नाना पटोले काँग्रेसला नक्की फायद्यात घेऊन जात आहेत कि अडचणीत?

नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्विकारल्यापासून त्यांच्या आक्रमक वक्तव्यांची बातमी झालेली नाही असा दिवस क्वचितच उजाडला असेल. अशाच काही आक्रमक वक्तव्यांमुळे  मागच्या २ दिवसांमध्ये नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

काल नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

यात ते म्हणाले, 

मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना सांगितलं आहे की, कामाला लागा वगैरे परंतु मी बोललो तर त्रास होता आणि ते बोलले तर ठीक आहे? मी स्वबळाचा नारा दिला आहे त्यावरुन माघार घेणार नाही. यामुळे आपण आपल्या कामाला लागा.

सोबतच अजित पवार यांच्यावर देखील पटोले यांनी आरोप केले आहेत. अजित पवार सध्या पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि ते केवळ राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची काम करतात. काँग्रेसला प्रत्येक वेळी संपर्कमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहीसाठी लक्ष घालावं लागत आहे. 

सोबतच देवेंद्र फडणवीस सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप करणाऱ्या नाना पटोले यांनी काल आपल्याच सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप केले. ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना माहिती देण्यासाठी माझा फोन टॅपिंग करण्यात येत आहे, एक प्रकारे माझ्यावर पाळत ठेवली जात आहे.

एकूणच सातत्यानं भाजपवर तुटून पडणारे पटोले आता आपल्याच सरकारवर तुटून पडलेले बघायला मिळतं आहे. सोबतच नाना पटोले हे स्वबळाच्या आक्रमक नाऱ्यावर देखील ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती तयार झाल्याचं पहायला मिळतं आहे.

या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोलेंची लहान माणूस म्हणतं खिल्ली उडवली आहे.

याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियामधून काँग्रेस पक्षामुळे महाविकास आघाडीचं सरकार २०२२ चा सूर्योदय बघणार नसल्याचा चर्चा चालू झाल्या आहेत. आता या चर्चा किती खऱ्या किती खोट्या हे येणार काळच सांगेल. पण त्या सोबतच काँग्रेसला मिळालेली सत्ता योग्य पद्धतीने टिकवावी असा सल्ला देखील पटोले यांना सोशल मीडियांमधून दिला जात आहे.

त्यामुळेच नाना पटोले यांची आक्रमक भूमिका काँग्रेस पक्षाला नक्की पुढे घेऊन जात आहे कि अडचणीत आणत आहे हे बघावं लागत..

वास्तविक नाना पटोले यांचा स्वभाव आपण बघितला तर तो मुळात आक्रमक आहे. याच आक्रमकतेमधून त्यांनी भाजपच्या खासदारकीचा मुदतीपूर्वी राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

यापूर्वी बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होते. थोरातांच व्यक्तिमत्त्व हे फार मवाळ होतं, त्या तुलनेत नानांचं व्यक्तिमत्त्व अधिक आक्रमक असल्याचं काँग्रेसजनही मान्य करतात. सोबतच ते मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांना उघड भूमिका घेता येत नव्हती. त्यामुळे पक्षाला त्यांच्या भूमिकेचा फायदा होईल असा अंदाज वर्तवण्यात आला.

नाना पटोले यांनी पहिली भूमिका घेतली ती म्हणजे ‘स्वबळाची’

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले हे अधिक आक्रमक होतं गेले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाऊन त्यांनी आंदोलन, आक्रमक भाषण सुरु केली. सोबतच त्यांनी स्वबळाची भाषा करत काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणूका लढवणार असल्याचं जाहीर देखील केलं.

त्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही’ असा इशारा देणारं वक्तव्य केलं. त्यावर बराच वादंग झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर देखील ते सातत्यानं स्वबळाची भाषा करतं होते. सोबतच किमान समान कार्यक्रम एवढाच आमचा सत्तेतला उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

नाना पटोले यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते मात्र चांगलेच बुचकळ्यात पडल्याचं बघायला मिळालं होतं. कारण एका बाजूला त्यावेळी शरद पवार यांच्यासह शिवसेना महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत भाष्य करत होते, तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूला नाना पटोले मात्र स्वबळाची भूमिका घेत होते.

अखेरीस पाटोलेंच्या या वक्तव्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली होती. केंद्रीय तपास यंत्रणांकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असताना तिन्ही पक्षांनी एकत्र असण्यापेक्षा काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याचं सांगण्यात आलं.

त्यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिना दिवशी पाटोलेंच्या स्वबळाच्या भूमिकेवर टिका देखील केली. 

मात्र त्यानंतर देखील त्यांनी काँग्रेसच्या स्वबळाचा नारा कायम ठेवला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे काँग्रेसचे मंत्री आणि स्वतः काँग्रेस चांगलीच अडचणीत आली असल्याचं बघायला मिळालं.

नाना पटोले यांची दिल्लीत तक्रार… 

यानंतर नाना पटोले यांची दिल्ली दरबारी तक्रार करण्यात आली असल्याची बातमी आली. त्यांच्या भूमिकेमुळे राज्यात काँग्रेस पक्ष अडचणीत येतं असून महाविकास आघाडीमध्ये देखील समन्वय राहत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि काही आमदारांनी दिल्लीत केली असल्याचं सांगण्यात आलं.

निवडणुकीला आणखी वेळ असल्यामुळे आत्ताच स्वबळाची भाषा योग्य नसल्याचं मत काही नेते आणि आमदार खाजगीत व्यक्त करत होते. यातूनच २४ जून रोजी उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडून पटोले दिल्लीला गेले होते. यात त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचं माध्यमांकडून सांगितलं गेलं.

आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधी भूमिका…

नाना पटोले हे स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र त्यांनी सरकारवर टिका करताना आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधातील भूमिका घेतली होती. यात नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत हा वाद चांगलाच गाजला होता. तो अगदी दिल्ली दरबारी गेला होता. सोबतच विजय वडेट्टीवार यांच्या विरोधातील भूमिका देखील त्यांनी घेतली होती.

१. नितीन राऊत यांच्यावर आरोप आणि विरोधी भूमिका : 

नाना पटोले यांनी खनिकर्म मंडळातील कोल वॉशरीच्या निविदेत गैरव्यवहाराचा आरोप केला होता. मात्र त्यांनी हा आरोप करून अप्रत्यक्षपणे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाच टार्गेट केले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. उद्योगमंत्र्यांनी याची तातडीने विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणाही केली होती.

सोबतच वीज बिलात सवलत देण्याची मागणी करून देखील पटोले यांनी राऊत यांच्या विरोधी भूमिका घेतली होती. वास्तविक त्यावेळी नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. अध्यक्ष या नात्यानं त्यांनी नितीन राऊत यांना बिलात सरकारने सवलत द्यावी असे आदेश दिले होते.

२. MPSC परिक्षा रद्द करण्यास विरोध :

मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला होता. संपूर्ण राज्यातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षासोबतच सत्तेतील काँग्रेसने देखील विरोध केला होता. नाना पटोले यांनी परीक्षा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी केली होती. मात्र वास्तविक ही परीक्षा काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याच खात्याच्या पत्रावरून पुढे ढकलण्यात आली होती.

नाना पटोलेंच्या आक्रमक भूमिका काँग्रेस पक्षासाठी फायद्याची ठरत आहे का?

नाना पटोले यांच्या आक्रमतेविषयी यापूर्वी ‘बोल भिडू’शी बोलताना जेष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार म्हणाले होते की, 

नाना पाटोले पक्षाचे राज्यातील अध्यक्ष आहेत. त्यांना आपला पक्ष चालवायचा आहे, किंबहुन वाढवायचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर काही तरी ठाम भुमीका पक्ष म्हणून ठेवणं त्यांना गरजेचं आहे.

यातूनच ते आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे तीन पक्षांच्या सरकारमध्ये असलो तरी आपलं स्वतंत्र अस्तित्व त्यातून कार्यकर्त्यांसमोर दिसून येतं.

तर सध्याच्या परिस्थितीमध्ये अशी आक्रमक भूमिका पक्षासाठी अडचणीची ठरत आहे का?

याबाबत जेष्ठ राजकीय विश्लेषक अशोक चौसाळकर ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

काँग्रेस पक्षासाठी पटोलेंची भूमिका अडचणीची ठरत आहे असं वाटत नाही. कारण सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासह सर्व महत्वाची खाती ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. सोबतच आता विधानसभेच्या अध्यक्ष पदावरून देखील राजकारण सुरु आहे. त्यामुळे नाना पटोले यांची आक्रमकता हे एक प्रकारे सरकारवर दबाव तंत्राचा भाग आहे.

यातून झाला तर काँग्रेस पक्षाला फायदाचं होईल. सोबतच तीन पक्षांचं सरकार असले तरी आम्ही तुम्ही म्हणालं ते सगळं ऐकणार नाही असा देखील संदेश पटोले यांना द्यायचा आहे. नाना पटोले यांच्यामुळे सरकार पडेल अशी देखील शक्यता चौसाळकर यांनी फेटाळून लावली आहे. हे अधिकार केवळ दिल्ली दरबारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

नाना पटोले यांच्या आक्रमकतेमुळे सध्या तरी काँग्रेस पक्ष अडचणीत येत नसल्याचं चौसाळकर यांचं मत आहे. मात्र आता येत्या काळात नाना पटोले यांच्या या आक्रमकतेचा काँग्रेसला नेमका काय फायदा होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे…

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.