ही आहे नागराज मंजुळेंच्या “झुंड” सिनेमाची स्टोरी.

आपल्याकडील शाळा – महाविद्यालयात ‘शारिरीक शिक्षण’ या विषयाच्या पिरियडचा उपयोग जास्त करून खेळाडू घडवण्याच्याऐवजी मागे राहिलेला अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी केला जातो. शारिरीक शिक्षणाबाबतीत एवढा नकारात्मक दृष्टीकोन असण्यामागील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे खेळाचं मैदान हे ज्ञान मिळवण्याच देखील माध्यम आहे हेच कोणाला मान्य नसतं. मूल्यशिक्षणाची चार पुस्तके जेवढं तुम्हाला शिकवू शकत नाहीत त्या पेक्षा जास्त जीवनातील मूल्ये तुम्ही खेळाच्या मैदानावर शिकू शकता. 

पण हातात असलेल्या ‘डिग्री’ च्या आधारावर तुमचं समाजातील स्थान ठरत असलेल्या देशात बऱ्याच लोकांसाठी अजून देखील खेळ म्हणजे एक ‘चैन’ आहे.

पण नागपूर मधल्या एका प्राध्यापकाला मात्र या सगळ्या गोष्टी पटत नव्हत्या. खेळाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात आपण बदल घडवू शकतो यावर त्यांचा विश्वास होता. पण त्यांचा विश्वास असणाऱ्या गोष्टींना जेंव्हा त्यांनी प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली तेंव्हा मात्र त्यांची चेष्टा सुरू झाली.

भिकेचे डोहाळे लागलेला माणूस ते फक्त प्रसिद्धी साठी करत असलेला देखावा अस म्हणून त्यांच्या कामाला हिणवण्यात आलं.

फक्त समाजच नाही तर स्वतःचा मुलगा देखील आपला बाप या खेळाच्या वेडापाई आपल्याला भविष्य देऊ शकत नाही या विचाराने देश सोडून निघून गेला. मात्र या माणसाचा विश्वास डगमगला नाही , लोक त्याला वेड्यात काढत होते मात्र त्याने आपली खेळाप्रति असलेली निष्ठा ढळू दिली नव्हती. आज सुमारे एका तपाहून अधिक काळ सुरू असणारा त्यांचा हा प्रवास इतका प्रेरणादायी आहे की,

या प्रवासावर नागराज मंजुळे सिनेमा बनवत असलेल्या झुंड या सिनेमात या प्राध्यापकाच्या भूमिकेत असणार आहेत या शतकातले महानायक अमिताभ बच्चन.

विजय बारसे सर. 

नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधील प्राध्यापक. दिवसातील 5 तास नोकरी आणि इतर वेळात संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत सर्वसामान्य मात्र सुखी आयुष्य जगणारी व्यक्ती.  पण २००२ मधल्या एका पावसाळी दिवसाने मात्र त्यांच जीवनच बदलून टाकलं. पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी एक आडोशाला ते उभे राहिले असताना पावसात फुटबॉल खेळणारी मुले त्यांना दिसली. एका प्लॅस्टिकच्या बॉक्सला फुटबॉल बनवून, पडणाऱ्या पावसाची तमा न बाळगता ती मुले खेळत होती.

बहुतांश मुले हि शेजारीच असलेल्या झोपडपट्टी मधील होती. फुटबॉलचे कोणतेही नियम न पाळता, अनवाणी पायाने खेळणारी ती मुले ज्या पद्धतीने खेळचा आनंद घेत होती ते पाहून सरांच्या मनात एक विचार आला.

ते तसेच तडक पावसात भिजत आपल्या कॉलेज मध्ये गेले आणि एक फुटबॉल घेऊन त्या मुलांच्याकडे आले. सरांनी त्या मुलांना बॉल देत तुम्हाला फुटबॉल ची मॅच खेळायला आवडेल का असं विचारलं, प्लॅस्टिकच्या बॉक्स बरोबर फुटबॉल खेळणाऱ्या मुलांसाठी खराखुरा बॉल खेळायला मिळतोय हीच खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी लगेचच सरांना होकार सांगितला.

आता मॅच खेळण्यासाठी दोन टिम्सची गरज असते, दुसऱ्या टिमचा शोध घेण्यासाठी सर अजून एका झोपडपट्टीमध्ये गेले यावेळी मात्रं जातानाच ते स्वतःबरोबर फुटबॉल देखील घेऊन गेले होते. या झोपड्पट्टीतली मुले देखील मॅच खेळायला लगेच तयार झाली. फुटबॉल चा कुठलाही नियम माहित नसणाऱ्या या झोपडपट्टीतल्या मुलांना बरोबर घेऊन खेळलेली हि मॅचच झोपडपट्टी फ़ूटबॉल’ या अनोख्या संकल्पनेची सुरुवात होती. केवळ १५ – २० मुलांना घेऊन सुरु केलेला हा झोपडपट्टी फुटबॉल आज देशभरातल्या ७० पेक्षा जास्त जिल्ह्यात खेळाला जातोय.

झोपडपट्टीतल्या मुलांना एकत्र करून फुटबॉल च्या मॅचेस खेळवणे एवढाच उद्देश या संकल्पनेमागे कधीच नव्ह्ता. ड्रग्सच्या आहारी गेलेली, छोट्या मोठ्या गुन्ह्यात अडकून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेली अशी अनेक मुले बारसे सर आपल्या आजूबाजूला पाहत होते. किती जरी इच्छा असली तरी  झोपडपट्टीच्या अशा वातावरणातून हि मुले बाहेर पडू शकत नाही कारण आपला समाज अशा मुलांना स्विकारायलाच तयार नसतो.

या मुलांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी देण्याच महत्वाच काम बारसे सर करत आहेत आणि यासाठी साधन म्हणून वापरलं जात आहे फुटबॉलच मैदान.

आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अत्यंत कमी संसाधनात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, वैयक्तिक विकास कसा करावा, करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत अशा अत्यंत मुलभूत विषयांवर या मुलांना प्रशिक्षण दिल जाते. आज सुमारे १० हजार पेक्षा जास्त मुलांना ‘झोपडपट्टी फुटबॉल‘ चा फायदा झाला आहे.

मिळालेल्या या एका संधीचा फायदा घेवून आज स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबियांच देखील आयुष्य या मुलांनी बदलून टाकल आहे. या मुलांच्या जीवनात फुटबॉलच्या मदतीने सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या बारसे सरांच्या या कामाची दखल FIFA ने देखील घेतली आहे.

FIFA चा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ Diversity Award ‘ झोपडपट्टी फुटबॉलला मिळाला आहे. FIFA तर्फे भारताला मिळालेला कदाचित हा सर्वोच्च सन्मान असेल.

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.