राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण आईसाठी नानाने तसली भूमिका परत कधीच केली नाही

आपला मुलगा सिनेक्षेत्रात भरीव कामगिरी करुन राष्ट्रीय पुरस्कारावर स्वतःचं नाव कोरतोय, हे पाहुन कोणाही आई-वडिलांना आनंद आणि अभिमान वाटणं साहजिक आहे. उत्तमोत्तम भुमिकांनी भारतीय सिनेसृष्टीत स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण करणा-या नाना पाटेकरांच्या बाबतीत मात्र असं झालं नाही.

जेव्हा ‘परिंदा’ सिनेमासाठी नानांना राष्ट्रीय पुरस्कारासारखा बहुमान प्राप्त झाला, तेव्हा नानांची आई मात्र त्यांच्यावर भयंकर रागावली होती. 

विधु विनोद चोप्रा यांचा ‘परिंदा’ १९८९ साली प्रदर्शित झाला. अनिल कपुर, जॅकी श्राॅफ, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत असे एक से बडकर एक कलाकार सिनेमात होते. ५ नोव्हेंबर १९८९ ला सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान चालला. ‘तुमसे मिलके’ हे रोमँटीक गाणं, गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेली सिनेमाची कथा अशा अनेक गोष्टींमुळे ‘परिंदा’ ची लोकप्रियता वा-यासारखी पसरत होती.

या सगळ्या गोष्टीत आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे नानांनी सिनेमात साकारलेली ‘अण्णा’ हि भुमिका. 

खुनशी प्रवृत्तीचा, कधी काय करेल याचा भरवसा नाही, आगीला घाबरणारा असा ‘अण्णा’ नानांनी प्रभावी साकारला. अण्णाचा घाबरुन डोक्याला हात मारण्याचा प्रसंग असो वा खुनाचं नियोजन करण्याचा प्रसंग असो, नानांनी दमदार अभिनयाने संपुर्ण सिनेमात अण्णाची वेगळी दहशत निर्माण केली.

याचा परिणाम असा की १९९० च्या फिल्मफेयर तसेच राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये नानांनी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. 

‘परिंदा’ साठी नानांवर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव सुरु होता. पण या कौतुकात आईच्या कौतुकाची थाप मात्र नानांना मिळाली नव्हती. याचं कारण असं होतं की, नानांच्या आईने जेव्हा ‘परिंदा’ पाहिला तेव्हा नानांनी रंगवलेला ‘अण्णा’ तिला आवडला नाही. सतत लोकांना मारत सुटणारा, विकृत वागणारा नानांचा अण्णा तिच्या मनाला पटलाच नाही. 

जेव्हा ‘परिंदा’ साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा आई नानाला म्हणाली,

‘कोण आहेत हि मुर्ख माणसं. जी असं काहीतरी विचित्र केल्यावर पुरस्कार देतात. किती वाईट दाखवता तुम्ही.’

त्याच वेळी असे रोल पुन्हा करणार नाही, हा शब्द आईने नानांकडुन घेतला. एरवी एखाद्या कलाकाराने आईला समजावलं असतं. परंतु नाना हे नानाच. नानांनी आईला दिलेला शब्द पुढच्या कारकीर्दीत पाळला. नानांनी ‘वेलकम’, ‘अपहरण’ यांसारख्या सिनेमात खलनायक साकारले. पण ‘परिंदा’मधल्या अण्णा सारखा खुनशी आणि विकृत खलनायक त्यांनी पुन्हा साकारला नाही. 

नानांचं आईसोबत फार जिव्हाळ्याचं नातं होतं. नाना इतके देवभोळे नाहीत. परंतु मी जीवंत असेपर्यंत गणेशोत्सव साजरा करु, असं आईने सांगीतल्याने नाना दरवर्षी मुंबईतील माहिमच्या घरी गणपती आणतात. नानांची आई घरी येणा-या माणसांची, नानाच्या मित्रांची तंतोतंत नक्कल करायची. त्यामुळे स्वतःच्या अभिनयावर आईचा खुप प्रभाव आहे, असं नानांचं मत आहे.

गेल्या वर्षी जानेवारीत नानांच्या आईचं वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झालं. आईला दिलेला एखादा छोटासा शब्द आयुष्यभर कसा पाळावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नानांनी केलेली हि कृती. ‘परिंदा’ नंतर हिंदी तसेच साऊथ इंडस्ट्रीतून नानांना खुनशी भुमिकांच्या अनेक ऑफर आल्या, परंतु नानांनी त्या नाकारल्या. 

नाना पाटेकर यांनी खलनायकी भूमिका केल्या मात्र माफीचा साक्षीदार, परिंदा या सिनेमात साकारला आहे तसा विकृत खुनी परत कधीच साकारला नाही.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.