खर्रा तो एकची धर्म..
कॉलेजमध्ये बंड्या बबलीवर लाईन मारायचा. पण बबलीच्या मनात नेमकं काय चालू होतं हे त्याला काही माहिती नव्हतं. त्यानं पिंट्याला सांगून तिच्या मैत्रिणीकडून काही जांगडबुत्ता जमते म्हणून ट्रायही मारले, पण काही केल्या जुगाड जमत नव्हतं.
एक दिवस बंड्या आणि पिंट्या कॅन्टिनमध्ये गप्पा मारत होते. अचानक तिथं बबली त्यांच्या जवळ आली,
म्हणाली….
‘बंड्या मावं प्रेम हाय तुयावर, आय लव्ह यू… सांग नं तुयाकडून का हाय ते.’
बंड्या गप्प होता. त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. पिंट्या आश्चर्यानं डोळे मोठे करून बंड्याकडे पाहत होता. पण बंड्याच्या तोंडातून काही केल्या शब्द फुटत नव्हते.
ते बघून बबली म्हणाली.
‘मी जाऊन रायली. तु यवड्या दिवसापासून मायावर लाईन माराचा तं मले वाटलं होतं का तुयं बी मायावर प्रेम हाये.’
असं म्हणून बबली नाराज होऊन ताडकन तिथून निघून गेली. पिंट्या अचानक समोर आलेल्या प्रसंगानं बिथरला होता. तेवढ्यात बंड्या अचानक बाहेर गेला. अन् एका मिनिटात लगेच आत आला.
पिंट्या म्हणाला अबे तुले प्रपोज केलंनं पोट्टीनं. आन् तु काईच बोलून राहला नाई.
‘बंड्या म्हणाला अबे कसं बोलू तोंडात खर्रा होता नं…
बंड्या तोंडातला खर्रा थुंकायला बाहेर गेला होता. हा प्रसंग आहे विदर्भातला…
प्रसंग जरी काल्पनिक वाटत असला तरी असे प्रसंग रोजच घडत असतात. यावरून इथली खर्याची क्रेज किती आहे हे लक्षात येते.
खर्रा म्हणजे जो नागपूरला मिळतो तोच. खर्रा म्हणजे मावा, मट्रेल, पट्टा, व-हाडी नाही. त्यांची जातकुळ एकच. पण हा जरा उच्चवर्णीय. सरकारी कार्यालय असो किंवा फ्लॅटच्या पायऱ्यांचा कोपरा, या भिंती खर्याबद्दलच प्रेम दर्शवतात. इथे नाष्टा आणि खर्रा एकाच किमतीत मिळतो. अन् चहा नाष्ट्याच्या टपरीवाल्यापेक्षा खर्याचा टपरीवाला जास्त कमावतो.
एका बाजूला एक असे कित्येक टपऱ्या असतात. मात्र सर्वांचा धंदा तेजीत.
माझं गाव वणी जिल्हा यवतमाळ, माझ्या गावात चंद्रपूर-नागपूर रस्त्याच्या कडेला फक्त एका बाजूला अर्ध्या किलोमीटरपर्यंत एकाला लागून एक असे अंदाजे 80 ते 100 टप-या असेल. सर्वांचा धंदा तेजीत आणि त्यांच्यात कोणतीही कॉम्पिटिशन नाही.
आता हा खर्रा नेमका कुठून आला हा प्रश्न आपल्याला पडला असेल.
याबाबत आम्ही काही खर्रा खाऊन दात लालंच लाल झालेल्या बुझुर्ग खर्रा एक्सपर्टची भेट घेतली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार….
आधी नागपूरमध्ये पट्टा वऱ्हाडी मिळायचा. यात काळा तंबाकू असायचा, नंतर पिवळ्या तंबाकुची एन्ट्री झाली. कारण काळ्या तंबाकूने खर्याचा रंग काळा यायचा. असा मावा मिळायचा. नागपुरात मिलशी जुळलेली प्रसिद्ध खाद्यशैली म्हणजे सावजी. मिलमुळे सावजी खाद्यशैली उद्यास आली. याच मिलने खर्रा देखील आणला अशी माहिती आहे.
विदर्भातल्या काम करणा-या माणसाचं ड्युटी अवरमध्ये काम चालू राहिल की नाही याची गॅरंटी नाही मात्र खर्रा चावणं मात्र गॅरंटीने चालू राहिल. खर्रा भेटल्याशिवाय इथं लोकांनी एनर्जी मिळत नाही. तर मिलमध्ये कामगार मावा घेऊन जायचे. दिवसा तर काही समस्या नव्हती पण रात्री मात्र कामगारांचे मावा खायचे वांदे व्हायचे.
तोंडात मावाच नाही तर मग काम कसं होणार?
त्यातुन कुणीतरी शोध लावला की माव्यामध्ये पाणी टाकण्या ऐवजी फक्त घट्ट चुना आणि काळ्या ऐवजी पिवळा तंबाकू टाकायचा. प्रयत्न सुरू झाले आणि सक्सेसही. हा मावा अधिक वेळ टिकू लागला.
हाच खर्राचा शोध…
कामगार ओल्या मावा ऐवजी खर्रा घेऊन मिलमध्ये जाऊ लागले. खर्रा खाऊन जोमात काम करू लागले. पुढे मिल शेजारी मावा ऐवजी सुक्का म्हणजे खर्याची डिमांड होऊ लागली. पुढे मौखिक प्रसिद्धी मिळून संपूर्ण नागपुरात खर्रा वाढला. ही कहाणी किती खरी आणि खोटी याची माहिती नाही. पण काही किडलेल्या लाल दातांच्या जुन्या सिनियर लोकांकडून ही माहिती मिळाल्याने खरी असू शकते.
खर्रा नागपूरपासून इतर ठिकाणी पोहोचला.
नागपूर ते चंद्रपूर पट्टा आणि नागपूर ते भंडारा गोंदिया या पट्यात तो जास्त दिसून येतो. वर्धा अमरावती मार्गानं जाताना त्याची क्रेज हळूहळू कमी होते. तर नागपूर-चंद्रपूर मार्गावर वरो-या पासून पुढे भद्रावती, वणीमध्ये याची लोकप्रियता आणखी आहे. खर्रा शौकिनांच्या मते भद्रावतीच्या खर्रासारखा खर्रा जगाच्या पाठीवर कुठेच नाही.
विदर्भात खर्र्याची क्रेज अशी काही आहे की काही कम नसलं, बोअर झालं की खा खर्रा. एखादा माणूस मरत असेल तर आधी म्हणेल थोडा खर्रा खाऊ दे. आजारी माणसांना लोक म्हणतात की थोडा खर्रा खा तोंडाला चव येईल.
खर्रा पोहोचला आफ्रिकेत…
खर्राचे शौकिन जिथं जाईल तिथं लाल केल्याशिवाय राहत नाही. म्हणून खर्रा खाऊन थुंकून. तर आफ्रिकेमध्ये विदर्भातून अनेक लोक कामांसाठी गेले आहे. तोंडात खर्राच नाही तर काम कसं होईल त्यामुळे त्यांनी तिथे या वस्तू मागवून खर्रा सुरू केला. खर्याची चटक तिथल्या कामगार लोकांनाही लागली.
परदेशात काम केलेले व कृषी इंजिनियरिंगमध्ये कार्यरत सुभाष लोढे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आफ्रिका खंडातल्या अनेक देशांमध्ये हा खर्रा पोहोचला आहे. नायजेरियामधल्या वर्कर्सने खर्याचे साहित्य, कृती नेऊन तिथं खर्रा सुरू केला आहे. हे प्रमाण आता तिथंही चांगलं फोफावतंय. अशी माहिती त्यांनी दिली.
हा खर्रा अनेकांना व्यवसाय देतो. तर खर्रच्या उधारीने घरं ही बरबाद झाले आहेत. एक साधारण व्यक्ती दिवसाला तीन ते पाच खर्रे खातो. 20 रुपयांचा एक खर्रा या हिशोबाने दिवसाला 60 ते 100 रुपये तो खर्च करतो. अनेक बेरोजगार तरुण खर्र्च्या आहारी गेले आहेत. उधारी झाली आहे.
बसस्टॉपवर जा…
एखादा खर्रा खात असेल तर बाजुचा तुम्हाला भाऊ थोडासा पाहुद्या म्हणून तुमच्या खर्याच्या पन्नीत हात टाकेल, पुढचा व्यक्ती देखील तेवढ्याच आदराने घ्या भाऊ म्हणेल. आज जात धर्माच्या नावावर लढताना खर्रा घेताना मात्र कुठल्याही प्रकारे या गोष्टी मध्ये येत नाही.
म्हणूनच… खर्रा तो एकची धर्म….
हा धर्माहून अधिक मोठ्ठा विखार, जो महाराष्ट्रभर पसरला. भारताच्या सीमा ओलांडून तो जगभर गेला. कित्येकांची घरं धर्माहून अधिक कट्टरता असणाऱ्या या खर्यात नष्ट झाल्या असतील.
निकेश जिलठे – लेखक स्वतः खर्रा खात नसले तरी परिसरातील चार पाच पानटपरीवर त्यांची खर्रा न खाता लाल करणारे एक्सपर्ट म्हणून ओळखले जातात.
हे ही वाचा.
- दारू, सिग्रेट, विमल, गायछाप, मावा खातो हे नव्या नवरीला अस सांगायचं असतय.
- जगातील सर्वात कडक दारू कोणती माहितय का ?
- दारू सोडून लोक आत्ता विंचवाच व्यसन करू लागली आहेत.