मुंबईतल्या दंगलीवेळी नाना घराघरात जावून लोकांना शांततेचं आवाहन करत होता..

काश्मिरी फाईल्सबद्दल तुमचं काय मत आहे. नुकताच एका कार्यक्रमात नाना पाटेकरला पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. सध्या मिडिया कसा बाजार उठवते हे नानाला चांगल माहित असल्याने सुरवातीला तर नानाने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

पण तरिही पत्रकार विचारतच राहिल्याने नाना बोलला.

नाना म्हणाला,

हा चित्रपट मी पाहिला नाही. त्यामुळे मला सविस्तर बोलता येणार नाही. पण एखाद्या चित्रपटाबाबत वाद होणं बरोबर नाही. मला वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच रहावं गटतट होतं असतील तर ते चुकीचं आहे.

एकाबाजूला गटतट पडत असताना ट्रोलिंगचा विचार न करता नानाने थेट समाज जोडण्याची भूमिका घेतल्याने बऱ्याच जणांना बर वाटलं.

त्यावरूनच नाना एक जूना किस्सा आठवला.. हा किस्सा आहे १९९३ चा.

६ डिसेंबर १९९२, दुपारी २:३० वाजता एक बातमी येऊन धडकली की बाबरी मस्जिद पाडण्यात आली आहे. आणि त्यापुढी काही तासातच मुंबईतल चित्र बदललं. दंगली उसळल्या , सगळी कामधामं बंद झाली. चित्रपटांचे शुटींग थांबवण्यात आले.

त्यावेळी नाना पाटेकरचा बहुचर्चित तिरंगा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होता आणि तो आगामी ‘ क्रांतिवीर ‘ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जाणार होता. या घटनेमुळे इतर सेलिब्रिटी मंडळी घरात बसून होते पण नाना त्यावेळी घरोघरी जाऊन लोकांना आवाहन करत होते की या प्रकरणापासून दूर रहा.

एका मुलाखतीत या प्रकाराविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की ,

” घर पर बैठे बैठे घुटनसी हो गई थी. “

१२ मार्च १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्याने नानाच्या अंतर्मनावर खोलवर परिणाम केला जो पुढे त्याच्या अभिनयातही दिसला.

तेव्हा तिरंगा हा चित्रपट तुफ्फान चालत होता. बाळासाहेबांबद्दल त्यांची असणारी जवळीक आणि शिवसेनेचे बाबरी प्रकरणात येत असलेलं नाव यामुळे नाना अस्वस्थ झाले होते. रेडिएफला दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले की,

बाळासाहेब हे त्यांना पितृतुल्य आहेत, त्यांनी मला निवडणूकीच तिकीट देण्याचीसुद्धा तयारी केली होती पण मला निवडणूक लढवणे पसंत नव्हते. पुढे मी त्यांच्या नेत्यांचा प्रचार केला पण आता मी त्या पार्टीशी संलग्न नाही.

१९९३ ला जेव्हा परिस्थिती सामान्य झाली तेव्हा मेहुल कुमार दिग्दर्शित क्रांतिवीर या चित्रपटाची शुटींग सुरु झाली. तिरंगा सुपरहिट ठरल्याने नानाला घेऊन मेहुल कुमार अजून एक धडाकेबाज सिनेमा बनवू इच्छित होता. क्रांतिवीर चित्रपटात दिग्गज कलाकारांचा ताफा होता. नाना शिवाय डिंपल कपाडिया, डेनी, परेश रावल, ममता कुलकर्णी, अतुल अग्निहोत्री ही मंडळी सुद्धा होती.

जसा जंजीर हा चित्रपट अमिताभसाठी ओळखला जातो तसाच क्रांतिवीर हा नाना पाटेकरांसाठी ओळखला जाऊ लागला.

समाजातील धर्मावरून होणारे भांडण, सामान्य लोकांच्या विनाकारण होणाऱ्या कत्तली याविरोधात आवाज उठवणारा प्रताप नानांनी साकारला. आजवर आत साचलेला राग, चीड , संताप सगळा नानांनी अभिनयातून दाखवला.

या सिनेमातला एक यादगार सीन म्हणजे प्रताप विचारतो की बता इनमेसे हिंदू का खून कौनसा हे और मुसलमान का खून कौनसा हे…

हा सीन जितका भावनिक होता तितकाच आत्मपरीक्षण करायला लावणारा होता.  नानाच्या अभिनयाने ह्या सीनला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. सामान्य लोकांना नानाचा प्रताप भावला आणि हा सिनेमा हिट झाला.

या सिनेमातला सगळ्यांचा तोंडपाठ असणारा डायलॉग म्हणजे ,

आ गये मेरी मौत का तमाशा देखने . अब मुझे लटका देंगे. जुबान ऐसे बाहर आ जायेगी. आंखे बाहर आयेगी. थोडी देर लटका रहूंगा फिर ए मेरा भाई मुझे नीचे उतार देगा. फिर आप चे चे करते घर चले जाओगे खाना खाओगे और सो जाओगे.

केके सिंह यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले होते. सामान्यतः शुटींगच्या सेटवर अभिनय करणारी मंडळी डायलॉग पाठ करतात आणि मग शूट करतात पण नानाने एकदाच  संवाद वाचले आणि इतके मोठे संवाद नाना कशा प्रकारे म्हणेल याबद्दल दिग्दर्शक जरा शाशंक होते पण नानाने एका टेक मध्ये हा उत्कृष्ट सीन दिला.

क्रांतिवीर हिट झाला आणि नाना पाटेकर हे नाव अवार्ड सेरेमनिमध्ये धडकलं.

नानाला खात्री होती की स्टार स्क्रीन अवार्ड आपल्याला मिळू शकतो पण सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर मधला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नानाला हेही पुरस्कार प्राप्त झाले. नानाला तेव्हा कळून चुकलं की सामान्य माणसाचा संताप आणि त्याचा झालेला उद्रेक क्रांतिवीरमधल्या भूमिकेतून त्याच्यारुपाने लोकांपर्यंत गेला तेव्हा हा सन्मान आपल्याला मिळाला आहे.

लोकांचं उदंड प्रेम आणि पुरस्कारांची रांग याने नाना भारावून गेले. अवार्ड स्वीकारताना वाघासारखा नाना ढसढसा रडला होता. नानाला पुरस्काराची भूक नव्हती पण त्यांची पत्नी निलकंठी यांना कायम नानाला अवार्ड स्वीकारताना बघायचं होत.

पण जेव्हा नानाला हा पुरस्कार मिळाला तेव्हा नाना आपल्या एका मुलाला हरवून बसले होते , पत्नीपासून वेगळे झाले होते अवार्ड स्वीकारताना या आठवणींचा नानाचा बंध फुटला आणि नाना मंचावरच रडू लागले.

इथून नानाने मागे वळून पाहिलंच नाही . त्यानंतर नानाची वाटचाल आपण पाहतच आहोत. क्रांतिवीर मधला त्यांचा सीन विचार करायला लावतो. त्यांचा अभिनय अजूनही मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.