संत नामदेव दूर पंजाब पर्यंत जाऊन “बाबा नामदेव” कसे झाले..?

दक्षिणेत रामेश्वरपासून उत्तरेकडील हिमाचल प्रदेशापर्यंत अखंड भारतभर सामाजिक समतेचा व ऐक्याचा विचार प्रत्यक्षात रुजवणारे संत शिरोमणी नामदेव.

‘नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’

हाच संकल्प आयुष्यभर जपून जातिभेदाला फाट्यावर मारत भक्तिमार्ग सर्वाना खुला असतो हे जाणणारे व स्वत: या मार्गाचा प्रसार करणारे संत नामदेव.

२६ ऑक्टोबर १२७० रोजीचा संत नामदेवांचा जन्म. तर तिथीने कार्तिक शुध्द एकादशी, शके ११९२. त्यांच्या जन्मगावाविषयी अभ्यासकांच्यात एकमत नाही. तरी नरसी- ब्राम्हणी’ हे त्यांच जन्मगाव असल्याचे सांगितले जाते. लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीचे वेड नामदेवांना असे.

आपल्या भक्तीने प्रत्यक्षात विठ्ठलाला प्रसन्न करणारे आणि किर्तनकलेमुळे प्रसंगी पांडुरंगाला ठेका धरायला लावणारी किर्ती होती. त्यांचे काम, किर्तन आणि समाजप्रबोधन हे महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते असे नाही. तर पंजाबमध्येही नामदेव महाराजांचे नाव आहे.

ते आपल्या आयुष्याची शेवटची २० वर्षे पंजाबमध्ये होते. इतकच काय तर शीखांच्या गुरु ग्रंथसाहेब मध्ये नामदेवाच्या ६१ पदांना स्थान मिळाले आहे.

त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवीपैकी ते एक असलेल्या संताचे महाराष्ट्र, पंजाबसोबतच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत संत नामदेव महाराजांची मंदिरे आहेत.

पण मराठवाड्यातील भक्त पंजाबला नेमका कसे पोहचले ?

संत नामदेव – संत ज्ञानेश्वरांची भेट

सुमारे १२९१ मध्ये संत नामदेवांची ज्ञानदेवांशी भेट झाली असावी. आपली भक्ती गुरुपदेशावाचून अपुरीच आहे, याची जाणीव ह्या भेटीनंतर त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेत त्यांचे शिष्यत्व स्विकारले.

यावेळची अशी आख्यायिका सांगितली जाते की,

संत नामदेव विसोबांना भेटण्यास गेले असता, विसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. ते दृश्य पाहून नामदेवांना चीड आली व त्यांनी विसोबांची निर्भर्त्सना केली. परंतु विसोबांनी देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव, असे म्हटल्यावर ‘देवाविण ठाव हे बोलणेचि वाव’ हा विचार नामदेवांच्या मनाला भिडला. गुरुपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला. विशुद्धभक्तीला अद्वैतबोधाचे अधिष्ठान प्राप्त झाले.

(मराठी विश्वकोश)

पुढे श्री संत ज्ञानदेव पंढरपूर येथे आले आणि ‘भूतळीची तीर्थे पहावी नयनी’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र ‘सर्वसुख आहे मज पांडुरंगी’ अशीच नामदेवांची धारणा असल्यामुळे तीर्थयात्रा करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती. पण अखेरीस ते ज्ञानदेवांबरोबर निघाले. या महाराष्ट्रातील अनेक संत ह्या तीर्थयात्रेत सामील झालेले होते. ह्या तीर्थयात्रेहून परतल्यानंतर १२९६ मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी समाधी घेतली.

२६ वर्षांच्या नामदेवांना तो प्रसंग आणि वियोग आतुन गलबलून टाकणारा होता. यानंतर नामदेवांनी खर्‍या अर्थाने महाराष्ट्र सोडला आणि आपल्या आयुष्याची उर्वरित ५४ वर्षे भागवत धर्माच्या प्रचारात आणि सेवेत वाहिली. त्यामध्ये आधी दक्षिणेच्या आणि नंतर उत्तरेकडील यात्रा केल्या.

आणि मराठवाड्यातील संत पंजाबमध्ये गेला

काशी, पुष्कर करुन हरिद्वारला असताना त्यांना दिल्लीच्या बादशाहाने कैद करून दरबारात नेले. तेथे मेलेली गाय जिवंत न करण्याचा आणि हत्तीला शांत करण्याचा प्रसंग घडला व त्यानंतर ते पंजाबातील भूतविंडमध्ये आले. संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे म्हणतात, संत नामदेव महाराज १३ व्या शतकात पंजाबमध्ये गेले. तिथे अनेक वर्ष वास्त्यव्यास होते.

याच भूतविंड गावात त्यांना त्यांचे पंजाबातील उत्तराधिकारी बाबा बोहरदास भेटले. हेच बाबा बोहरदास अखेरपर्यंत संत नामदेवांसोबत होते, त्यांनीच नामदेवांचे पंजाबमधील कार्य त्यांच्या पश्चात सुरू ठेवले.

आज घुमानमध्ये असलेलं त्यांचे स्मृतिमंदिर आधी याच बाबा बोहरदासांनी उभारले.

इथून नामदेव महाराज मर्डी किंवा मरड या गावात गेले. तेथे बोहरदासांचं लग्न लावून दिले, असं सांगतात. मरडवरून ते या भट्टिवाल गावात आले. तिथे तेव्हा पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता. लोक पाण्यासाठी हाल सहन करत होते. नामदेवांनी तलाव, विहिरी पाडण्यासाठी लोकांना उद्युक्त केले आणि पाण्याचा दुष्काळ संपला. भट्टिवाल आणि आसपासच्या सखोवाल, धारिवाल या गावांमध्ये बाबा नामदेवांना मानणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आजही त्याच्या कित्येक खाणाखुणा सापडतात.

घुमान गावचे संत नामदेव

भट्टिवाल या गावातून नामदेव जवळीच जंगलात येऊन वसले. तिथे ते कीर्तन-भजन करत. त्यांचे भजन ऐकून लोक भेटण्यासाठी येत. यासाठी त्यांनी पंजाबी भाषा आत्मसात केली होती. यामुळे नामदेवांच्या उपदेशाने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला. लोकांमध्ये नामदेव महाराजांबद्दल श्रद्धा निर्माण झाली. या प्रवचनांमधून आणि किर्तनांमधून त्यांनी गावातील अनेक वाईट चालीरिती, व्यसने याविषयी लोकांचं प्रबोधन केले.

त्यांच्या येण्यानंतर लोकांची वर्दळ वाढली. त्यांच्या भक्तांची वस्ती आसपास होऊ लागली आणि घुमान नावारुपाला आले. नामदेव घुमत घुमत म्हणजे देशभर फिरत इथे आले आणि स्थिरावले म्हणून ‘घुमान’ किंवा घुमान आडनावाचे भक्त इथे त्यांच्या सेवेसाठी राहत होते म्हणून ‘घुमान’, अशा या गावाच्या नावाच्या दोन उत्पत्या सांगितल्या जातात. कारण इथले काही जण आपले आडनावच घुमान असं लावतात.

पंजाबींचे बाबाजी…

शीख लोक संत नामदेव महाराजांना ‘भगत नामदेव’ अशी हाक देतात, बाबा नामदेव किंवा नुसतंच बाबाजी…अशा नावांनी पंजाबी माणूस संत नामदेवांना हाक मारत असतो.

आपल्या सर्वांना विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होत वीणा वाजवत कीर्तन करणारे संत नामदेव. अशी प्रतिमा चटकन डोळ्यासमोर येते. मात्र पंजाबमधील त्यांच्या घुमान गावातल्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घरात आजही बाबा नामदेवांची प्रतिमा ही एक दाढीवाल्या बाबांचा फोटो, डोक्यारील केसांचा बुचडा बांधलेला आणि हातात जपमाळ अश्या स्वरुपातील आढळते. संपूर्ण पंजाबमध्ये नामदेव याच रुपात भेटतात. त्यांचा हा फोटो घुमानमधील नामदेव दरबार कमिटीने तयार केला आहे.

गुरुद्वारा आणि मंदिर असा अनोखा संगम…

घुमान गावात संत नामदेव बाबा यांची समाधी आणि नामदेवजी का गुरुद्वारा…

म्हणजे नामदेवांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेला गुरुद्वारा अशी एकत्र स्वरूपाची आहे.

मोहम्मद तुघलक याच्या काळात त्याच्या अत्याचाराच्या विरोधात नामदेवांनी जनजागृती केली. तसेच तुघलकाच्या लोकांनी नामदेवांना त्रासही दिला. त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुघलक याचा नातू फिरोज याने ही समाधी बांधल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर/ गुरुद्वारा सन १७७० मध्ये सरदार जस्सासिंह राम-दिया यांनी बांधल्याचा / नूतनीकरण केल्याचा संदर्भ लेखक भाईसाहब कानसिंह नाथा यांनी त्यांच्या कोशात दिला आहे. शिखांच्या ‘गुरुविलास’ व अन्य ग्रंथांतूनही या समाधीस्थळाचे उल्लेख आहेत.

इथे योगीरुपातील बाबा नामदेवांची सुवर्णप्रतिमा असून, पुढ्यात एक शीला असून त्यावर कायम रेशमी वस्त्र पांघरलेले असते. त्याखाली पंजाबी म्हणजे गुरुमुखी लिपीत लिहिल आहे… अंतिम समाधी.

संत नामदेवांनी इथे अखेरचा श्वास घेतला आणि आपली इहलोकीची यात्रा संपवली, असे पंजाबी लोकांचं म्हणणे आहे. पण महाराष्ट्रात मात्र पंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नामदेवांची समाधी असल्याचा विश्वास आहे.

आयुष्याची अखेरची सुमारे वीस वर्षं संत नामदेव पंजाबात होते. तिथून फक्त समाधी घेण्यासाठी ते पंढरपूरला आले यावर त्यांच्या पंजाबी भक्तांचा विश्वास नाही. ते म्हणतात, इथेच घुमानमध्येच त्यांचं महानिर्वाण झालं.

पण महाराष्ट्रातील श्रद्धेनुसार आणि संशोधक रा. चि. ढेरे यांच्या मतानुसार,

नामदेव पंजाबमधील आपलं कार्य संपवून अखेरीस महाराष्ट्रात आले आणि पंढरपूरात समाधी घेतली. ज्या भागवतधर्माची पताका खांद्यावर घेऊन नामदेव पंजाबमध्ये गेले, त्या भागवतधर्माचे केंद्र असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाचं अखेरीस दर्शन व्हावे, आपल्या आईची सेवा व्हावी ही नामदेवांची आस होती, असं ढेरे म्हणतात.

याचा स्पष्ट पुरावा म्हणजे ‘नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वरी देती’ हा नामदेवांचा अभंग. त्यामुळे पंजाबला निरोप देऊन नामदेव अखेर पंढरीला आले आणि समाधीस्थ झाले, असे ढेरे सांगतात.

नामदेवांच्या पंजाबमधील समाधी मंदिराच्या घुमटाच्या आतील बाजूवर त्यांच्या आयुष्यातील प्रसंग चितारण्यात आले आहेत. यात दिल्लीतील दरबारातील प्रसंगापासून ते अगदी आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या नामदेवांपर्यंतच्या चित्रांचा समावेश आहे.

पंजाबी मनातील त्यांचे स्थान…

शीख धर्मात दहा गुरूंप्रमाणेच प्रातःस्मरणीय असणाऱ्या १५
भगवतांमध्ये नामदेवांना ‘भगत शिरोमणी’ म्हणून ओळखले जाते. गुरु अर्जुन देवांनी तर ‘नामे नारायणे नाही भेद’ असे सांगत नामदेव आणि परमेश्वरामधील अंतरच संपवले. आज अनेक वर्षानंतरही पंजाबी मनात असलेले त्यांचे स्थान फार मोठे आहे.

संदर्भ : नामदेवे रचिला (शीख धर्माचा) पाया. लेखक – निलेश बने.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.