किनवट सारख्या दुर्गम भागात आदिवास्यांचे आरोग्य सांभाळणारा ‘देवमाणूस’ !

नांदेड जिल्ह्यातल्या अतिशय दुर्गम समजल्या जाणार्‍या तालुक्यात एक हॉस्पिटल उभारलं जातंय… आता यात काय मोठी गोष्ट आहे असं तुम्हाला वाटू शकतं. पण खरंच मोठ्या आनंदाची गोष्ट आहे कारण या आदिवासी भागात एकही सुसज्ज असं हॉस्पिटलच नव्हतं. आणि हे सगळं शक्य झालं तेथील एका देव माणसामुळे, त्यांचं नाव आहे डॉ. अशोक बेलखोडे !

किनवट तालुका नैसर्गिकरित्या तर समृद्ध आहेच पण इथे गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, आरोग्य सुविधेचा अभाव अशा गोष्टी किनवट मधील गावागावांमध्ये दिसून येतील.

किनवट तालुक्यात ४५ टक्के आदिवासी ४५ टक्के बंजारा तर दहा टक्के इतर वर्गातील समाज आहे. थोडेबहुत कुटुंब सोडली तर येथील कुटुंब अजूनही आरोग्य शिक्षणाच्या संधी तसेच आधुनिक जीवन पद्धती पासून दूरच आहे. ७० टक्के समाज अजूनही गरीबच राहिला आहे.

डॉ. अशोक बेलखोडे हे गेल्या कित्येक वर्षांपासून किनवट मधल्या ग्रामस्थांवर मोफत उपचार करतात. त्यांनी कित्येक अवघड व जोखमीच्या शस्त्रक्रिया देखील केलेले आहेत. तेही एकही रुपया न घेता. किनवट या इतर तालुक्याच्या मानाने दुर्लक्षित असा तालुका आहे. इथं आदिवासी नागरिक  किमान वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहिली आहेत.

बाकी चांगले शैक्षणिक सुविधा आणि चांगले रस्ते तर सोडाच परंतु बेसिक सुविधांसाठी देखील त्यांना दीडशे किलोमीटर लांब असलेल्या नांदेड शहरापर्यंत पोहोचावं लागतं.

पण डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्यामुळे येथील कित्येक आदिवासींची जीव वाचले आहेत.

कोण आहेत हे अशोक बेलखोडे ?

डॉ. बेलखोडे हे हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा गावचे. घरात वारकरी विचारांचं वातावरण. डॉ. बेलखोडे यांचे वडील संत गाडगेबाबा यांच्यासोबत कीर्तन भजन करीत. गाडगेबाबांच्या कित्येक कीर्तनामध्ये बेलखोडे यांच्या वडिलांनी पेढीची साथ-संगत दिली. अशा साध्या सहज कुटुंबात ते वाढले.

डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्यावर गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रभाव लहानपणापासूनच होता. तरुणपणात त्यांच्यावर बाबा आमटे, यदुनाथ थत्ते, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव, सुब्बा राव, डॉ. शिवाजीराव पटवर्धन डॉ नरेंद्र दाभोळकर इत्यादींचा प्रभाव राहिला आहे.

साने गुरूजी रुग्णालयाचे कार्य –

एखादं हॉस्पिटल या तालुक्यात उभं राहतं, इथे कमी पैशात किंवा वेळप्रसंगी मोफत उपचार देखील केले जातात. १९९३ च्या काळात या साने गुरुजी रुग्णालयाची पायाभरणी झाली होती. तालुक्याच्या या दवाखान्यात विदर्भ मराठवाडा आणि तेलंगणा अशा तीन प्रांतांमधून जवळपास तीन लाख लोकांनी या रुग्णालयाचा लाभ घेतला आहे. एखाद्या आदिवासी भागात असलेल्या या दवाखान्यात इतक्या लांबून येणारी जनता म्हणजेच आपल्या ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचं वास्तव दाखवते. केवळ रुग्णांवर उपचार करणं हे साने गुरुजी हॉस्पिटल असा उद्देश कधीच नव्हता. ‘

तर सोबतच आजूबाजूच्या लोकांमध्ये अज्ञान अंधश्रद्धा पाणी आरोग्याबाबतची जनजागृती करणे हा उपक्रम देखील त्यांनी राबवला.

तुम्ही किनवट तालुक्यात कधी गेला असता तर तुम्हाला इथे आरोग्यविषयक चळवळ दिसेल. आरोग्य विषयक जागृती करण्यासाठी डॉक्टरांनी ग्रामीण भागात अनेक काम केलीत.

तेथील डॉक्टरांसाठी आधुनिक ज्ञान, तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बचत गटांसाठी स्त्रीआरोग्य दशा व दिशा इत्यादी प्रशिक्षण शिबिरे, तंबाखू विरोधी दीन, जागतिक एड्स दिन जागतिक जलदिन त्याचबरोबर पौगंडावस्थेतील मुला-मुलींना साठी विविध कार्यक्रम, व्यसनमुक्ती इत्यादींवर त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम, उपक्रम राबवले.

बेलखोडे यांच्या साने गुरूजी रुग्णालय परिवाराने काही संस्थांच्या मदतीने तालुक्याच्या ठिकाणी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान युक्त सानेगुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा ध्यास घेतलाय. १०० खाटांचे या हॉस्पिटलला निधीची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी मदत करण्याचे आवाहन केलेय. या हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात देखील झाली आहे. समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हस्ते भूमिपूजन करून त्यांनी आत्ता बारा हजार चौरस फुटाचे बांधकामाचा पहिला टप्पा सुरू झालाय.

ज्या भागात डॉक्टर हा शब्दही पोहचला नव्हता त्या भागात एक हॉस्पिटल उभारलं  जात आहे 

या संपूर्ण प्रकल्पाला एकूण सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च लागणार असून त्यातले दोन सव्वा दोन कोटींचा निधी उभा राहिला आहे तर उर्वरित निधी जमा करण्यासाठी संपूर्ण साने गुरूजी रुग्णालय परिवार रात्रंदिवस पाठपुरावा करत आहे. 

याच बाबतीत बोल भिडूने डॉ. बेलखोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले कि,

“अशा दुर्गम भागात हा प्रकल्प उभा करणे अगदी अशक्यप्राय गोष्ट होती. मोठ्या हिंमतीने साने गुरुजी रुग्णालय परिवाराने हे काम हाती घेतले आहे. यात आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांचा खूप सपोर्ट आहे कारण त्यांना त्यांचे भवितव्य या हॉस्पिटल मध्ये दिसू लागत आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्ये असंय कि, येथील ३ लाख लोकांना वैद्यकीय गरजांसाठी १५० किमी चा प्रवास करावा लागतोय तो आता बंद होणार आहे. अनेकांचे जीव वाचतील, त्यांचे आयुर्मान वाढेल. थोडक्यात हा प्रकल्प त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांची सद्भावना या मागे आहे”

किनवट जि. नांदेड या आदिवासी भागातील वैद्यकीय उपचार सुविधांचा विचार करून भविष्याचा वेध घेणारा अशा या प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. साधारणपणे ६ ते ७ कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन ते सव्वा दोन कोटी निधी उभा झाला आहे.

व भविष्यातही आपण अशीच शक्य होईल तेव्हा व शक्य तेवढी मदत करीत राहावे या साठी कळकळीची विनंती व आवाहन भारत जोडो युवा अकादमी, साने गुरूजी रूग्णालय परिवारातर्फे करीत आहोत. जवळपास पावणे दोन कोटीचे बांधकाम झाले असून यात अनेक दानशूरांच्या मदतीमुळेच हा प्रकल्प उभा राहत आहे.

तुम्हाला या आरोग्य मंदिरासाठी काही मदत देऊ इच्छित असाल तर खाली डॉ.बेलखोडे यांच्याशी संपर्क साधू शकता आणि या समाजपयोगी उपक्रमाला हातभार लावू शकता.

संपर्क – डॉ. अशोक बेलखोडे ( ९८२२३१२२१४ )

हे हि वाच भिडू :  

 

Leave A Reply

Your email address will not be published.