गेटवर भेटलेल्या बीडच्या पोराला राज्यपालांनी राजभवनात राहण्यासाठी नेलं..

लोकनेते वसंतदादा पाटील. फक्त सातवी पर्यंत शिक्षण झालेलं पण पुस्तकं न वाचताही माणसं आणि माणसांचं मन वाचणारा नेता. सहकार क्षेत्राच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांना आलेलं व्यावहारिक शहाणपण हे एखाद्या विद्यापीठाच्या पीएचडी पेक्षाही जास्त होतं.

जे पोटात तेच ओठात  प्रवृत्तीचा हा विरळा राजकारणी माणूस.

प्रचंड लोकसंग्रह हि त्यांची ताकद होती. मुख्यमंत्री बनल्यावरही त्यांचा अगदी तळातल्या कार्यकर्त्याशी संपर्क कधी तुटला नाही.

एखादा माणूस मोठ्या विश्वासानं दादांच्याकडे येऊन त्याची म्हैस हरवल्याची किंवा बायको नांदत नसल्याची तक्रार घेऊन आला की दादा ज्या पद्धतीने त्याची समजूत घालायचे तो प्रसंग बघण्यासारखा असे. ग्रामीण भागातीलच नाही तर शहरातल्या अगदी सुविद्य माणसांचेही ते दादाच होते.

राजीव गांधींनी त्यांना न विचारता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रभा राव यांना आणलं. फक्त स्वाभिमानासाठी दादांनी मुख्यमंत्रीपद सोडलं. त्यांना राजस्थानच्या राज्यपालपदी पाठवण्यात आलं.

वसंतदादा महाराष्ट्र सोडून राजस्थानच्या राजभवनात स्थानापन्न झाले खरे पण त्यांना हे राज्यपालपद अडचणीचं वाटायचं. कायम माणसांच्या गराड्यात असणारा हा नेता त्या विशाल अशा राजभवनात एकटेपणाचं जगणं जगू लागला. या सोन्याच्या पिंजऱ्यातल्या एकाकीपणाचा, भोवती कार्यकर्त्यांचं मोहळ नसण्याच्या परिस्थितीचा त्यांना कंटाळा यायला लागला. मग त्यांनी राजभवनाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले.

हा राज्यपाल सदासर्वकाळ जनसामान्यांना भेटू लागला. त्यांच्या समस्या जाणून घेऊ लागला. राजस्थानच्या जनतेचे देखील ते लाडके दादाजी बनले होते. त्यांचं मोडकं तोडकं हिंदी कानाला गोड वाटायचं. त्या बोलण्यात प्रेमाचं दर्शन घडायचं.

एकदा असच दुपारच्या वेळी दादा राजभवनाच्या हिरवळीत धोतर बंडी या वेशात ऊन खात बसले होते. अचानक त्यांना गेटवर कसला तरी आवाज ऐकू आला. कोणी तरी दादा दादा म्हणून ओरडत होतं पण  त्याला आत जाऊ देत नव्हता.

वसंतदादा पाटलांनी सिक्युरिटी गार्डला इशारा केला कि कोण आहे त्याला आत पाठवून दे.

साधारण विशीतला एक साधासुधा तरुण होता. दादांनी नाव विचारलं. तो म्हणाला नंदू. मी बीड वरून आलोय.

महाराष्ट्रातून आलाय हे कळल्यावर दादांचा चेहरा आणखी खुलला. त्यांनी नाव गाव घरची माहिती विचारली. इतक्या लांब जयपूरला काय काढलं हे देखील विचारलं. 

नंदूने नाटक वगैरे करतो म्हणून सांगितलं. कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी ते जयपूरला आले होते. इथे एक हकीम कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार करायचा. त्या हकीमचा पत्ता होता, पण जयपूरमध्ये कोणी ओळखीचं नव्हतं. विचारपूस करताना त्यांना कळालं कि सांगलीचे वसंतदादा पाटील राज्यपाल आहेत. तेव्हा तो तडक राजभवनावर आला होता.

 दादांनी आपणहून त्याला विचारलं,

कुठे थांबलास ?

नंदू म्हणाला, अजून व्यवस्था झाली नाही.

दादांनी त्याला सामान घेऊन यायला सांगितलं. त्याची आणि त्याच्या आईची राजभवनात राहण्याची व्यवस्था केली. अगदी जेवणासाठी अगदी ब्राम्हणी पद्धतीचं शाकाहारी भोजन मिळेल याकडे लक्ष द्यायला सचिवाला सांगितलं. नंदू व त्याची आई राजभवनाच्या गाडीतून त्या हकिमाकडे उपचाराला जाऊ लागली.

उपचार पूर्ण झाल्यावरच ते बीडला परतले. तोवर जयपूरच्या राजभवनातच राहिले. हा नंदू म्हणजे पुढे सिनेमामध्ये प्रसिद्ध झालेला अभिनेता कलाकार नंदू माधव. आपल्या सारख्या कोणतीही ओळख नसलेल्या एका सर्वसामान्य तरुणाला आणि त्याच्या आईला दादांनी राजभवनात ठेऊन घेतलं आणि उपचार पार पाडले ही गोष्ट ते कधीही विसरले नाहीत. 

पुढे काही वर्षातच वसंतदादा पाटलांचं निधन झालं. जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे तेव्हा काही कारणास्तव औरंगाबादला निघाले होते. त्यांना नेवाश्याच्या बसस्टँड वर नंदू माधव यांच्याशी भेट झाली. दोघांची ओळख होती. गाडी पंक्चर झाल्या मुळे हॉटेलच्या बाकड्यावर बसून चहा पीत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या.

बोलता बोलता नंदू माधव यांचं लक्ष महावीर जोंधळे यांच्या हातात असणाऱ्या वर्तमानपत्राकडे गेलं. त्यात वसंतदादा पाटलांच्या मृत्यूची बातमी आणि फोटो पहिल्या पानावर छापून आला होता. ते पाहून नंदू माधव यांना धक्काच बसला. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. खरं तर ते काँग्रेसचे कार्यकर्ते वगैरे नव्हते. त्यांच्यासारखा एक रंगकर्मी वसंतदादांच्या मृत्यू नंतर इतका कसा गहिवरतो यावरून जोंधळे यांना आश्चर्य वाटलं. तेव्हा त्यांनी दादांनी केलेली मदत सांगितली. तळागाळातल्या लोकांसाठी आयुष्यभर झटलेला हा माणूस फक्त आदर्श मुख्यमंत्री, आदर्श राज्यपाल नव्हता तर मोठ्या मनाचा दिलदार माणूस होता हे नक्की.

संदर्भ- ‘लौकिक’ महावीर जोंधळे

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.