नाना पटोले म्हणजे काँग्रेसचे संजय राऊत?

प्रत्येक बंडखोर आमदाराने शिवसेनेच्या फुटीसाठी संजय राऊतांना जबाबदार धरलं. हे आरोप इतके वाढले की संजय राऊत हे एक व्यक्ती न राहता ती एक टर्मच होवून गेली. कोणामुळे पक्ष फुटू लागला तर त्या व्यक्तीला त्या पक्षाचं संजय राऊत म्हणायचं. आत्ता हेच विशेषण नाना पटोलेंच्या मागं लागण्याची शक्यता वर्तवली जातेय, आणि त्याला कारण ठरतय काँग्रेसच्या फुटीच्या संभाव्य चर्चा…

आत्ता या चर्चा कोण घडवून आणतय तर भाजपचेच नेते. पण झालंय अस की सध्याची काँग्रेसमधली परिस्थिती बघता या चर्चांना खतपाणी घातलं जातंय. शिवाय, भविष्यात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फूट पडलीच तर, त्यासाठी नाना पटोले यांना जबाबदार धरलं जाईल असं बोललं जातंय आणि सध्या तरी परिस्थिती बघता जबाबदार ठरवण्यासारखी परिस्थितीही आहे.

आताची परिस्थिती म्हणजे काय? तर, सत्यजीत तांबे यांचं झालेलं बंड.

नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणऊन अर्ज भरला. निवडणूक झाली आणि ते निवडूनही आले. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर बंडखोरी केल्याची, पक्षाला धोका दिल्याची टीका आणि चर्चा झाली असली तरी त्यांनी मात्र या सगळ्यात मौन बाळगलं. निवडणुकीचा निकार आल्यानंतर मात्र त्यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत त्यांना पक्ष सोडून अपक्ष म्हणून अर्ज का भरावा लागला याची कारणं सांगितली. बरं, फक्त कारणं सांगितली असं नाही तर, त्यासोबत पुरावे सुद्धा दाखवले. या पत्रकार परिषदेत तांबेंनी कुठेही पटोले यांचं नाव घेऊन टीका केली नसली तर वारंवार प्रदेशाध्यक्ष कार्यालय असा उच्चार केला होता.

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा हा सुद्धा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे.

बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वात काम करायचं नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधल्या नेत्यांकडून मात्र थोरातांची बाजू समजून घेतली पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया आली.

दुसरीकडे, पटोलेंना नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार का? असं विचारल्यावर त्यांनी मात्र उत्तर देणं टाळलं आणि १५ फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली असून त्याचे निमंत्रण थोरातांना दिलं असल्याचं सांगितलं.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधूनही थोरातांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, एकंदरीत राज्यातली वातावरण निर्मिती ही पटोलेंच्या विरोधात निर्माण झालेली पाहायला मिळतेय.

फक्त विरोधातलं वातावरण या एका मुद्द्यामुळे पटोलेंना कारणीभूत धरलं जाईल का? तर, नाही. त्यामागे आणखीही कारणं आहेत… तीच कारणं बघुया.

नाना पटोले म्हणजे एक आक्रमक नेतृत्व.

भाजप सत्तेत असूनही भाजपमधून काँग्रेसमध्ये येण्याचं धाडस करणारे नेते. प्रसंगी मोदी आणि अमित शहांवर सडेतोड टीका करणारे नेते. असं असूनही काँग्रेस फुटलीच तर नाना पटोलेंनाच जबाबदार धरलं जावू शकतं यासाठी त्यांच्याच राजकीय शैलीतले काही फॅक्टर कारणीभूत ठरू शकतात. काय असतील हे फॅक्टर आणि कोणत्या गोष्टींमुळे नाना पटोलेंनाच कॉंग्रेसचे संजय राऊत ठरवलं जावू शकतं पाहूया या व्हिडीओतून……

पटोलेंच्या राजकारणाचा अडचणीत आणणारा पहिला फॅक्टर म्हणजे संजय राऊतांप्रमाणेच त्यांची वक्तव्य…

नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात असणारं कमालीचं साम्य म्हणजे दोन्ही नेत्यांची वक्तव्य करण्याची शैली. आगापिछा न पाहता हे दोन्ही नेते विखारी टिका करतात. पण यामुळे जोडून घेण्याऐवजी फाटतच जास्त जातं. कस हे नेमकं पाहण्यासाठी नाना पटोलेंची काही वक्तव्य आपण पाहूया. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल…

१० मे २०२१ :

“संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही त्यांचा सामना आम्ही वाचत नाही…”

३ जून २०२१:

“हे सरकार चालवायची राष्ट्रवादीची इच्छा नसेल तर आम्ही त्यांना बांधून ठेवलेलं नाही.”

३० जून २०२१:

“आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. हे वक्तव्य सहाजिकच शिवसेनेला उद्देशून केलं होतं.”

२८ जानेवारी २०२२:

“राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये येणाऱ्या नेत्यांची नावं उघड केली तर ते सावध होतील, राष्ट्रवादीचे नेते आम्ही फोडणार.”

११ मे २०२२:

“मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी खंजीर खुपसण्याचं काम करत आहे. शरद पवार बेभरवशी राजकारणी”

२३ जून २०२२: (म्हणजे, शिंदेंच्या बंडानंतर लगेचच त्यांनी केलेलं वक्तव्य)

“अजित पवार कॉंग्रेसच्या आमदारांनाही त्रास देत होते”

११ ऑगस्ट २०२२:

“महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही, ती एका विपरित परिस्थितीत उभी राहिलेली आघाडी आहे.”

३ नोव्हेंबर २०२२:

“शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही…”

ही सगळी वक्तव्य नाना पटोलेंनी गेल्या दीड दोन वर्षात केली आहेत. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर कधी शरद पवारांवर खंजीर खुपसल्याची टीका केली तर कशी शिवसेनेला डिवचण्याचं काम त्यांनी केलं. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी व शिवसेनेसोबत जुळवून घेण्यापेक्षा अधिक डिवचण्याचंच काम पटोलेंनी केलेलं दिसून येतं. साहजिक त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अनेक आमदारांची भूमिका घेताना कोंडी होत होती.

पण पटोलेंची अशी विधान फक्त महाविकास आघाडीत दरी निर्माण करण्यापुरतीच मर्यादित नव्हती. त्यांची अनेक विधानं ही कधी हास्यास्पद तर चिड आणणारी देखील होती..

जस की एकदा ते म्हणाले होते की, “मोदींनी चित्ते आणले चित्यांवर काळे ठिपके आहेत तसेच ठिपके लम्पी रोगात जनावरांना उठतात. मोदींच्या चित्यांमुळे भारतात लम्पी रोग आला.”

मागे एकदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कुणबी असल्याचा दावा केला होता तर भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधींची भारत जोडो यात्रा म्हणजे रामाच्या वनवासाप्रमाणे असल्याचं सांगितलं होतं. अगदी राहूल गांधींची तुलना रामाबरोबर करण्याचं धाडस देखील पटोलेंनी केलं… अर्थात अशा TRP मिळवून देणाऱ्या वाक्यांमुळे पटोले बातम्यांमध्ये राहिले पण त्याचवेळी त्यांनी सोबतची लोकं तोडण्याचं काम जास्त केलं…

नाना पटोलेंच्या राजकारणाचा दूसरा अडचणीत आणणारा फॅक्टर म्हणजे विसंवाद..

शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंनी संवाद साधला नाही आणि मधल्या लोकांनी तो होवू दिला नाही या कारणातून. असंच काहीसं पटोले यांच्या बाबतीत देखील लागू होतं. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंची पहिली जबाबदारी राहते ती पक्षाला, पक्षातील गटातटांना एकसंध बांधून ठेवणं. पण इथं नाना पटोले अयशस्वी ठरताना दिसतात.

अशोक चव्हाण एका बाजूला, बाळासाहेब थोरात दूसऱ्या बाजूला, पृथ्वीराज चव्हाण तिसऱ्या बाजूला, विजय वडट्टीवार चौथ्या बाजूला, संग्राम थोपटे पाचव्या बाजूला, यशोमती ठाकूर सहाव्या बाजूला, सुनिल केदार सातव्या बाजूला, बंटी पाटील आठव्या बाजूला, विश्वजीत कदम नवव्या बाजूला… अगदी नव्यापासून ते जेष्ठांपर्यन्त वेगवेगळ्या दिशेने असणाऱ्या नेत्यांना एकत्र बांधण्यात नाना पटोले अयशस्वी झालेलेच दिसून येतात..

एकतर कॉंग्रेसच्या या नेत्यांचा आपआपसात समन्वय नाही, एकत्रित असा कृती कार्यक्रम नाही की एकत्रितपणे संवाद साधला जात नाही. अशा वेळी निर्माण झालेला आईस ब्रेक करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंची असते.

आजवर प्रदेशाध्यक्ष म्हणजे एखाद्या नेत्याला ताकद देणं, योग्य नेतृत्व हेरणं ते समोर आणणं आणि सत्तेत असो की विरोधात एखादा कृतीकार्यक्रम घेवून सर्व नेत्यांना घेवून रस्त्यावर उतरताना दिसतो.

आत्ता अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अथवा बाळासाहेब थोरात अशा जेष्ठांना ऑर्डर देणं हे नाना पटोलेंना जड जात असलं तरी नव्या नेत्यांची टिम बांधण्यात आणि संवाद साधण्यात देखील ते यशस्वी ठरताना दिसताय. उद्धव ठाकरे व पक्षाचे आमदार यांच्यामध्ये जो आरोप संजय राऊतांवर करण्यात आला त्याच लाईनवर काँग्रेस हायकमांडला अर्थात राहूल गांधी व सोनिया गांधी यांना पक्षाच्या इतर आमदारांकडून सहन करावा लागतो.

आत्ता बघुया पटोलेंच्या राजकारणाचा अडचणीत आणणारा तिसरा आणि शेवटचा फॅक्टर. त्यांची तडकाफडकी भूमिका घेण्याची कार्यपद्धत..

राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर सत्तावाटपात काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद आलं. नाना पटोलेंची या पदावर निवड देखील झाली. पण त्यांनी ४ फेब्रुवारी २०२१ ला राजीनामा देत दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं. वास्तविक महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजप करत असलेली व्युव्हरचना पाहता विधानसभा अध्यक्षपद सोडणं चुकीचं असल्याचं मत महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांच होतं. त्याचं कारण देखील स्पष्ट होत कारण पटोलेंनी राजीनामा दिला तर राज्यपाल पुन्हा विधानसभा अध्यक्ष निवडीच्या निवडणूकीसाठी लवकर परवानगी देणार नाहीत अन् इतक्यात भाजप ऑपरेशन लोटस् राबवू शकते.

विधासनभा अध्यक्षांचे अधिकार पाहता या पदावरून बाजूला सरकणं म्हणजे सरकार भाजपला अनुकूल भूमिका घेण्यासारखच होतं आणि झालं देखील तसंच. शिंदेचं बंड झालं तेव्हा विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं. उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ कार्यभार पहात होते. त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव लगोलग आणण्यात आला. व हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. राजकीय विश्लेषकांच्या मते इथं विधानसभा अध्यक्ष म्हणून कोणताही नेता असता तर बऱ्याच गोष्टी साध्य करता आल्या असत्या. यासाठी भुजबळांच्या शिवसेना फुटीवेळी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष असलेल्या मधुकरराव चौधरी यानी बजावलेल्या भूमिकेचा देखील संदर्भ देण्यात येतो…

अर्थात या जर-तरच्या गोष्टी असल्या तरीही नाना पटोलेंची तडकाफडकी निर्णय घेण्याची पद्धत राहिलेली आहे आणि ही पद्धत बऱ्याचदा स्वत:सोबत पक्षाचं देखील नुकसान करताना दिसते.

दूसरं उदाहरण द्यायचं झाल्यास अनेक नेते महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सत्तेत राहून अधिकाधिक फायदा घेण्याऐवजी नाना पटोलेंनी टीका करण्यातच वेळ घालवला असल्याचं बोललं जातं विशेषत: अशी टिका कॉंग्रेसच्याच आमदारांकडून होत असते…

आत्ता हे तीन फॅक्टर पाहिल्यानंतर लक्षात येतं की उद्या चुकून काँग्रेसमध्ये बंडाचं वारं वाहू लागलंच तर त्यासाठी प्रदेशाध्यक्ष या भूमिकेतून नाना पटोलेंनवरच काँग्रेसचे आमदार आरोप करतील व त्याची कारणं देखील संजय राऊत यांच्यावर झालेल्या आरोपांच्या जवळ जाणारी असतील.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.