आर्मी मध्ये जाण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न नानांनी ‘प्रहार’ बनवून पूर्ण केलं
राकट दिसत असलेला हा माणूस बोलायला लागला की ऐकतंच राहावंसं वाटतं. हिंदी इंडस्ट्री गाजवलेल्या या व्यक्तीजवळ मराठी शब्दांचं मौल्यवान भांडार आहे. कोणते शब्द कुठे पेरावेत याची उत्तम जाण त्यांना आहे. आणि अभिनय.. भूमिका छोटी असो वा मोठी. त्यांची भूमिका संपल्यावर सुद्धा लक्षात राहते. सिनेमा पाहताना २ तास त्यांचा अभिनय पाहणं हा एक आगळावेगळा सोहळा असतो.
हा असामान्य कलाकार म्हणजे नाना पाटेकर. आज नानांचा वाढदिवस.
नानांच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारचं गूढ वलय आहे. त्यामुळे नाना जेव्हा मुलाखत देतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांचं मन ते मोकळं करतात. एखादा प्रश्न त्यांना वेगळा वाटला, किंवा त्यावर काय मत द्यायचं हे त्यांना ठाउक नसेल तर ते प्रांजळपणे ‘मला माहित नाही’ सांगून मोकळे होतात. कसं बोलावं आणि काय बोलावं या गोष्टीचं क्षणोक्षणी त्यांना भान असतं. एक कलाकार म्हणून नाना किती ग्रेट आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही.
परंतु नानांनी उराशी एक स्वप्न बाळगलं होतं, ते म्हणजे भारतीय सैन्यात जायचं.
हा किस्सा तेव्हाचा जेव्हा नाना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेत होते. नानांना लहानपणापासून आर्मी मध्ये जायचं होतं. एकदा त्यांना कळलं की गेटवे ऑफ इंडिया येथे आर्मी साठी भरती सुरू आहे. स्वप्न सत्यात उतरणार यासाठी कोणालाही न विचारता नाना आर्मी सीलेक्शन साठी गेले.
मराठीत आपण जसं हाडाची काडं म्हणतो अगदी तसंच नानांच्या बाबतीत लागू होतं. नाना एकदम किडमिडे आणि बारीक होते.
गेटवे ऑफ इंडिया जवळ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे आर्मी साठी निवड प्रक्रिया सुरू होती. नानांना बोलावण्यात आलं. नाना त्या वेळी जे जे मध्ये होते. परंतु ते शिक्षण आर्मीच्या भरतीसाठी ग्राह्य धरलं जात नव्हतं. निवड प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी नानांना स्पष्टपणे सांगितलं,
‘आर्मी साठी तुमचं शिक्षण पुरेसं नाही. तुम्हाला शिपाई म्हणून जॉईन व्हावं लागेल.’
शिपाई असलं तरी काय झालं, आपल्याला आर्मी मध्ये जायला मिळेल या भावनेने नानांना आनंद झाला. इतका मोठा निर्णय घेण्यासाठी कुटुंबाची परवानगी घेणं आवश्यक होतं. नाना घरी आले. त्यांनी आई – बाबांना याविषयी सांगितलं. आई – बाबांनी नानाला ठाम नकार दिला. नानांनी समजवायचा प्रयत्न केला असावा.
परंतु आई – बाबांच्या इच्छे विरुद्ध आर्मी मध्ये जाण्याचा निर्णय नानांनी रद्द केला. स्वप्नं अधुरं राहिलं..
स्वप्न पूर्ण करता आलं नाही, तरी नानांच्या मनातून भारतीय सैन्याविषयीचं वेड कमी झालं नव्हतं. पुढेअभिनेता म्हणून नानांनी सिनेसृष्टी गाजवली. १९९१ साल. नानांनी उत्तमोत्तम सिनेमे करून एक अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. अभिनयाची कारकीर्द यशस्वी असताना नाना पाटेकर दिग्दर्शनाकडे वळले. पहिला सिनेमा दिग्दर्शित करताना त्यांनी इंडीयन आर्मी ची पार्श्र्वभूमी असलेला विषय निवडला.
सिनेमाचं नाव प्रहार.
नाना पाटेकर आणि सिनेमातील इतर कलाकारांनी प्रहार साठी विशेष कमांडो कोर्स पूर्ण केला. नानां सकट सर्वांसाठी हा कमांडो कोर्स पूर्ण करणं म्हणजे एक मोठं आव्हान होतं. परंतु सर्वांनी या आव्हानाचा सामना केला. त्या काळात नाना तसे बारीकच होते. परंतु व्यक्तिमत्व संपूर्णपणे सैनिकी दिसावं म्हणून नानांनी स्वत:च्या शरीरावर सुद्धा विशेष मेहनत घेतली.
प्रहार सिनेमा पूर्ण करून त्यांनी स्वतःचं आर्मीत जाण्याचं स्वप्न जणू काही पूर्ण केलं.
‘प्रहार’ सिनेमाचं बॅकग्राऊंड भारतीय सैन्याचं असलं तरी हा काही युद्धपट नाही. या सिनेमातून नानांनी जवानांच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न केला आहे. प्रहार लोकांच्या इतका लक्षात नाही. परंतु नाना पाटेकर यांच्या कारकिर्दी मधलं एक अनोखं काम पाहण्यासाठी प्रहार नक्की पाहावा.
नाना पाटेकर वारंवार म्हणत असतात की .
“खरे हिरो ते आहेत जे सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत.”
इतकंच नाही तर त्यांचे आर्मी विषयीचे प्रेम पाहून भारतीय सेनादलाने ऑनररी कॅप्टन बनवलं होत. जेव्हा कारगिल युद्ध सुरु झालं तेव्हा आपले पद नामधारी न ठेवता स्वतः नाना कारगिल युद्धभूमीवर गेला आणि तिथल्या जवानांसोबत युद्धात देखील उतरला.
आयुष्यात पैसा, प्रसिद्धी, यश असं सर्व काही मिळवून सुद्धा भारतीय सैन्यासाठी मनात अपार आदरअसलेला नाना पाटेकर सारखा कलावंत म्हणून ग्रेट आहे.
हे ही वाच भिडू.
- जोशी-अभ्यंकर केसमधील आरोपीला भेटण्यासाठी नाना पाटेकर तुरूंगात गेले तेव्हा काय घडलं?
- त्याक्षणाला नानामधल्या दगडाला पाझर फुटून बाप जागा झाला..
- सगळे देशप्रेमाबद्दल गप्पा मारत होते तेव्हा नाना कारगिलच्या युद्धात जवानांसोबत उभा होता.
- एकटे शरद पोंक्षेच नाहीत तर नाना पाटेकरांनी देखील नथुराम गोडसेची भूमिका केली आहे