सिनेमा काय रिलीज झाला नाही पण नाना पाटेकर जेजुरीत महिनाभर टांगा चालवत होते….

नाना पाटेकर बॉलिवूडमध्ये जरी गेले तरी त्यांचा मराठमोळेपणा गेलेला नाही. मराठीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवून बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाचा आणि ऍक्शनचा जलवा त्यांनी दाखवून दिला. सुरवातीला नाटकांमधून कामं करून आणि नंतर मराठीत स्थिरावर नाना थेट बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करून आले. पण मराठीमध्ये काम करत असताना नाना पाटेकरांचा हा किस्सा सांगणं गरजेचं आहे.

डॉ.वि.भा. देशपांडे यांनी नाट्यमित्रमध्ये हा किस्सा सांगितलाय. हा तो काळ होता जेव्हा नाना पाटेकर नाटकांमधून प्रसिद्ध होत होते. पुरुष हे नाटक त्यांचं तुफ्फान सुरू होतं. या नाटकाचे मराठी नंतर हिंदीतही बरेच प्रयोग झाले त्यामुळे नानाची हिंदी फॅन फॉलोईंग वाढली.

नाटकाला हिंदी लोकांची गर्दी होऊ लागली ती फक्त नाना पाटेकर यांना बघण्यासाठी, नाटकासाठी नव्हे. फक्त कलाकाराला बघण्यासाठी येणारा प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेऊ शकत नाही हे नानाला माहिती होतं, तेव्हा ते नाटक सुरु होण्यापूर्वी प्रेक्षकांना सांगायचे कि,

जे मला पाहायला आले आहेत त्यांनी मला पाहा आणि जा. ज्यांना नाटक पाहायचं असेल फक्त तेच लोकं थांबा.

हळूहळू नाना भरपूर प्रसिद्ध झाले. हिंदीत त्यांची मागणी वाढू लागली. अशा वेळी नाना चित्रपटात आले ते गड जेजुरी या चित्रपटाच्या निमित्ताने. राम कदम यांनी तो सिनेमा बनवला होता. तो पुढे प्रदर्शित झालाच नाही आणि त्यामुळे तो कुणालाही माहितीच झाला नाही. या सिनेमाचं शूटिंग झालं होतं थेट जेजुरीला. या सिनेमात नाना पाटेकरांची भूमिका हि टांगेवाल्याची होती.

आता या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी, त्यातील बारकावे योग्य प्रकारे व्यक्त व्हावे म्हणून नाना रोज टांगा चालवण्याचा सराव करण्यासाठी जायचे. त्यांनी तिथे एक टांगा सरावासाठी बुक करून ठेवलेला होता.

गावामधून बसस्टँड, रेल्वे स्टेशन, देवीच्या देवळापाशी वैगरे अशा ठिकाणी कोणाला जायचं असेल तर नाना सहजने प्रवाशांची ने-आण करायचे. अगदी टिपिकल टांगेवाल्याचा वेष नानाचा असायचा त्यामुळे एकही प्रवासी त्यांना ओळखू शकला नाही.

प्रवाशांची ने-आण करणारे नाना पैसे मात्र चोख घ्यायचे. दिग्दर्शक वैगरे हि मंडळी नाना पाटेकरांचं टांगा चालवण्याचं कसब बघून त्यांची गंमत करायचे. पण नाना पाटेकर या भूमिकेत पूर्णपणे रंगून गेले होते. प्रॉपर टांगेवाल्या लोकांप्रमाणे त्यांचच राहणं खाणं झालं होतं. डेली रुटीन आणि त्याप्रमाणे वागणे असं शेड्युल नाना पाटेकरांचं होतं.

पुढे दुर्दैवाने हा सिनेमा रिलीज झाला नाही. पण नाना पाटेकर महिनाभर जेजुरीत टांगा हाकत होते. नाटकांमधून हळूहळू चित्रपटाकडे वळलेले नाना पाटेकर हिंदीतही आपली कमाल दाखवू लागले. गड जेजुरी सिनेमा रिलीज झाला नाही पण पुढचा सिनेमा नानाला मराठीतला स्टार बनवून गेला तो सिनेमा होता माफीचा साक्षीदार. या सिनेमातला जक्कल सुतार नानाने काळजात धडकी भरेल असा रंगवला होता. 

पण गड जेजुरी या सिनेमासाठी नाना पाटेकरांनी टांगेवाल्याची केलेली तालीम मात्र वाखाणण्याजोगी होती. महिनाभर जेजुरीत नाना टांगा चालवत होते हे तेव्हा कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.