अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, ज्यांना मारून भर चौकात टांगण्यात आलं होतं !

गुलाल ! 

सध्याच्या पिढीने पाहिलेला सगळ्यात भारी पॉलिटिकल ड्रामा. या पिक्चरमध्ये खूप भारी भारी डायलॉग आहेत. तर त्याबद्दल परत कधी तरी, गुलाल मध्ये एक प्रसंग आहे ज्यात डूकी बना जडवालच्या चमचांना सांगत असतो,

” ये सब खतम करो. मैं करने पर आया न, जडवाल को पूरा खोल के चौराहे पर लटका दूंगा. क्या समझा? नजीबुल्लाह को टांगा था न काबुल में, तू बस पैदा हुआ था तब. छोड़ दे इनको.”

 के.के.मेनन ने जबरदस्त स्टाईलमध्ये हा डायलॉग म्हटलाय. तेव्हाच उत्सुकता वाटली होती कोण होता हा नजीबुल्ला ? इतिहासातलं पात्र की काल्पनिक पात्र ?

एखाद्याला मारून चौकात टांगणे अशा गोष्टी मध्ययुगातच चालायचं असं वाटायचं. पण आजही असे काही देश आहेत जे अजूनही मध्ययुगातच जगतात असे मानायला वाव आहे. अफगाणिस्तान त्यापैकीच एक, आणि नजिबुल्लाह या अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष !

नजिबुल्लाहचा जन्म एका श्रीमंत पश्तून कुटुंबात झाला. घरच्या सुबत्तेमुळे सर्वसामान्य अफगाणी मुलांना जी गोष्ट शक्य नाही ती त्याला करता आली. ती गोष्ट म्हणजे “शिक्षण”. शिक्षण म्हणजे चैन हे अफगाणिस्तानचे आजही वास्तव आहे. अशातच नजिबुल्लाह शिकून डॉक्टर झाला. त्याचा शिक्षणाचा काही काळ भारतातही गेला. शिक्षणाने माणसाला स्वतः विचार करायची शक्ती निर्माण होते. नजिबुल्लाहची सुद्धा तशी झाली. यामुळेच की काय अफगाणिस्तानसारख्या कट्टर धार्मिक विचाराच्या देशामध्ये वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी तो डाव्या विचाराच्या पक्षाबरोबर जोडला गेला.

Dr. Najibullah
wikipedia

पीपल्स डेमोक्रटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान (PDPA) हा पक्ष कम्युनिस्ट विचारांचा म्हणून ओळखला जायचा. यातले बरेचसे नेते उच्चशिक्षित होते. काही जण परदेशात शिकून आलेले होते. सेक्युलर आणि समाजवादी विचारांवर त्यांचा विश्वास होता. यातच एक नेता होता तो म्हणजे बारबरक करमल. या बारबरकचा नजिबुल्लाह फॅन होता. त्याची सावली बनूनच तो राहायचा.

धिप्पाड देहाच्या आणि गरम डोक्याच्या नजीबला बारबरकचा बॉडीगार्ड बनवण्यात आले. गंमतीने नजीबला “नजीब ए गौ” असं म्हटल जायचं. गौ म्हणजे सांड !

थोड्याच दिवसात नजीब PDPA मध्ये प्रगती करू लागला. अफगाणिस्तानच्या राजाला हटवून त्याचा चुलत भाऊ आणि पंतप्रधान दाउद खान पहिला राष्ट्राध्यक्ष बनला. त्याने लोकशाहीची घोषणा केली. देशाची घडी बसतच होती दरम्यान PDPA ने दाउद खान च्या विरोधात बंड पुकारले. बंड मोडण्याच्या प्रयत्नात ते जास्त चिघळले. या बंडाला कम्युनिस्ट रशियाची मदत होती. रशियाच्या सपोर्ट ने PDPA चे नूर महमद तारिकी अध्यक्ष बनले. मात्र एका वर्षाच्या आतच रशियाची नामर्जी झाल्याने त्यांचा खून झाला. हे घडवून आणणारे हजीफुल्ला आमीन पुढचे राष्ट्राध्यक्ष बनले. दैवदुर्विलास म्हणजे रशियाने त्यांनासुद्धा ३ महिन्यात ठार केले.

अशा रीतीने कम्युनिस्ट रशियाने स्वतःच्या फायद्यासाठी अफगाण राजकारणाचा खेळखंडोबा करून सोडला.

त्यानंतर आलेल्या बारबरक यांच सरकार मात्र स्थिर राहिले. त्यांच्या सरकारात नजिबुल्लाह गृहमंत्री आणि देशाच्या गुप्तचर संघटनेचे चीफ बनले. या कम्युनिस्ट सरकारांनी अफगाण स्त्रियांना अनेक हक्क दिले. सगळ्या धर्मियांना समान हक्क दिला. अफगाणिस्तानला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न चालू केला. हे नवीन बदल पचवू न शकल्यामुळे मात्र खेडोपाडयातील जनतेशी मात्र त्यांची नाळ जोडू शकली नाही. अशिक्षित लोक धर्माच्या नावाखाली केलेल्या आवाहनाला भुलून सरकारविरुद्ध बंडाच्या पवित्र्यात उभे राहिले.

त्यांच्याच संघटनेचे नांव तालिबान.

तो पर्यंत नजिबुल्लाह यांना रशियाने राष्ट्राध्यक्षपदी बसवले होते. गादीवर आल्यावर नजिब यांना जनतेमधला असंतोष जाणवत होता. त्यांनी हळूहळू मार्क्सवाद मागे ठेऊन मध्यममार्ग स्वीकारायला सुरवात केली. स्वतःचे नांव नजीब पासून नजिबुल्लाह असे करून कट्टर इस्लामियांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानला इस्लामिक देश घोषित केले. तरीही कट्टरपंथीयांचे समाधान झाले नाही. तालिबानची लोकप्रियता वाढतच गेली.

१९८९ साली तालिबानचा उद्रेक वाढल्यावर अफगाण सरकारला मदतीचे निम्मित करून सोविएत रशियाचे सैन्य अफगाणिस्तान मध्ये घुसले.

शीतयुद्धामुळे अमेरिकासुद्धा अफगाणिस्तानच्या स्थितीवर डोळा ठेऊन होती. त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएएसच्या सहाय्याने तालिबानला मदत सुरु केली.

तालिबान मोठी करण्यामध्ये अमेरिकेचाच हात आहे. १९९१ साली  सोविएत रशियाचे पतन झाले आणि नजिबुल्लाह यांना मिळणारी मदत बंद झाली. तालिबान एक एक शहर जिंकत काबुलकडे कूच करू लागले. लढाऊ विमानात भरण्यासाठी तेलसुद्धा नाही अशी नजिबुल्लाह सरकारवर वेळ आली. तालिबान पुढे त्यांनी टिकण्याचा प्रश्नच नव्हता. नजिबुल्लाह यांनी राजीनामा दिला आणि नवे अंतरिम सरकार अस्तित्वात आले.

तालिबानी मुजाहिदीन काबुलमध्ये घुसखोरी वाढल्यावर नजिबुल्लाह यांनी रशियाला पळून जाण्याचा प्रयत्न केला. विमानतळावरच त्यांना रोखण्यात आले.

त्यामुळे त्यांनी युनायटेड नेशनच्या कंपाऊंड मध्ये आश्रय घेतला. तिथून भारताला जाण्याची त्यांची इच्छा होती. भारताचा ही तालिबानला विरोध होता त्यामुळे आपणही नजिबुल्लाहला आसरा देण्यास तयार होतो. मात्र त्याकाळात भारतातीलच सरकारे अल्पकालीन आणि अस्थिर असल्यामुळे नजीबला मदत पोहचवता आली नाही. त्याकाळातले अफगाणचे संरक्षण मंत्री अहमदशाह मसूदने भारताची मदत नजीब पर्यंत पोहचू दिली नाही.

अफगाणिस्तानचा हा माजी राष्ट्राध्यक्ष साडे चार वर्ष यूएनच्या कंपाऊंडमध्ये लपून राहिला. तिथे बसून त्याने पीटर होपकिकच्या ग्रेट गेम या पुस्तकाचं पख्तो भाषेत भाषांतर सुरु केलं.

सप्टेंबर १९९६ मध्ये जेव्हा तालिबान काबुलमध्ये आले तेव्हा मात्र अहमदशाह मसूदने नजीबला भारतात जाऊ देण्याची तयारी दर्शवली. मात्र नजीबुल्लाने त्याला चक्क नकार कळवला. त्याला ताजिकची मदत घेऊन पख्तून समाजा पुढे मान खाली घालायची नव्हती. २७ सप्टेंबर ला रात्री त्याने शेवटचा रेडीओ संदेश युएन कंपाऊंड मधून दिला ज्यात मदतीची याचना होती. मात्र कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. तालिबानी सैनिकांनी त्याला मारले. त्याच्या देहाचे विटंबना केली.

२८ सप्टेंबर १९९६ ला सकाळी  काबुलच्या अरियाना चौकात  डॉ. नजिबुल्लाह आणि त्याच्या भावाचा मृतदेह लटकत ठेवलेला होता.

अतिशय विदारक असे ते दृश्य होते. तालिबान्यांना संदेश द्यायचा होता की आता त्यांच राज्य सुरु होतंय. काबुलमध्ये तालिबान्यांनी “नजीब सारख्या धर्माचा शत्रू असणाऱ्या कम्युनिस्टाला हीच शिक्षा योग्य आहे” असे सांगत जल्लोष केला.

आपल्या विरोधी विचाराला संपवण्यासाठी देश आणि धर्माचा वापर करणे याच उदाहरण तालिबानने जगापुढे ठेवले. तालिबान ने पुढे अनेक लोकांना मारल. माणुसकीला काळिमा फासणारी अनेक कृत्ये केली. पण नजिबुल्लाहचा लटकणाऱ्या देहाचा फोटो आजही जगात कट्टरतावाद्यांच खरं बिभीत्स रूपाची आठवण करून देतो.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.