मुंबईला अंधारातून बाहेर काढायच सगळ्यात पहिल स्वप्न नाना शंकर शेठनी पाहिलं…

गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. नुकतच इंग्रजांनी मराठ्यांना हरवून भारतावर राज्य सुरु केलं होतं. पोर्तुगीजांकडून आंदण मिळालेलं मुंबई त्यांचं लाडक शहर. अरबी समुद्रातील सात बेटे एकत्र करून त्यांनी  हे शहर बनवलेलं. इथल्याच बंदरावरून ब्रिटिशांचा युरोपशी मोठा व्यापार चालत होता. मुंबईत रेल्वे आली होती. वेगवेगळे उद्योग उभे राहत होते.

फक्त वीस तीस वर्षात मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढली होती. पण दुर्दैव म्हणजे याच काळात मुंबईचे रुपांतर बकाल शहरात होऊ लागले होते.

याच सर्वात मोठ कारण म्हणजे मुंबईमध्ये पसरलेलं अंधाराच साम्राज्य. त्याकाळात रस्त्यावर दिव्यांची सोय नव्हती. यामुळे संध्याकाळ नंतर बाहेर पडणे देखील अवघड होऊन जाई. चोरीचे प्रमाण खूप वाढले होते. रोगराई मुळे दरवर्षी जवळपास ६००० लोक मरत होते आणि यात ब्रिटीशांचा देखील समावेश होता.

मुंबईच्या रस्त्यावर दिवे नव्हते अस नाही. पण ते होते फणसाचे.

हसू नका. हे खरं आहे. मोठमोठाले फणस रस्त्यावरच्या खांबावर अडकवलेले असायचे. त्या फणसाच्या आत खोबण करून त्यात तेलाचा दिवा लावला जार असे, हे फणसाचे दिवे लावण्याचं कंत्राट ज्याला दिलेलं असायचं तो फणसात कमी तेल टाकत असे आणि उरलेले पैसे खिशात टाकत असे. परिणामी फणस काही वेळात विझून जात असे.

काही पारसी लोकांनी आपल्या दारात गॅस लँप लावले होते. ते पाहण्यासाठी मुंबईकर तिथे गर्दी करत असत.

१८४३ साली अर्देशीर कार्शेटजीने आपल्या माझगावच्या घरात कोळशापासून गॅस बनवण्याचा छोटा प्लांट बनवलेला होता. या गॅस पासून त्याच्या घरात दिवे पेटवलेले होते. हे गॅसचे दिवे म्हणजे मुंबईमधील एक आश्चर्य मानलं जात होतं.

मुंबईची ही स्थिती होती मात्र बाकीच्या जगभरातील मोठ्या शहरामध्ये रस्त्यावर गॅसचे दिवे लागत होते. लंडनमध्ये जगातील पहिली गॅस कंपनी स्थापन झाली होती. अख्ख्या लंडनमध्ये रस्त्यावर गॅसचे दिवे पेटत होते.

हेच इंग्रज सरकार मुंबईमध्ये प्रशासन अतिशय ढिसाळ कारभार करत होते.

त्यांना मुंबईतला पैसा हवा होता मात्र तिथे सुधारणा करण्यासाठी खर्च करायची इच्छा नव्हती. त्यांनी मुंबईत रेल्वे सुरु केली होती मात्र त्यासाठी नाना शंकर शेठ यांचा पाठपुरावा हेच मोठे कारण होते.

अस म्हणतात मुंबईला अंधारातून बाहेर काढायच सगळ्यात पहिल स्वप्न नाना शंकर शेठनी पाहिलं.

नाना शंकर शेठ यांचा जन्म एका गर्भश्रीमंत दैवज्ञ ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला. त्यांनी मुंबईत रेल्वे सुरु केली, नाट्यगृहे, दवाखाने, धर्मशाळा, मंदिरे स्थापन केली. सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, जे जे हॉस्पिटल सुरु केले.

याशिवाय मुंबईच्या प्रशासनात भारतीयांना हक्क मिळावा यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले देखील.

म्हणूनच त्यांना आधुनिक मुंबईचा सम्राट असे ओळखले जाऊ लागले.  

नानांच्या प्रयत्नातूनच चिंचपोकळीमध्ये युरोपप्रमाणे मुंबईच्या रस्त्यावर गॅसचे दिवे पेटवायसाठी गॅस कंपनीची स्थापना झाली. ते साल होतं १८६२. कंपनीच नाव होतं बॉम्बे गॅस कंपनी.

ही भारतातली पहिली गॅस कंपनी होती.

याचदरम्यान जस्टीस ऑफ पिस बोर्डबद्दलच्या तक्रारी खूप वाढल्या आणि अखेर इंग्रजांनी मुंबईचा पहिला आयुक्त नेमला. त्याच नाव सर आर्थर क्रॉफर्ड. हो तोच ज्याच्यावरून क्रॉफर्ड मार्केट बनलं. या क्रॉफर्डने अनेक निर्णय घेतले ज्याने मुंबईचा नशीब पालटल. त्यानेच फणसाचे दिवे बंद करून गॅसचे दिवे सुरु करण्याचा प्रस्ताव आणला व तो पास देखील करून घेतला.

७ ऑक्टोबर १८६६ रोजी चर्चगेट रोड, भेंडी बाजार या भागात पहिल्यांदा गॅस लाईट पेटले आणि खऱ्या अर्थाने मुंबईच नशीब उजळल.

दुर्दैवाने हे पाहायला नाना शंकर शेठ हयात नव्हते. त्यांचे ३१ जुलै, इ.स. १८६५ ला निधन झाले होते. मात्र त्यांनी दाखवलेला उजेड मुंबईला प्रगतीच्या दिशेने घेऊन गेला. काही वर्षांनी इलेक्ट्रिक दिवे आले. मात्र मुंबईचे गॅसवरील दिवे साधारण १९६२ पर्यंत कार्यरत राहिले.

gas company lane 759

आजही बॉम्बे गॅस कंपनीच्या आठवणी परळ लालबागच्या जुन्या रहिवाश्यांनी जपल्या आहेत. आजही काही काही ठिकाणी या गॅसचे दिव्याचे खांब उभे असलेले दिसतात.

लालबाग मध्ये  अजूनही गॅस कंपनी लेन आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या बॉम्बे गॅस कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यात आलंय. १०० वर्षे मुंबईमध्ये गॅसचे दिवे पेटवणारे पाईपलाईनचे नेटवर्क आता इंटरनेट पुरवणाऱ्या ऑप्टिक केबल साठी खुले करण्यात आले आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.