नाना पाटेकर आणि अशोक सराफ : ही दोस्ती तुटायची नाय!!

महाराष्ट्रात असा माणूस शोधून सापडणार नाही कि ज्याला अशोक सराफ माहित नाहीत. आजही मोदी जरी इस्राईलला  गेले तरी watss app वर धनंजय माने याचं डायबेटिसचं औषध मोदी घेऊन येतील वैगेरे विनोद फिरू लागतात. इतकी लोकप्रियता महाराष्ट्रात अशोक सराफांची आहे. रुपेरी पडद्यावर पांडू हवालदार पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अजूनही चालूच आहे.

आज घडीला पन्नास वर्षे या सिनेसृष्टीत त्यांना पूर्ण झाली आहेत तरीही त्यांचा नवीन सिनेमा आला की आकर्षणाचा केंद्र बिंदू तेच असतात. लोकं प्रेमापोटी त्यांना मामा म्हणु लागली अणि अल्पावधीतच ते महाराष्ट्राचे मामा झाले. आज अशोक मामा म्हंटलं की लोकांना लगेच कळतंय कोणा बद्दल बोलतोय.

असे हे अशोक मामा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये यारोंके यार म्हणून प्रसिद्ध आहेत. अशोक सराफ अणि लक्ष्या अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर या फेमस जोड्यांचे त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. पण आज आम्ही सांगतोय तो  किस्सा आहे अशोक सराफ अणि नाना पाटेकर यांच्या मैत्रीचा.

नाना पाटेकर पुण्यात नाटकात काम शोधत होते. तो संघर्षाचा काळ होता नाना पण चिवट होते. नाना तेव्हा रस्त्यावर पांढरे पट्टे ओढण्याचे काम करत. त्याचे त्यांना फार कमी पैसे मिळत पण समोर कोणताही पर्याय नव्हता पोट भरण्यासाठी काम केल्या शिवाय गत्यंतर नव्हते.

हळू हळू मग नाटकात काम मिळू लागले अणि संघर्ष कमी होत गेला. अश्याच एका नाटका दरम्यान अशोक सराफ अणि नानाची मैत्री झाली. अल्पावधीतच ते जिवलग मित्र बनले. अशोक सराफ तेव्हा नाटकात प्रमुख भूमिका करत. असाच एक नाटक होतं “हमीदाबाईची कोठी “ त्यात अशोक सराफ आणि नाना दोघेही होते. अशोक सराफांना तेव्हा नाटकाचे २५० रुपये मिळत तर नानाला फक्त ५० रुपये मिळायचे.

मित्र असल्याने नानाची परिस्थिती अशोक मामाला माहिती होती. नाटक झाल्यावर किंवा सुरू होण्यापूर्वी ही मंडळी पत्ते खेळायची. त्यात अशोक मामा नानाबरोबर मुद्दाम हरायचे अणि नानाला दहा वीस रुपये मिळायचे. नानाला हे कळायचं बरं, पण पैश्याची गरज असल्याने तो ही ते घ्यायचा. 

या मैत्रीत आणखी एक गमतीशीर गोष्ट होती. अशोक मामा कुठेही निवांत बसलेले असले की नाना लगेच त्यांचे पाय चेपत असत. नंतर डोक्याला तेल लावून मालीश करून देत. मालीश झाल्यावर मामा नानाला पाच रुपये देत. नानाही ते आनंदने घेत. आजही एवढा मोठा नट झाल्यावरही नाना अशोक मामाला ‘ चंपी ‘ मालीश करून देतात आजही मामा दहा रुपये काढून देतात अणि म्हणतात

“नान्या ठेव महागाई वाढली आहे बाबा.”

किती सहजता आहे ह्यांच्या नात्यात. मागे एक भिडू मला बोलला भावा नातं ऑरगॅनिक असलं पाहिजे बहुतेक त्याला असं काहीतरी सांगायचे होते. तर हे नाते असेच पुढे जात राहिले. नाना पाटेकरंचं गणेश प्रेम जगजाहीर आहे. आजही त्यांच्या घरच्या गणपतीला अनेक मोठ मोठी लोकं दर्शनासाठी जातात.

नानाला एकदा गणपती मंडळासाठी तीन हजार पैसे कमी पडत होते. नानाने चाचरत चाचरत ही परिस्थिती अशोक मामाला सांगितली. मामाने जास्ती काही विचारले नाहीत. सकाळीच कामावर जाता जाता नानाला एक कोरा चेक दिला अणि बॅंकेत पंधरा हजार आहेत तुला लागतील तेवढे काढ. नानाने तीन हजार काढले.

काही दिवसांनी नानाने तीन हजार रुपये जमा करून अशोक मामला द्यायला गेला. तेव्हा मामा म्हणाले,

“काय पाटेकर पैसे लय झाले वाटतं ?ठेव ते पैसे परत द्यायची काही गरज नाही !”

त्यावर स्वाभिमानी नानानी सांगितलं,मलाही पैसे परत करायची सवय लागू दे रे. तेवढ्यासाठी ठेव पैसे. मग मात्र नानाचा स्वाभिमानाने प्रभावित झालेल्या अशोक मामाने ते पैसे घेतले. 

असे म्हंटले जाते की जोडून ठेवलेले माणूस आयुष्यात कधी ना कधी कामाला येतोच. मामानी नानाला जीव लावला होता ही मैत्री खूपच घट्ट होती किंबहुना आहे. मामानी अजाणतेपणी जोडलेला ह्या मित्राने एकदा त्यांचा जिव वाचवला.

हो नाना पाटेकरांनी अशोक मामांचा जीव वाचवला !

त्याचं झाला असं की हमीदा बाईची कोठी ह्या नाटकाचा प्रयोग एका ठिकाणी चालू होता. त्याठिकाणी स्टेज खूपच खाली होते त्यामुळे मागच्या लोकांना नाटक दिसेना. त्यात सर्व नाटक बसुन करण्याचं होता. पाचच मिनिटात लोकांनी आरडा ओरडा करायला सुरवात केली. नाटकाचा पडदा पडला. लोकांनी खुर्च्यां मोडल्या, ट्यूब लाईट्स फोडल्या, स्टेज चा पडदा फाडला. पब्लिकने अशोक मामाच्या गाडीच्या काचा ही फोडल्या. नाना ही त्या नाटकात होता लोकं आत्ता स्टेज कडे येऊ लागली.

लोकां हिंसक झाली होती. नानाच्या लक्षात आले की लोकांचं टार्गेट अशोक सराफ आहेत. इतक्या संतप्त लोकांच्या हातात जर अशोक सापडला तर त्याचं नक्कीच काहीतरी बर वाईट होईल.

नानाने लगेच अशोक मामाचा हात पकडला अणि चल म्हणुन स्टेज चा मागून दोघेही पळत सुटले. चिखलातून, भिंतीवरून उडी मारून नानाने अशोक मामला कसं बसं मेन रस्त्यावर आणलं. एक सायकल रिक्षा नानाने थांबवली ती स्वतः चालवत अशोक मामाला नानाने तिथून दूर एका गेस्ट हाऊसवर नेले एका खोलीत अशोक मामला घातले अणि बाहेरून कडी लावली. नाना परत बाकीच्या लोकांना आणण्यास परत गेले.

अशोक मामा आजही हा किस्सा अनेक मुलाखतीत आवर्जून सांगतात. आपल्या मित्रावर असल्याने प्रेम तर त्यातून दिसतेच पण एक उपकृत भाव ही त्यांच्या चेहर्‍यावर असतो. तर भिडूनों लय पोरींच्या मागे लागु नका मित्र जोडा शेवटपर्यंत तेच साथ देतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.