सगळे देशप्रेमाबद्दल गप्पा मारत होते तेव्हा नाना कारगिलच्या युद्धात जवानांसोबत उभा होता.

कारगिल युद्ध. आपल्या पिढीने बघितलेलं एकमेव खरखुर युद्ध. सगळा देश रोज येणाऱ्या शहिदांच्या बातम्या ऐकून थरारलेला. सगळे आपापल्या परीने काही मदत करता येते का हे पहात होता. शाळकरी मूले देखील आपल्या खाऊच्या पैशातून आपल्या सीमेवरच्या सैनिकांसाठी काही मदत शाळेत जमा करत होते. एकूणच भारावलेल वातावरण होतं.

अशातच फिल्मइंडस्ट्रीमधला एक माणूस होता जो फक्त तोंडी राष्ट्रभक्तीच्या गप्पा न मारता देशासाठी आपला जीव पणाला लावून लढणाऱ्या जवानांचा हौसला बुलंद करण्यासाठी युद्धक्षेत्रावर पोहचला होता. त्याच नाव नाना पाटेकर!!

नाना म्हणजे काळ्या मातीतून आलेला माणूस. नाटकाच्या ओढीने अभिनय क्षेत्रात आला. खिशात फाटका रुपया देखील नसताना त्याने अभिनयासाठी सर्वस्व वाहिलं. जे केलं ते एकदम मनापासून केलं आणि ठासून केलं. फायद्या तोट्याचा विचार कधी केला नाही. आणि म्हणूनच फक्त मराठीचं नाही तर हिंदी सिनेमामध्ये स्वतःची छाप पडू शकला.

१९९१ साली एक सिनेमा आला होता प्रहार. नानाने यात काम तर केलं होताच पण या फिल्मच दिग्दर्शन सुद्धा त्याने स्वतः केलं होतं. आर्मीच्या जवानांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमामध्ये त्यांच खरखुर प्रतिबिंब दाखवता यावं म्हणून नाना बराच काळ मराठा लाईट इंफंटरीच्या कँम्पवर त्यांच्या सोबत राहिला. त्यांचे जीवन, त्यांचे सुखदुःख समजावून घेतले. फक्त एवढच नाही तर पुण्याच्या एनडीए मध्ये त्याने स्वतः अवघड अशी कमांडो ट्रेनिंग पूर्ण केली.

आर्मीच्या रियल लोकेशनवर प्रहार बनला, लोकांना तो आवडला. नानाने रोलसाठी घेतलेल्या मेहनतीच कौतुक झालं. पण नानाचं आणि जवानांच या सिनेमाच्या निम्मितान जे नात बनलं होत ते फक्त एका सिनेमापुरत उरल नव्हत.

नाना कायम तिथे जात राहिला, त्यांना भेटत राहिला. तिथे त्याचे अनेक दोस्त बनले होते. आपल्याला माहित नसेल पण भारताचे माजी लष्करप्रमुख सध्याचे मंत्री जनरल व्ही.के.सिंग हे सुद्धा प्रहारच्या शुटींग वेळी नानाचे मित्र झाले होते. त्यांनी सिनेमात एक छोटासा रोल देखील केला आहे. त्यांचीपूर्ण बटालियन सिनेमामध्ये दिसते.

नाना पाटेकरला भारतीय सेनादलाने ऑनररी कॅप्टन बनवलं. लहानपणी त्याला आर्मीमध्ये जायचं होत पण पुढे त्याच पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे तिकड जाता आल नाही पण तेही स्वप्न या निमित्ताने साकार झालं.

भारतीय सेनेची तिन्ही दले अनेक सेलिब्रिटीना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून असा ऑनर देत असतात. हे पद तसं पाहायला गेलं तर नामधारीचं असते. आणि तसही यापैकी कोणी युद्धक्षेत्रात जाण्याच धाडस करत नाहीत. पण नाना त्यातला नव्हता.

१९९९ साली जेव्हा कारगिलचं युद्ध सुरु झालं तेव्हा नाना अस्वस्थ झाला होता. आपले भाईबंधू सीमेवर लढत आहेत , स्वतःचा जीव पणाला लावत आहेत आणि आपण घरात बसून टीव्हीवर त्यांच्या बातम्या पाहतोय हे योग्य नाही. त्याच्यातला मुळचा अंगभूत बंडखोरपणा उफाळून बाहेर आला. घरच्यांचा विरोध धुडकावून लावत तो थेट कारगिलला जाऊन पोहचला.

युद्धाच्या कथा ऐकणे नेहमी आपल्याला जोश आणणारे वाटते पण खरोखरच्या युद्धभूमीवर तशी परिस्थिती नसते. कधी काय घडेल सांगता येत नाही, शत्रूची गोळी कधी आपल्या शेजारच्याच वेध घेऊन गेली कळतही नाही. अत्यंत आक्रोश, रक्तपात अशा वातावरणात जवान लढत असतात.

नाना जेव्हा तिथे पोहचला तेव्हा लढायची परवानगी नव्हती पण त्याला जबाबदारी दिली की जवानांशी बोलायचं. त्यांचा हौसला वाढवायचा. नाना आनंदाने यासाठी तयार झाला. त्याच म्हणण होतं,

“हमारी असली ताकत तोप और एके 47 नहीं हमारे जवान हैं!!”

आपले फिल्मस्टारपण नाना पाटेकर मुंबईतचं सोडून आला होता. कित्येक दिवस तो रणांगणावर राहिला. सैनिकांबरोबर उघड्यावर झोपला, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या कथा ऐकल्या, त्यांना प्रेरणा दिली. एखादा जवान आपल्या साथीदार रणांगणात पडल्यामुळे आत्मविश्वास गमावून बसला असेल तर त्याला पुन्हा आपल्या पायावर उभा करण्यास नानाने मदत केली.

कारगिल युद्ध संपलं, आपण पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं. भारतीय आर्मी जिंकली. पण नानाच काम संपलं नाही.

तो आजही जवानांना भेटतो. शहीद झालेल्यांच्या घरी आपल्या नाम फौंडेशनच्यावतीने मदत पोहचवतो. आत्महत्या केलेले शेतकरी आणि सीमेवर लढलेले जवान यांच्यासाठी अजूनही नाना लढतोय ते ही याची कुठे वाच्यता न करता.

आपल्यापैकी अनेकजण सैनिकांसाठी काही तरी केले पाहिजे, शेतकऱ्यासाठी काही तरी केले पाहिजे असे म्हणत असतो, अनेक सेलिब्रिटी आपल्या सिनेमांतून अथवा भाषणातून देशभक्ती विकण्याचा प्रयत्न करत असतात पण थेट फिल्डवर जाऊन देशाच्या प्रश्नांशी लढणारे नाना पाटेकर सारखे रांगडे हिरो फारच कमी असतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.