हा गायकवाड लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष होते तेव्हा नागनाथ आण्णा आमदार होते. 

असेच एकदा एका कामानिमित्त गायकवाड मुंबईला गेले होते. आमदार निवासात खोली मिळते का अथवा राहण्याची काही सोय होते का ते पाहण्यासाठी ते तिथल्या काऊंटरवर उभा होते. तेव्हा समोरून चालत जाणाऱ्या नागनाथ अण्णांनी गायकवाडांना पाहिलं.

अण्णा म्हणाले बाबा इकडं कुठं ? यावर गायकवाड म्हणाले, राहण्याची सोय होते का ते पाहत होतो. तेव्हा अण्णा म्हणाले चला माझ्याबरोबर माझी खोली आहेच कि. ते दोघे ही त्यांच्या खोलीत गेले. तिथं केवळ एकच बेड होता. गायकवाडांनी बरोबर आणलेला बिछाना अंथरला. त्यावर अण्णांनी गायकवाडांना बिछाना काढायला लावला. आणि बेडवर झोपण्यासाठी सांगितलं.

त्यांच्या आग्रहाखातर गायकवाड ही बेडवर झोपले. सकाळी उठून खोली बाहेर आले आणि पाहतात तर काय, दारासमोर अण्णा धोतर अंथरून गाढ झोपलेले. नंतर उठल्यावर अण्णा असे का केलंत असे म्हणता, बाबा मला याची सवय आहे माझी काळजी करू नका असं ते म्हणाले.

आदर मानापमान बाजूला ठेऊन अण्णांनी दिलेल्या वागणुकीने गायकवाड भारावून गेले. त्यांनी दिलेली वागणूक न विसरता गायकवाड जेव्हा खासदार झाले, तेव्हा त्याची परतफेड करण्याची संधी त्यांना चालून आली.

खासदार असताना अण्णा साखर कारखाना काढण्यास मदत करण्यासाठी गायकवाडांना भेटण्यास आले. गायकवाडांकडे जेव्हा कोणतेच पद नव्हते तेव्हा अण्णांनी दिलेली वागणूक त्यांच्या लक्षात होती. त्यांना पूर्वीची भेट आठवली, गायकवाडांनी कारखाना काढण्यासाठी मदतीचे आश्वासन दिलं.

त्यावेळी अण्णांनी भागातील हजारो सह्यांचे कागद दाखवले. तेव्हा गायकवाडांनी ताबडतोब इतर खासदारांच्या सह्या घेऊन अण्णांच्या साखर कारखान्याला अंतिम मंजुरी मिळवून दिली. अण्णांचा  साखर कारखाने उभा राहिला. अण्णांनी कारखाना उभारणीसाठी खूप कष्ट घेतले. कारखान्यावर येताना घरातून स्वतःचा जेवणाचा डबा बरोबर आणायचे.

बसायला घोंगड घेऊन कष्टानं उभा केलेला साखर कारखाना आज महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा कारखाना ठरला आहे. अश्याआदर्श व्यक्तिमत्वाचा त्याग पाहून या महान स्वातंत्र्य सैनिका पुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं असं गायकवाड आपल्या पुस्तकात म्हणतात.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.